pimpri-adhalrao-organises-meeting-for-traffic-congestion | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खासदार आढळराव सरसावले

उत्तम कुटे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पुणे-नाशिक महामार्ग कोंडीप्रश्नी आपल्या आमदाराविरुद्ध (खेडचे सुरेश गोरे) गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्या मतदारसंघातील ही गंभीर व जटील समस्या सोडविण्यासाठी आता शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे अधिक वेगाने कामाला लागले आहेत.

पिंपरीः पुणे-नाशिक महामार्ग कोंडीप्रश्नी आपल्या आमदाराविरुद्ध (खेडचे सुरेश गोरे) गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्या मतदारसंघातील ही गंभीर व जटील समस्या सोडविण्यासाठी आता शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे अधिक वेगाने कामाला लागले आहेत. या हायवेवरील अवैध वाहतूक आणि त्यातून तयार होणाऱ्या कोंडीमुळे कायदा व सुव्यवस्थेचाच प्रश्न निर्माण झाल्याने खासदारांनी आरटीओ, पोलिस, महसूल अशा सर्व सबंधित खातेप्रमुखांची उद्या पुण्यात बैठक बोलावली आहे.

पुणे-नाशिक हायवेवर आणि त्यातही मोशी, चाकण आणि खेड येथे अवैध वाहतूक आणि त्यामुळे होणारी कोंडी हा प्रश्न खूपच गंभीर बनलेला आहे. तो सोडविण्यासाठी स्थानिक आमदार गोरे यांनी पोलिसांकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र, त्याची दखल न घेतल्याने ते स्वत:च रविवारी (ता.26) रात्री रस्त्यावर उतरले. यावेळी बेकायेदशीर वाहतुकीत गुंतलेली काही वाहने (पियोजो रिक्षा) फोडण्यात आल्या. त्याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात काल गोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यामुळे आढळराव यांनी हा गंभीर प्रश्न आता अधिक गांभिर्याने घेतला आहे. तो मार्गी लावण्यासाठी हा हायवे सहापदरी करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरुच आहे. मात्र, तो या ना त्या कारणामुळे रखडलेला आहे. 

दरम्यान, या गंभीर प्रश्नातून लॉ अॅन्ड ऑर्डरचा दुसरा प्रश्न तयार झाल्याने ही समस्या सोडविण्यासाठी आढळराव सरसावले आहेत. त्यांनी त्यावर उपाय करण्यासाठी तातडीने उद्या सर्व सबंधित विभागांची बैठक आयोजित केली आहे. 

दरम्यान, अवैध वाहतुकीत गुंतलेल्यांकडून पोलिसांची हप्तेवसुली, जरी बंद झाली, तरी या हा हायवे काहीसा मोकळा श्वास घेईल, असे मत शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी आज सरकारनामाशी बोलताना व्यक्त केले.

दरम्यान, या महामार्गावरील वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका करण्यासाठी मोशी, चाकण येथे वीस, तर राजगुरुनगर (खेड) आणि नारायणगाव येथे 15 अतिरिक्त पोलिस देण्याची मागणी आढळराव यांनी केली. त्यासंदर्भात त्यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन आणि पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांना 25 ऑगस्ट रोजी पत्र दिले होते. त्यानुसार खेडला पुणे ग्रामीणमधून दहा पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या 
जोडीला महामार्गचे पाच पोलिसही दिले गेले आहेत. 

दुसरीकडे श्रावण महिना असल्याने या हायवेवर आणखी काही दिवस वाहतूक कोंडी होणारच आहे. कारण तेथूनच भीमाशंकरला हजारो वाहने दररोज व त्यातही सोमवार आणि शनिवारी ये-जा करीत आहेत.
  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख