pimpari-pimpari-chinchwad-police-commissionarate | Sarkarnama

पिंपरी-चिंचवडचे नवे पोलिस आयुक्तालय आता आयुक्तांच्या प्रतिक्षेत

उत्तम कुटे
शनिवार, 28 जुलै 2018

पोलिस ठाणेप्रमुख असलेले पोलिस निरीक्षक (पीआय), विभागप्रमुख (परिमंडळ) पोलिस उपायुक्त (डीसीपी) आणि आयुक्तानंतर दोन नंबरवर असलेले अतिरिक्त आयुक्तही (अॅडिशनल सीपी) नेमले गेल्याने आता नवनिर्मित पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला पहिले पोलिस आयुक्त (सीपी) कोण मिळतात, याकडे आता साऱ्या शहराचे लक्ष लागले आहे. 

पिंपरीः पोलिस ठाणेप्रमुख असलेले पोलिस निरीक्षक (पीआय), विभागप्रमुख (परिमंडळ) पोलिस उपायुक्त (डीसीपी) आणि आयुक्तानंतर दोन नंबरवर असलेले अतिरिक्त आयुक्तही (अॅडिशनल सीपी) नेमले गेल्याने आता नवनिर्मित पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला पहिले पोलिस आयुक्त (सीपी) कोण मिळतात, याकडे आता साऱ्या शहराचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुक ध्यानात घेऊन ही नियुक्ती केली जाणार असल्याने तिला काहीसा विलंब होतो आहे.

पिंपरी-चिंचवडचे पहिले अतिरिक्त पोलिस आयुक्त होण्याचा मान मकरंद रानडे यांना मिळाला आहे. त्यांनी यापूर्वी पुण्यात काम केले असल्याने पुणेकर रानडे यांना उद्योगनगरीची खडानखडा माहिती आहे.

पिंपरी-चिंचवडचे पोलिस उपायुक्त (परिमंडळ तीन) यांची मुंबईत बदली झाली आहे. त्यामुळे नवे पोलिस आयुक्तालय सुरु होऊन शहरात नवे पोलिस येण्यापूर्वी काही दिवस, तरी शहराचे पोलिसप्रमुख हे सीपींऐवजी डीसीपींच असणार आहेत. त्यामुळे सीपींबरोबर काही दिवसांचे वा महिन्यांसाठीचे हे डीसीपी कोण असतील, याविषयीही शहर उत्सुक आहे. 

पुणे पोलिस आयुक्तालयाचे विभाजन करून स्वतंत्र करण्यात आलेले पिंपरी-चिंचवडचे नवे स्वतंत्र पोलिस आयुक्तालय येत्या स्वातंत्र्यदिनी सुरु करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. त्यासाठीच एकामागोमाग एक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तेथे केल्या जात आहेत. 

काल एक अतिरिक्त आयुक्त (रानडे) तर, दोन पोलिस उपायुक्तांच्या (डीसीपी) बदलीवर नियुक्त्या पिंपरीत करण्यात आल्या. रानडे हे ठाण्याहून आले. उपायुक्त म्हणून नम्रता पाटील या राज्य पोलिस मुख्यालय येथून आल्या आहेत. विनायक ढाकणे हे औरंगाबादला डीसीपी होते. तेथून त्यांना पिंपरीत पाठविण्यात आले आहे. त्यांनीही यापूर्वी रानडे यांच्याप्रमाणे पिंपरीजवळ काम केलेले आहे. ते पुणे ग्रामीणमध्ये देहूरोड विभागाचे पोलिस उपअधीक्षक होते. त्यामुळे त्यांच्याकडे देहूरोड, तळेगाव या त्यांनी काम केलेल्या व माहिती असलेल्या विभागाचे पोलिस उपायुक्तपद सोपविले जाण्याची शक्यता आहे. पाटील यांच्याकडे नव्या पोलिस आयुक्तालयाच्या मुख्यालयाचे उपायुक्तपद दिले जाईल, असा कयास आहे. 

दहा पोलिस निरीक्षकांच्या (पीआय) नियुक्त्या या नव्या आयुक्तालयात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बदली झालेले हे वरिष्ठ अधिकारीही पिंपरी-चिंचवडकरांप्रमाणे नवे पोलिस आयुक्तलय कधी सुरु होणार याच्या प्रतिक्षेत आता आहेत.

पालिकेने मुख्यालयासाठी आपली चारमजली शाळेची इमारत भाड्याने दिली आहे. महिन्याला त्यापोटी अंदाजे अडीच लाख रुपये भाडे गृहविभागाला द्यावे लागणार आहे. मात्र, अशा आणखी दोन इमारतीची गरज आयुक्तालयाला आहे. त्यालाही पुढील आठवड्यात पालिका मान्यता देईल, असा अंदाज आहे. त्यानंतर तेथे फर्निचर करून संगणक व इतर कामे करायची आहेत. 
परिणामी 15 ऑगस्टच्या मुहूर्ताविषयी पोलिस खातेच साशंक आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख