pimpari-mayor-deputy-mayor-resignation | Sarkarnama

पिंपरी : `स्थायी'नंतर आता महापौरही भाऊ समर्थकच का? 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 जुलै 2018

उद्योगनगरीचे महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर सौ. शैलजा मोरे यांनी आज आपले राजीनामे दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांनी ते दिले. मात्र, स्वच्छेने वैयक्तिक कारणातून ते दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पिंपरीः उद्योगनगरीचे महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर सौ. शैलजा मोरे यांनी आज आपले राजीनामे दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांनी ते दिले. मात्र, स्वच्छेने वैयक्तिक कारणातून ते दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. पिंपरी पालिकेचे पदाधिकारी बदलाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वीच (ता.22) `सरकारनामा'ने दिले होते. ते तंतोतंत खरे ठरले. 

राजीनामा दिल्यानंतर महापौर, उपमहापौर हे लगेच आपल्या खासगी गाडीने पालिकेतून बाहेर पडले. 

दरम्यान,नवे महापौर आणि उपमहापौर कोण होणार या चर्चेला उधाण आले आहे.महापौरपद हे ओबीसीसाठी राखीव आहे. मात्र, पुन्हा या पदावर कुणबी ओबीसी नगरसेवकच बसण्याची शक्‍यता आहे.तसेच सध्या भोसरी विधानसभा मतदारसंघात असलेले हे पद "चिंचवड'कडे जाण्याचे ताजे व नवे संकेत मिळाले आहेत. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा नुकताच मुंबई दौरा झाला. यावेळी त्यांनी स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीला लागा, असे पदाधिकाऱ्यांना बजावले. त्यामुळे आगामी लोकसभेला युती न होण्याचे संकेत मिळाले आहेत. तसे झाले, तर मावळातून भाजपचे उमेदवार हे चिंचवडचे पक्षाचे आमदार व पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष लक्ष्मणभाऊ जगताप हेच असणार आहेत. म्हणून लोकसभा निवडणूक तयारीचा भाग म्हणून ते आपले समर्थक बापू ऊर्फ शत्रुघ्न काटे यांना महापौरपदी बसविण्याची शक्‍यता आहे. फक्त त्यांच्या कुणबी जात प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत शंका घेण्यात आली आहे. मात्र, तो त्यांना अडथळा ठरणार नाही. कारण काळजेंच्याही बाबतीत हे घडलेले आहे. महापौरपद घेऊन स्थायी समितीचे अध्यक्षपद कारभारी "भोसरी'ला देण्याची शक्‍यता आहे. त्याकरिता राहुल जाधव यांचे नाव चर्चेत आहे. ते न मिळाल्याने जाधव यांनी स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. उपमहापौरपद हे पुन्हा एकदा जुन्या भाजपाईला दिले जाईल, असा अंदाज आहे. 

आता फक्त पालिका सभागृहनेते पदावरील व्यक्ती बदलणे बाकी राहिले आहे. त्यापदी एकनाथ पवार आहेत. मात्र,त्यांना बदलले जाणार नाही, असे विश्‍वसनीय वृत्त आहे. आगामी निवडणुकीच्या विचार करता यापदी जबाबदार, जुनी, अनुभवी व्यक्ती असणे पक्षाला योग्य वाटत आहे. केंद्रीय रस्तेविकासमंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितल्याने पवार तूर्त तरी बदलले जाणार नाहीत.  
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख