महेशदादांनी पालखीचे सारथ्य केले; उद्योगनगरीचे पेलणार काय?

पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे ‘डॅशिंग’ आमदार आणि भाजपचे सहयोगी सदस्य महेशदादा लांडगे यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सारथ्य केले. वारकऱ्यांचीही मनोभावे सेवा केली. पण, दोन्ही पालखी रथांचे सारथ्य करणाऱ्या आमदार लांडगे यांना पिंपरी-चिंचवड शहराचे ‘सारथ्य’ पेलणार काय ? असा सवाल राजकीय वर्तूळातून आता उपस्थित केला गेला आहे.
महेशदादांनी पालखीचे सारथ्य केले; उद्योगनगरीचे पेलणार काय?

पिंपरी: पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे ‘डॅशिंग’ आमदार आणि भाजपचे सहयोगी सदस्य महेशदादा लांडगे यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सारथ्य केले. वारकऱ्यांचीही मनोभावे सेवा केली. पण, दोन्ही पालखी रथांचे सारथ्य करणाऱ्या आमदार लांडगे यांना पिंपरी-चिंचवड शहराचे ‘सारथ्य’ पेलणार काय ? असा सवाल राजकीय वर्तूळातून आता उपस्थित केला गेला आहे.
    
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत सत्तांतर झाले. बलाढ्य राष्ट्रवादी चारीमुंड्या चित झाली. या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व महेश लांडगे ठरले. महापालिकेतील सत्तेचा संसार हाकताना महेश लांडगे यांच्यासारखे शहर स्तरावरील युवा नेतृत्व उदयाला येवू लागले आहे. सहाजिकच शहरवासीयांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत.    

‘भोसरी व्‍हीजन-२०२०’सारखा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेवून भोसरीच्या सर्वांगीण विकासाचा लांडगेंचा अश्वरथ सुसाट आहे. मात्र, गुन्हेगारी, अवैध धंदे आणि गावकी-भावकीतील वाद यामुळे भोसरीच्या लौकिकाला गालबोट लावले जात आहे. 

एकीकडे, समाविष्ट गावांचा विकास आणि ‘सीईओपी’सारख्या दर्जेदार शिक्षण संस्था भोसरीत आणण्याचे ‘व्‍हीजन’ पाहणारे आमदार लांडगे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जिव्‍हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतीचे आंदोलन पुण्यातून मुंबईत आणि मुंबईत दिल्लीपर्यंत पोहचवणारे आमदार लांडगे. भोसरीतील दहशत आणि गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरले आहेत. मात्र, पायाभूत विकास- उच्च शिक्षण-रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीच्या जोरावर शहरात ‘बदल घडला तो तुमच्यामुळेच... आणि बदल घडणार तोही तुमच्यामुळेच..’ असेही ते आत्मविश्वासाने सांगतात.
    
राज्य आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी आमदार लांडगे यांचा चांगला सलोखा आहे. 

वास्तविक, मोदी लाटेत २०१४ मध्ये विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली. केवळ लढवली नाही, तर जिंकून दाखवली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये हा मोहरा गळाला लागल्याशिवाय गत्यंतर नाही. याची जाणीव स्वत: मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना होती. त्यामुळेच भाजपने आमदार लांडगे यांना कायम ताकद दिली. अवघ्या चार वर्षांत शासन दरबारी पाठपुरावा करुन विकास कामांसाठी निधी खेचून आणण्याचे कौशल्य आमदार लांडगे यांनी अवगत केले.
    
दरम्यान, शहर पातळीवर आजही अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, नदी प्रदूषण, रेड झोन, पुररेषा, वाहतूक समस्या, शिक्षण सुविधा, आरोग्य सुविधांशी संबधित विविध प्रकल्प राज्य शासनाशी संबंधित आहेत. त्यामुळे भोसरीच्या धर्तीवर आता पिंपरी-चिंचवडचे ‘व्‍हीजन’ आमदार लांडगे यांनी हाती घ्यावे. ज्यामुळे शहरातील सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा एक मतप्रवाह निर्माण झाला आहे. पण, पालखीचे सारथ्य करणे आणि शहराचे सारथ्य करणे यात फरक आहे. त्यामुळे शहराचे ‘सारथ्य’ आमदार लांडगे यांना पेलणार काय? असा प्रश्नही सूज्ञ नागरिकांकडून चर्चेत आणला जात आहे.

आजच्या घडीला शहराचे सारथ्य हे भाजपचे चिंचवडचे आमदार व शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप हे करीत आहेत. तेच शहराचे कारभारी आहेत. त्यांचेच पाठीराखे पालिकेत महत्वाच्या (स्थायी समिती अध्यक्ष आदी) पदावर आहेत. प्रशासनाकडून कामांचा आढावा तेच बैठका घेऊन घेत आहेत. ते भाजपचे आमदार आहेत. शहराध्यक्ष आहेत. त्यांनी तुलनेने अधिक नगरसेवक निवडून आणलेले आहेत. त्यामुळे कारभारीपद ओघाने त्यांच्याकडे आलेले आहे. परिणामी भाऊंच्या जोडीने सहकारभारी तथा उपकारभारी पद सांभाळीत दादांना उद्योगनगरीच्या रथाचे सहसारथ्य सध्या करावे लागत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com