pimpari-girish-bapat-laxman-jagtap-mahesh-landage | Sarkarnama

पिंपरी-चिंचवडचे कारभारी कोण? पालकमंत्री की स्थानिक आमदार 

उत्तम कुटे 
सोमवार, 23 जुलै 2018

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत गेल्यावर्षी प्रथमच भाजपची सत्ता आणण्यात मोलाची कामगिरी बजावलेले शहरातील पक्षाचे आमदार लक्ष्मणभाऊ हे सध्या शहराचे कारभारी आहेत. मात्र, आजच्या पिंपरी-चिंचवडच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी त्याविषयी संशय निर्माण करणारे वक्तव्य केले.

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत गेल्यावर्षी प्रथमच भाजपची सत्ता आणण्यात मोलाची कामगिरी बजावलेले शहरातील पक्षाचे आमदार लक्ष्मणभाऊ हे सध्या शहराचे कारभारी आहेत. मात्र, आजच्या पिंपरी-चिंचवडच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी त्याविषयी संशय निर्माण करणारे वक्तव्य केले. त्यामुळे खरे कारभारी कोण भाऊ की बापट हा चर्चेचा विषय नंतर रंगला.तर, भाऊंचेही भाषण अधिक परिपक्व व अभ्यासपूर्ण झाले. 

बापट आज सुसाट होते. त्यांनी आज क्रांतिवीर राष्ट्रीय स्मारकाच्या भूमीपूजन समारंभात नेहमीपेक्षा अधिक टोमणे मारणारे भाषण केले. शहरात भाऊ आणि दुसरे आमदार महेशदादा लांडगे असे दोन गट त्यांच्या समर्थकांत आहेत. त्यावरून पद वाटपावेळी त्यांच्यात रस्सीखेचही झाली आहे व होतही आहे. हा धागा पकडून त्यांच्यात संवाद राहण्यासाठी बापट यांनी आपल्या भाषणात भाऊंचा उल्लेख लोकांत असणारे आमदार असा केला. तर त्यानंतर दादांचा उल्लेख त्यांनी लोकांत उठून दिसणारे आमदार केला.पैलवान असल्याने ते उठून दिसतात, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.तर भाऊ,दादा आणि भाई (शहरातील पक्षाचे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे) यांचा नामोल्लेख त्यांनी एकत्रित त्रिकूट व त्रिमूर्ती असा केला. 

शहराचा कारभार तसा भाऊ व दादा पाहतात,करतात. मात्र, शहरातील कामे व अडचणी ते माझ्या कानात सांगतात. मग त्या मी मुख्यमंत्र्यांना सांगतो, असे बापट म्हणताच हास्यस्फोट झाला. पन्नास वर्षाचा गाडा पाच वर्षात हाकणारे मुख्यमंत्री असे ते नरेंद्र फडणवीस यांच्याबाबत म्हणाले.तर, शहरातील पन्नास वर्षातील प्रलंबित कामे पाच वर्षात करू, असा संकल्प केल्याचेही त्यांनी सांगितले.त्याचवेळी शहरातील कुठलेही काम पेन्डिंग नसल्याचे ते म्हणाले.मात्र, पक्षाची शहरातील आमदार जोडगोळी (भाऊ,दादा) ते शोधून काढतील. सह्या घेण्यात पटाईत असलेले हे दोघे त्यावर मुख्यमंत्र्यांच्या सह्याही घेतील, असे बापट म्हणताच पुन्हा हशा पिकला.शहरातील अनेक कामे झाली नाहीत, असे सांगणाऱ्या विरोधकांनी दहापैकी दोन कामे,तरी झाली असल्याचे सांगत मनाचा मोठेपणा दाखवावा, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख