pimpari-cm-fadanvis-chapekar-programe | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांची उद्योगनगरीतील सभा झाली; पण पावला-पावलावर पोलिस उभे करून 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 जुलै 2018

मराठा मोर्चाच्या इशाऱ्यानंतर पंढरपूरमधील आषाढी एकादशीची आजची शासकीय महापूजा रद्द करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही तासांतच पिंपरी-चिंचवडमध्ये जाहीर सभा घेऊन दाखविली. तत्पूर्वी त्यांनी भूमिपूजनही केले. मात्र,त्यासाठी त्यांना पावला-पावलावर पोलिस उभे करावे लागले. 

पिंपरीः मराठा मोर्चाच्या इशाऱ्यानंतर पंढरपूरमधील आषाढी एकादशीची आजची शासकीय महापूजा रद्द करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही तासांतच पिंपरी-चिंचवडमध्ये जाहीर सभा घेऊन दाखविली. तत्पूर्वी त्यांनी भूमिपूजनही केले. मात्र,त्यासाठी त्यांना पावला-पावलावर पोलिस उभे करावे लागले. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी गोंधळाची चुणूक लागताच त्यांना आपले भाषण गुंडाळावे लागले. एकूणच आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा मोर्चाने सभा उधळून लावण्याच्या दिलेल्या इशाऱ्याच्या सावटाखालीच मुख्यमंत्र्यांची ही सभा व आजचा धावता पिंपरीचा दौरा झाला. 

शहरातील क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय स्मारकाच्या भुमीपूजनासाठी मुख्यमंत्री आले होते. या कामाची कुदळ मारल्यानंतर त्यांची जाहीर सभा झाली. मुख्यमंत्री भाषणाला उठेपर्यंत सभा शांततेत सुरु होती. ते बोलायले लागले आणि सभेत थोडी चुळबूळ सुरु झाली. मागील बाजूस मावळ मराठा महासंघाच्या रुपाली पाटील यांनी घोषणा देण्यास सुरवात केली. मात्र, सभेत पावलापावलावर असलेल्या पोलिसांनी त्यातही महिला पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेतले. त्यांचा आवाज बंद केला. त्यांना लगेच बाजूलाही नेले. त्यामुळे काहीसा गोंधळ उडाला. मात्र, पोलिसांनी काही झाले नसल्याचे सांगितले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी एका महिलेला उलटी झाल्याचा बनाव केला. एकूणच पुढे गोंधळ होण्याची चाहूल लागताच मुख्यमंत्र्यांना आपले भाषण काही मिनिटात आटोपते घ्यावे लागले. 

झेड प्लस सुरक्षाव्यवस्था असलेल्या मुख्यमंत्र्यांनी पोलिस छावणीचे स्वरूप आलेल्या शहरात हा दौरा केला. मात्र,यावेळी श्रोत्यांच्या तुलनेत पोलिसांचीच संख्या लक्षवेधी होती. सभा होणारा परिसर पोलिसांनी वेढलेला होता. एवढेच नाही,तर मंडपातही पावला पावलावर पोलिस उभे होते. साध्या वेशातही ते मंचाभोवती घुटमळत होते.पक्षात नाराज असलेले शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांच्या कार्यकर्त्यांच्या रोषालाही त्यांना सामोरे जावे लागण्याची शक्‍यता होती. मात्र,सभेपूर्वीच एका ताराकिंत हॉटेलात भाईंना मुख्यमंत्र्यांनी आश्‍वस्त केले. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजीला सामोरे जाण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली नाही. 

सकाळी दहा वाजताच्या या सभेला मुख्यमंत्री दुपारी एकला आले. एवढा मोठा उशीर होऊनही त्याबाबत त्यांनी चकार शब्दही काढला नाही. दरम्यान, आषाढी एकादशीचा उपवास असलेल्या जमलेल्या श्रोत्यांना आयोजक घोषणा देण्यास सांगत होते. पालिका व चापेकर समितीचा हा संयुक्त कार्यक्रम असूनही तो पालिकेतील सत्ताधारी भाजपने हायजॅक केल्यासारखा दिसून आला. 

शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंगअप्पा बारणे,पालिकेतील गटनेते राहुल कलाटे, स्थानिक नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे वगळता बाकीचे शिवसेना नेत्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरविली. या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत शिवसेना खासदारांची नावे शहरातील भाजपच्या आमदारानंतर खालच्या ओळीत होती. 

पालिकेचे जनसंपर्क अधिकारी अण्णा बोदडे यांनीही आमदारानंतर खासदारांची नावे वाचली. श्रोते म्हणून मराठा मोर्चाचे आंदोलक घुसण्याची शक्‍यता गृहीत धरून प्रत्येकाला "मेटल डिटेक्‍टर'मधून गेल्यानंतरही सुद्धा पोलिस हाताने तपासणी करूनच सभास्थळी सोडत होते. 

मुख्यमंत्री येईपर्यंत तीच ती चित्रफीत दाखवून व ऐकवून आयोजकांनी श्रोत्यांचा अंत पाहिला. मुख्यमंत्र्यांचा काल वाढदिवस होता. त्याबद्दल त्यांना तुकोबारायांची पगडी घालून आमदार जगताप यांनी सत्कार केला. भाजपचे शहर प्रवक्ते अमोल थोरात यांचा वाढदिवस होता. त्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.  

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख