पिंपरीत राजकीय साठमारीचे बळी

पिंपरी-चिंचवडमधील सचिन ढवळे या टपरीचालकाने सत्ताधारी भाजप नगरसेविकेच्या त्रासामुळे 28 मे रोजी आत्महत्या केली. या घटनेच्या चार दिवस (ता.24) अगोदरच पालिकेच्या पाणीपुरवठा विभाग अधिकाऱ्याला विरोधी बाकावरील `राष्ट्रवादी'च्या नगरसेवकाने काळे फासले.
PCMC building
PCMC building

पिंपरी-चिंचवडमधील सचिन ढवळे या टपरीचालकाने सत्ताधारी भाजप नगरसेविकेच्या त्रासामुळे 28 मे रोजी आत्महत्या केली. या घटनेच्या चार दिवस (ता.24) अगोदरच पालिकेच्या पाणीपुरवठा विभाग अधिकाऱ्याला विरोधी बाकावरील `राष्ट्रवादी'च्या नगरसेवकाने काळे फासले. 

या दोन्ही घटनांतील व्यक्ती या उद्योगनगरीतील राजकीय साठमारीच्या बळी आहेत. त्यातही टपरीचालकाचा बळी हा गंभीर आहे. कारण पालिकेतील भाजप आणि राष्ट्रवादी या आजी-माजी पक्षांच्या भांडणात ते गेले आहे. त्यातून अनधिकृत बांधकामाविरुद्धच्या कारवाईला विरोधकरण्यासाठी शहरातील एका महिलेने राहत्या इमारतीवरून उडी घेऊन जीव दिल्याच्या घटनेच्या स्मृती चाळवल्या गेल्या.

पालिकेतील सत्ताधारी आणि प्रमुख विरोधी पक्षांच्या भांडणाने ढवळेंचा बळी घेतल्याची चर्चा आहे. ते राहत असलेल्या भागात माजी सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाने आपल्या समर्थकांना टपऱ्यांची खिरापत वाटली होती. नव्या सत्ताधारी नगरसेविकेने राजकीय आकसातून त्यावर बुलडोझर फिरविला. या दोघा नगरसेवक आजी, माजी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या भांडणानेच ढवळे यांचा बळी घेतला असा इतर टपरीचालकांचा आरोप आहे. 

आत्महत्येपूर्वी ढवळे यांनी सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका सुजाता पालांडे यांच्या त्रासाला कंटाळून जीव देत असल्याच्या लिहून ठेवलेल्या चिठ्ठीने या आरोपाला दुजोरा मिळाला आहे. नमूद करण्योजोगी बाब म्हणजे हे दोन्ही नगरसेवक पूर्वी एकाच पक्षात म्हणजे राष्ट्रवादीत होते. एक शहराध्यक्ष,तर दुसरे महिला शहराध्यक्ष होते. 

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो. मात्र, येथे तिसऱ्याचा लाभ होण्याऐवजी तोटा आणि तो सुद्धा कधीही भरून न येणारा झाला आहे. चिठ्ठीमुळे पोलिसांना ढवळेंच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करावा लागला. नाही तर, आकस्मिक मृत्यू म्हणूनच त्यांनी नोंद करून हे प्रकरण रफादफा केले असते. कारण यापूर्वी सत्ताधारी भाजपच्या दोन नगरसेविकांविरुद्ध दोन घटनांत अशाच प्रकारचा गंभीर स्वरुपाचा गुन्हे (एक खूनाच्या प्रयत्नाचा, तर दुसरा फसवणूक) होण्यासाठी पोलिसांकडे मोठा पाठपुरावा करावा लागला होता. त्यामुळे प्रथमदर्शनी सबळ पुरावा असूनही या घटनेपूर्वी आठ महिने अगोदर दाखल झालेले हे दोन्ही गुन्हे घटनेनंतर काही दिवसांनी दाखल झाले. त्यानंतर, पुढील कार्यवाहीसाठीही पोलिसांकडे पाठपुरावा करावा लागला, हा भाग वेगळाच.

याअगोदर दाखल झालेल्या भाजपच्या दोन्ही नगरसेवकांपेक्षा काल दाखल झालेला त्यांच्याच तिसऱ्या नगरसेवकाविरुद्धचा गुन्हा तुलनेने खूप गंभीर व मोठा आहे. कारण काहीही दोष नसताना त्यात हकनाकपणे एका टपरीचालकाचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे तो चार दिवसांपूर्वी काळे फासण्यात आलेल्या पाणीपुरवठा अधिकाऱ्याच्या गुन्ह्यापेक्षा कितीतरी मोठा गंभीर आहे. जावेद शेख या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने हा प्रताप केला आहे. त्यांच्या दहशतीमुळे पाच दिवसानंतरही याप्रकरणी अद्याप गुन्हाच दाखल झालेला नाही. पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी शेख यांनी हे कृत्य केले. त्यांच्या प्रभागातील पाणीपुरवठा वारंवार मागणी करूनही सुरळीत होत नव्हता. सत्ताधारी जाणूनबुजून तो करीत नव्हते, असे शेख यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यालाच काळे फासले. मात्र, पुन्हा या दोघा आजी, माजी सत्ताधारी पक्षांच्या भांडणात तिसऱ्याचाच बळी गेला.

पालिका मुख्यालयाच्या आवारात कचरा टाकून प्रभागातील कचरा नियमित उचलला जात नसल्याचा निषेध करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेविकेविरुद्ध गुन्हा लगेच दाखल व्हावा, म्हणून तक्रार देणाऱ्या असताना प्रशासनाने आपल्या अधिकाऱ्याला काळे फासल्या गेल्याच्या प्रकरणात मिठाची गुळणी का धरली आहे, याची चर्चा पालिकेतच नव्हे, तर संपूर्ण शहरातच आहे. 

अगोदरच प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर झाल्याची विरोधकांनी टीका केलेली आहे. एवढेच नाही, तर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे सत्ताधाऱ्यांच्या हातातील कठपुतळी असून ते त्यांचे घरगडी आहेत, अशी टोकाची टीकाही करण्यात आली आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच आयुक्तांवर दहा महिन्याच्या कारकिर्दीत एवढी जहरी टीका झालेली आहे. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारात आयुक्तही सहभागी असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र, तो पुराव्याशिवाय केल्याचे सांगत आयुक्तांनी तो फेटाळला हा भाग वेगळा. त्यात आयुक्त दीर्घ रजेवर गेले आहेत. ते परदेशात उन्हाळी सुट्टीला गेले आहेत. त्यामुळे अगोदरच सुस्त व बेशिस्त झालेले पालिका प्रशासन आणखी सुस्तावले व गैरजिम्मेदार बनले आहे. 

आयुक्तानंतर दोन नंबरचे पद अतिरिक्त आयुक्तांचे आहे. मात्र, ते रिक्त आहे. त्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांकडे आहे. मात्र, त्यांच्यावरही आपल्याच महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग केल्याचा आरोप झाला आहे. इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे एकापेक्षा अधिक पदांची अतिरिक्त जबाबदारी आहे. त्यामुळे एकूणच प्रभारी पालिका प्रशासन जनतेच्या दृष्टीने भारी ठरत आहे. त्याचा गैरफायदा लोकप्रतिनिधी वरीलप्रकारे घेत आहेत. त्यामुळे प्रशासन सुस्त आणि नगरसेवक, मात्र मस्त (की मोकाट) असे चित्र सध्या पिंपरी पालिकेत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com