pimpari-chinchwad-mayorship-bjp-corporator-meet-CM | Sarkarnama

पिंपरी-चिंचवड महापौरपदासाठी माळी विरुद्ध कुणबी रस्सीखेच 

उत्तम कुटे 
रविवार, 29 जुलै 2018

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. हे पद आपल्याकडेच राखण्यासाठी भाजपमधील दोन गट जोरात कामाला लागले आहे. त्यामुळे आता हे पद भोसरीतच राहाते की चिंचवडकडे जाते याकडे साऱ्या शहराचे लक्ष लागले आहे. 

पिंपरीः पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. हे पद आपल्याकडेच राखण्यासाठी भाजपमधील दोन गट जोरात कामाला लागले आहे. त्यामुळे आता हे पद भोसरीतच राहाते की चिंचवडकडे जाते याकडे साऱ्या शहराचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, ओबीसीसाठी राखीव असलेले पिंपरी-चिंचवडचे महापौरपद आपल्याकडे राखण्यासाठी काल भोसरीच्या आमदार गटाने माळी कार्डाची खेळी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील तब्बल 35 नगरसेवकांनी महापौर आपलाच करण्यासाठी थेट मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्षा निवासस्थानच आज गाठले. शत्रुघ्न ऊर्फ बापू काटे यांना महापौर करण्यासाठी 43 नगरसेवकांच्या सह्यांचे पत्र यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. त्यानंतर सर्वांशी बोलून निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

नितीन काळजे यांनी राजीनामा दिल्याने महापौरपद रिक्त झाले आहे. ते भोसरीतील होते. तसेच भोसरीच्या आमदारांचे समर्थकही आहेत.हे पद भोसरीत राहण्यासाठी काल भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या काही आजी माजी नगरसेवकांनी माळी समाज प्रतिनिधींबरोबर पत्रकारपरिषद घेऊन महापौर माळी समाजाचाच करण्याची मागणी केली होती. त्यावर महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील लगेच आज थेट मुंबई गाठली. दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्र्यांची वेळ त्यांना मिळाली होती. पण त्यापूर्वी मराठा आंदोलनासंदर्भात एक वाजता बैठक होती. ती उशिरा सुरू झाली. परिणामी ती साडेचार वाजेपर्यंत चालली. तोपर्यंत पिंपरी-चिंचवडमधील हा नगरसेवकांचा जथ्था मुंबईत वर्षावर थांबून होता. साडेचारला त्यांना भेट मिळाली. त्यावर सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतो, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे ही भेट घेतलेल्या एका नगरसेवकाने सांगितले. 

नमूद करण्याजोगी बाब म्हणजे शहराचे कारभारी असलेले चिंचवडचे आमदार आज या नगरसेवकांबरोबर नव्हते. तसेच काल भोसरीतील आजी,माजी नगरसेवकांनी घेतलेल्या पिंपरीतील पत्रकारपरिषदेला भोसरीचे आमदार हजर नव्हते. त्यांचे समर्थकच हे पद आपल्याकडे राखण्यासाठी इरेला पेटलेले दिसत आहेत. त्यातून काल पक्के झालेले शहराचे महापौरपद कुणाकडे जाणार याविषयी आज पुन्हा दोलायमान स्थिती निर्माण झाली आहे. त्यातून पुन्हा कुणबी ओबीसी नगरसेवकाकडेच शहराच्या पहिल्या नागरिकाचा बहुमान जाणार असल्याची शक्‍यता बळावली आहे. महापौरपदासाठी चार ऑगस्टला निवडणूक आहे.पण परवाच (ता.31) त्यासाठी अर्ज दाखल करायचा आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यामुळे महापौर माळी होतो की कुणबी हे आता परवाच स्पष्ट होणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख