pimpari chinchwad corporation | Sarkarnama

पहिल्या लढाईत महेश लांडगेंची बाजी

उत्तम कुटे
गुरुवार, 9 मार्च 2017

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदासाठी भाजपतर्फे नितीन काळजे,तर उपमहापौरपदाकरिता शैलजा मोरे यांनी आज (ता. 9) उमेदवारी अर्ज दाखल केला. याव्दारे शहराच्या पहिल्या नागरिकाचा बहुमान आपल्या गटाकडे खेचून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पालिकेच्या राजकारणातील पहिली लढाई जिंकली आहे.

पिंपरी :  पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदासाठी भाजपतर्फे नितीन काळजे,तर उपमहापौरपदाकरिता शैलजा मोरे यांनी आज (ता. 9) उमेदवारी अर्ज दाखल केला. याव्दारे शहराच्या पहिल्या नागरिकाचा बहुमान आपल्या गटाकडे खेचून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पालिकेच्या राजकारणातील पहिली लढाई जिंकली आहे. तर, उपमहापौरपदी मूळ भाजपच्या जुन्या व एकनिष्ठ अशा मोरे यांना संधी देत नव्या-जुन्याचा मेळ भाजप नेतृत्वाने घालीत या निवडीवरून निर्माण होणारी नाराजी काहीअंशी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

महापौरपद हे ओबीसीसाठी राखीव असून तेथे खरा ओबीसी की कुणबी उमेदवार तसेच जुना की नव्याला संधी देणार यावरून शेवटच्या घटकेपर्यंत नाट्य रंगले होते. या निवडीवरून भाजपने अस्सल ओबीसीला डावलल्याची चर्चा सुरू झाली असून त्यातून काहीअंशी पक्षात नाराजी पसरल्याचे खुद्द पालकमंत्री गिरीश बापट यांनाही मान्य करावे लागले. या निमित्ताने हे प्रतिष्ठेचे पद प्रथमच समाविष्ट गावात गेले.दोन्ही पदांसाठी जुन्या,नव्याचा मेळ घालताना एक पद (महापौर) समाविष्ट गावात,तर दुसरे (उपमहापौर) शहरी भागाला देऊन भाजपने ग्रामीण व शहरी बाज असलेल्या शहराच्या दोन्ही भागांना "अच्छे दिन' देण्याचा प्रयत्न किमान या निवडीत तरी केला आहे.

भाजपच्या गटनेतेपदी नुकतीच भोसरी मतदारसंघातील एकनाथ पवार यांची नियुक्ती झाल्याने महापौरपद हे शहराध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतदारसंघात जाईल, अशी अटकळ होती. मात्र, गटनेतेपदानंतर महापौरपदासाठीही भाजपने चऱ्होली वडमुखवाडी प्रभाग तीन अ मधून निवडून आलेले काळजे यांना संधी दिली आहे.मागील वेळी ते राष्ट्रवादीतर्फे निवडून आले होते. त्यामुळे पालिकेच्या खजिन्याची चावी असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी आता "चिंचवड'मधील नगरसेवकच विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

महापौरपदी नव्यानेच भाजपमध्ये आलेल्या काळजे यांना भाजपने संधी देताना त्यातून जुन्या व एकनिष्ठ भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांत निर्माण होणारी नाराजी उपमहापौरपदी प्राधिकरण, आकुर्डी गावठाण प्रभाग 15 ब मधून निवडून आलेल्या मोरे यांना सधी देऊन काहीअंशी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच भविष्यात खरा ओबीसी महापौर करणार असल्याचे संकेत पक्षाने दिले आहे. त्यामुळे महापौरपदाचा अडीच वर्षाचा कालावधी कमी करण्यात येऊन तेथे एकापेक्षा अधिक इच्छुकांना संधी देण्यात येणार असल्याची शक्‍यता असल्याने महापौरपद हा फिरता रंगमंच होणार आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख