पिंपरीतील भाजपचे नगरसेवक नेवाळेंविरुद्धची तक्रार फिर्यादीकडूनच मागे 

पिंपरीतील भाजपचे नगरसेवक नेवाळेंविरुद्धची तक्रार फिर्यादीकडूनच मागे 

पिंपरी : मिठाई दुकानदाराला मारहाण करून त्याच्या दुकानाची तोडफोड केल्याबद्दलच्या गुन्ह्यात आरोपी असलेले पिंपरी-चिंचवड पालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संजय नेवाळे यांचे नाव वगळण्याची विनंती खुद्द फिर्यादीनेच न्यायालयाकडे केल्याने पोलिसांची गोची झाली आहे. 

यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. चार दिवसांपूर्वी (ता.4) शहरातील निगडी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालेला आहे. 

दरम्यान, गेल्या वर्षी याच पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक तुषार हिंगेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांना अटक करणे पोलिसांना अद्याप शक्‍य झालेले नाही. त्यात आरोपपत्र दाखल झाले आहे. 

गेल्या महिन्यात (ता. 28) एका फेरीवाल्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेविका सुजाता पालांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरुद्धही अद्याप पुरावा मिळाला नाही. त्यामुळे त्यांना अटक केली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्या वैद्यकीय उपचारासाठी शहराबाहेर गेल्या असल्याने त्या; तसेच नेवाळे हेसुद्धा फरार झालेले नाहीत, असे पिंपरी व निगडी पोलिसांनी सांगितले. 

मात्र, या दोघाही नगरसेवकांचे मोबाईल बंद असल्याचे आढळून आले आहे. या दोघांसह गेल्या आठ महिन्यांत भाजपच्या चार नगरसेवकांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यातील फसवणुकीचा गुन्हा असलेले फक्त तुषार कामठे यांनाच अटक झालेली आहे. 

नेवाळे यांचे नाव मागे घेण्याबाबत फिर्यादी दुकानदाराने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामुळे या फिर्यादीच्याच सांगण्यावरून नेवाळे यांचे नाव आरोपी म्हणून गुन्ह्यात दाखल केलेले पोलिस तोंडघशी पडले आहेत. त्यांना आता या गुन्ह्यातून नगरसेवक आरोपीचे नाव वगळावे लागणार आहे.

दुसरीकडे या गुन्ह्यातील इतर आरोपींची नावे, मात्र फिर्यादीने कायम ठेवलेली आहेत. त्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादीचे हे वागणे संशयास्पद असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

दरम्यान, पालांडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यास भाग पाडलेल्या आत्महत्याग्रस्त टपरीचालकाच्या चिठ्ठीभोवती संशयाचे वलय निर्माण झाले आहे. ही चिठ्ठी हस्ताक्षरतज्ज्ञांकडे पाठविण्यात आली आहे. त्यातून त्यातील अक्षर हे मयत टपरीचालकाचेच आहे का, हे कळणार आहे, असे हा गुन्हा दाखल असलेल्या शहरातील पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, मृत टपरीचालकाच्या हस्ताक्षराची जुळवणी करण्यासाठी त्याच्या इतर हस्ताक्षराचे नमुने देण्यास फिर्यादी व मृताच्या कुटुंबाने टाळाटाळ चालविली आहे, याकडे जाधव यांनी लक्ष वेधले आहे. परिणामी 11 दिवसानंतरही पुराव्याअभावी पालांडे यांना अटक करता आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com