पिंपरी पालिकेचा कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू होण्याअगोदरच पेटला 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोशी कचरा डेपोतील दोनशे कोटी रुपये खर्चाचा "वेस्ट टू एनर्जी' हा कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा भोसरीचे भाजपचे सहयोगी आमदार महेशदादा लांडगे यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट' हा "वेस्ट टू मनी' असल्याची टीका शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व श्रीरंगअप्पा बारणे यांनी आज येथे केली.
पिंपरी पालिकेचा कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू होण्याअगोदरच पेटला 

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोशी कचरा डेपोतील दोनशे कोटी रुपये खर्चाचा "वेस्ट टू एनर्जी' हा कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा भोसरीचे भाजपचे सहयोगी आमदार महेशदादा लांडगे यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट' हा "वेस्ट टू मनी' असल्याची टीका शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व श्रीरंगअप्पा बारणे यांनी आज येथे केली. ती करताना त्यांनी आपले कट्टर राजकीय शत्रू महेशदादा यांच्यासह शहराचे कारभारी असलेले भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व पालिका प्रशासनावरही हल्लाबोल केला. या प्रकल्पाची त्यांनी अभ्यासपूर्ण चिरफाड केली. कचरा जाळून पैसे कमवायचा सत्ताधारी भाजप नेतेमंडळीचा हा "उद्योग' आहे, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली. 

पिंपरी-चिंचवडमधील भोसरी हा विधानसभा मतदारसंघ आढळरावांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये, तर चिंचवड हा श्रीरंगअप्पांच्या मावळमध्ये येतो. या दोन्ही मतदारसंघातील कचऱ्याच्या ज्वलंत व गंभीर समस्येला हात घालून या दोन्ही खासदारांनी 2019 चे बेरजेचे राजकारण आतापासूनच सुरू केले आहे. विशेषतः भोसरीकरांच्या मोशीतील शहराच्या कचरा डेपो व तेथील दुर्गंधीप्रकरणी तीव्र भावना आहेत. यानिमित्ताने त्यावर फुंकर घालून दोन्ही खासदारांनी तेथील आपल्या मतदारांच्या भावनेलाच हात घातला आहे. तसेच ही संधी साधून त्यांनी आपल्या संभाव्य प्रतिस्पर्ध्यांनाही टीकेचे जोरदार लक्ष्य केले. अशा रीतीने त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. 

नुकतीच पिंपरी पालिका सभेने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मात्र, देशात कुठेही असा प्रकल्प यशस्वी झालेला नाही. पिंपरीत तो फक्त मलिद्यासाठी राबविला जात आहे. त्याद्वारे पिंपरी-चिंचवडकर करदात्यांच्या दोनशे कोटी रुपयांची उधळपट्टी होणार असल्याने त्याला आपला विरोध आहे, असे शिवसेनेच्या दोन्ही खासदारांनी सांगितले. निविदा प्रक्रिया हॅक करून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना सत्ताधाऱ्यांनी या प्रकल्पाचे कंत्राट दिल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यासाठी पालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग व या विभागाचे अधिकारी निळकंठ पोमण यांनी त्यांना मदत केली, असा ठपका त्यांनी ठेवला. ते देणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या फक्त चार-पाच लोकांचेच त्यातून भले होणार आहे. त्याव्दारे ना कचऱ्याला सुगंध येणार आहे वा ना पिंपरीकरांना अच्छे दिन येणार आहेत, असाही टोलाही त्यांनी लगावला. पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना त्याची कल्पना आहे, मात्र त्यांनी याप्रकरणात धृतराष्ट्राची भुमिका घेतलेली आहे, असा हल्लाबोल त्यांनी सत्ताधारी भाजपला साथ देणाऱ्या पालिका प्रशासनावरही केला. त्यांच्यासह पालिकेचे नुकसान करणाऱ्या प्रकल्पांबाबत संबंधित मंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करूनही "क्‍लीन चीट' मिळत असल्याने त्याचा उपयोग होत नसल्याची अगतिकता त्यांनी व्यक्त केली. 

आढळराव व बारणे म्हणाले,""कचऱ्यापासून नक्की किती वीजनिर्मिती होईल हे माहिती नाही. कारण वीजनिर्मीतीयोग्य असा फक्त वीस टक्के उपलब्ध असणार आहे. परंतु, कचरा जाळून वीज निर्मितीच्या नावाखाली पिंपरी-चिंचवडकर करदात्यांचा पैसा भाजप नेत्यांना "टीपिंग फी' म्हणून 21 वर्षासाठी घशात घालायचा आहे. सत्ताधारी करदात्यांच्या पैशांवर डल्ला मारणार आहेत, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या कामासाठी चार नामवंत कंपन्या निविदा भरणार होत्या. परंतु, त्यांना धमकावण्यात आले. या प्रकल्पात मोठे गौडबंगाल आहे. मोठी गफलत झाली आहे. त्याचा खुलासा भाजपची मास्तरकी करणाऱ्या आयुक्तांनी करण्याची गरज आहे. या प्रकल्पातून किती वीज निर्मिती होईल, याची माहिती नाही. आमचा या प्रकल्पाला विरोधासाठी विरोध नाही. फक्त स्मार्ट सिटी योजनेचा निधी आणून टीपिंग फी न घेता तो राबवावा, अशी आमची रास्त मागणी आहे. तसेच कचऱ्यावर याव्दारे वर्षाला शंभर कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा कचरा वर्गीकरण करणे, त्याविषयी जनजागृती करणे, विभागवार छोटे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करून ओल्या कचऱ्याचे विघटन आणि सुक्‍या कचऱ्याची पुर्ननिर्मिती असे योग्य पर्यायही आहेत'' 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com