मराठा क्रांती मोर्चाचे दुसरे पर्व 29 जूनपासून

मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या सरकारविरोधात मोठा असंतोष असून येत्या 29 जूनला तुळजापूरमध्ये जागरण गोंधळ घालून मराठा क्रांती मोर्चाचे दुसरे पर्व सुरु करण्यात येईल. पुढील सर्व आंदोलने गनिमी काव्याने करण्यात येतील, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये दिली.
मराठा क्रांती मोर्चाचे दुसरे पर्व 29 जूनपासून

पिंपरीः मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही सरकारकडून झालेली नाही. मागण्यांसदर्भात मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या सरकारविरोधात मोठा असंतोष असून येत्या 29 जूनला तुळजापूरमध्ये जागरण गोंधळ घालून मराठा क्रांती मोर्चाचे दुसरे पर्व सुरु करण्यात येईल. पुढील सर्व आंदोलने गनिमी काव्याने करण्यात येतील, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये दिली.
       
मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय प्रतिनिधींची बैठक आज बालेवाडी, पुणे येथे संपन्न झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी बैठकीतील चर्चेबाबत माहिती दिली. मराठा आरक्षणाचे काय झाले? शेतक-यांच्या कर्ज माफीचे काय झाले? शेती मालाला हमीभाव देण्याचे काय झाले? कोपर्डी प्रकरणाचे काय झाले? अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याचे काय झाले? कै. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अनुदानाचे काय झाले? मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत, शिष्यवृत्ती, वसतिगृह देण्याचे काय झाले? अॅट्रोसिटीबाबत कमिटी नेमण्याचे काय झाले? ‘धर्मा पाटील’ यांच्या कुटूंबियांना मदत देण्याचे काय झाले? ‘रामेश्वर भुसारी’ याला मंत्रालयात मारहाण केली पुढे काय झाले? रायगड मध्ये मृत्यूपावलेला ‘अशोक उंबरे’ कुटूंबियांना मदत देण्याचे काय झाले? ‘योगेश पवार’ या युवकाने तुमच्या विरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला त्याचे काय झाले? असे प्रश्न महाराष्ट्रातील सकल मराठा समाज विचारत आहे. याची उत्तरे फडणवीस यांनी द्यावीत, अशी राज्यातील सकल मराठा समाज मागणी आहे, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
       
मराठा विद्यार्थ्यांना सर्व शासकीय सवलती लागू करण्यात याव्यात. मराठा आरक्षण कधी लागू करणार याची मुख्यमंत्र्यांनी तारीख जाहिर करावी. आरक्षण जाहीर होईपर्यंत मराठा समाजाला शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजाच्या मुला, मुलींचा सर्व प्रकारचा शैक्षणिक खर्च; तसेच उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, कृषि विभाग शिक्षण इत्यादी सर्व शैक्षणिक क्षेत्रामध्ये शंभर टक्के फी माफी मिळावी. छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. स्मारक ठरल्याप्रमाणे एकशेवीस मीटर उंच बांधणे, आर्थिक तडजोडीसाठी महाराजांच्या स्मारकाची उंची कमी करु नये. कै. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे महामंडळ फक्त मराठा समाजासाठी सिमीत करुन त्याला राज्य शासनाने ताबडतोब अनुदान द्यावे, जेणेकरुन आर्थिक दुर्बल मराठा समाजाचा युवक, युवती उद्योग उभा करुन स्वत:च्या पायावर उभे राहु शकतील. मराठा समाजाला प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वसतीगृह बांधून द्यावेत व तोपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख वार्षिक वसतिगृह भत्ता वाढवून द्यावा. सन 2014 मध्ये मराठा आरक्षण ईएसबीसी प्रवर्गातून भरती झालेल्या विद्यार्थ्यांना सर्व विभागात तात्काळ सामावून घेण्यात यावे. एक वर्ष तात्पुरत्या स्वरुपाची नेमणूक दिलेल्या विद्यार्थ्यांना कायम करण्यात यावे, याकरीता शासनाने तात्काळ निर्णय घेऊन तीन वर्षापासून रखडलेल्या मराठा विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत रुजू करुन घ्यावे. अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाचा गैरवापर रोखण्यासाठी तालुका व जिल्ह्यावर कमिटी स्थापन करण्यासंदर्भात शासन परिपत्रक काढण्यात यावे. शेतक-यांच्या शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्यात यावा, शेतक-यांचे सर्व कर्ज ताबडतोब माफ करावे,छत्रपती राजर्षी शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ही स्वायत्त संस्था त्वरीत कार्यान्वीत करण्यात यावी व मराठा समाजासाठीच असावी हे ठराव आजच्या बैठकीत करण्यात आले. 
        
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एमपीएससी, युपीएससी स्पर्धा परिक्षा केंद्र उभारण्यात येऊन यासाठी खाजगी शिकवण्या (कोचिंग क्लासेस) शिक्षण प्रशिक्षण व अभ्यासिका यासाठी रोख स्वरुपात अनुदान लागू करण्यात यावे, मराठा विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी भरीव अनुदान तसेच व्हीसा पासपोर्ट यासाठी सवलती देऊन विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च शासनामार्फत करण्यात यावा, मराठा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज सुलभ, विनातारण उपलब्ध करुन देण्यात यावे. सदर कर्जाचे व्याज शासनाने भरावे. शासनाने जाहीर केलेल्या 605 कोर्समध्ये अभियांत्रिकी व वैदयकीय अभ्यासक्रमांचा समावेश करुन अध्यादेश लागू करावा, सदर सवलत सर्व शासकीय व अशासकीय महाविद्यालयांना लागू करावी, याबाबतीत जो शासन निर्णय झालेला आहे तो फसवा असून यातून समाजातील काही विद्यार्थ्यांला सवलत मिळणार नाही, असा शासन निर्णय त्वरीत रद्द करुन सुधारित निर्णय लागू करण्यात यावा, शासनाने जाहिर केलेल्या मराठा वसतिगृहाचे बांधकाम शासनाने करावे व वसतीगृह भाडे तत्वावर चालविण्यास देऊ नये. विद्यार्थ्यांचा वसतिगृह निर्वाह भत्ता संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा या मागण्याही यावेळी करण्यात आल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com