Picture of Fights in Nashik For Assembly Elections | Sarkarnama

नाशिक जिल्ह्यात थेट लढतींमुळे शिवसेना, भाजपला आघाडीचे आव्हान!

संपत देवगिरे
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

प्रारंभी शिवसेना, भाजप महायुतीला विधानसभा निवडणूक एकतर्फी वाटत होती. मात्र, माघारीच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसेने खेळलेल्या डावपेचांनी युतीचे उमेदवार बचावात्मक स्थितीत आले आहेत. विशेषतः सर्व चारही जागा युतीकडे असलेल्या शहरातील चारही मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उत्साह आहे. त्यामुळे प्रचारातील वातावरण निर्मितीवर सर्वांचा भर आहे.

नाशिक : प्रारंभी शिवसेना, भाजप महायुतीला विधानसभा निवडणूक एकतर्फी वाटत होती. मात्र, माघारीच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसेने खेळलेल्या डावपेचांनी युतीचे उमेदवार बचावात्मक स्थितीत आले आहेत. विशेषतः सर्व चारही जागा युतीकडे असलेल्या शहरातील चारही मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उत्साह आहे. त्यामुळे प्रचारातील वातावरण निर्मितीवर सर्वांचा भर आहे.

जिल्ह्यात पंधरा मतदारसंघ आहेत. यामध्ये भाजप 4, शिवसेना 4, राष्ट्रवादी कॉंग्रेस 4, कॉंग्रेस 2, माकप 1 असे संख्याबळ आहे. यामध्ये शहरातील नाशिक पूर्व, पश्‍चिम, मध्य भाजप तर देवळाली शिवसेनेकडे आहे. या चारही मतदारसंघात सध्या तुल्यबळ लढतींचे चित्र आहे. यामध्ये कॉंग्रेस आघाडीकडे गमावण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे महायुतीला या जागा राकण्यासाठी मतदारसंघ पिंजुन काढावा लागेल. महापालिकेसह प्रमुख सत्ता केंद्र भाजपकडे आहेत. त्यामुळे विरोधकांचे वारेमाप प्रश्‍न, विकास दाखवा हे आव्हान यात काय काम केले? याची उत्तरे देण्याची वेळ त्यांच्या उमेदवारांवर आली आहे.

नाशिक पश्‍चिम : सीमा हिरे
या मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे विद्यमान उमेदवार आहेत. शिवसेना, भाजपकडे नगरसेवकांची मोठी ताकद आहे. त्यामुळे भाजपला ही जागा सोपी वाटत होती. मात्र, त्यावर शिवसेनेने दावा केला होता. जागावाटपात ते झाले नाही. त्यामुळे शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी बंडखोरी केली. शहरातील पस्तीस नगरसेवक त्यांचा प्रचार करीत आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे दिलीप दातीर यांनी राजीनामा देत 'मनसे'ची उमेदवारी केली आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना एकमेकांशीच लढत आहेत. त्यांच्या या वादात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अपूर्व हिरे यांनी आपली यंत्रणा सक्रीय करीत प्रचारात ताकद झोकली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही हिरेंची मदार खानदेशी मतांच्या धृवीकरणावर आहे. शिवसेनेचे बंडखोर व मनसे स्थानिक मतदारांवर भिस्त आहे. याचा सर्वाधीक तोटा मित्र पक्ष शिवसेनेच्या उमेदवारामुळे भाजपला होऊ शकतो. त्यातून त्या कशा बाहरे पडता याची उत्सुकता आहे.

Image result for devyani farande

नाशिक मध्य : देवयानी फरांदे
नाशिक मध्य मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे विद्यमान उमेदवार आहेत. येथे दहा उमेदवार आहेत. यामध्ये मनसेचे माजी आमदार नितीन भोसले, कॉंग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचे मोठे आव्हान आहे. येथे कॉंग्रेसने माघार घ्यावी व मनसेला सेफ पॅसेज द्यावा. त्या बदल्यात 'मनसे'च्या उमेदवाराने इगतपुरीत माघार घेऊन कॉंग्रेसला बाय द्यावा असे प्रयत्न झाले. त्यात ऐनवेळी मनसेच्या उमेदवाराने नकार दिल्याने हा डाव फसला. आता भाजप विरोधी मतांची विभागणी अटळ आहे. त्याचा फायदा सर्वस्वी भाजपच्या देवयानी फरांदे यांना होतांना दिसतो. यामध्ये शहरातील उच्चभ्रू भागात कॉंग्रेस किती शिरकाव करते व जुने नाशिक भागात भाजप किती मुसंडी मारते यावर निकाल ठरेल. सध्या तरी येथे भाजपमध्ये उत्साह आहे.

नाशिक पूर्व : बाळासाहेब सानप
नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे बाळासाहेब सानप विद्यमान आमदार आहेत. महापालिकेसह पक्षाच्या राजकारणात त्यांची पकड होती. मात्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मर्जी खप्पा झाल्याने त्यांची उमेदवारी हुकली. त्याएैवजी ऐनवेळी 'मनसे'चे इच्छुक राहूल ढिकले यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे बाळासाहेब यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेत उमेदवारी केली. येथे माघारीच्या शेवटच्या दिवशी वरिष्ठ स्तरावर घडामोडी होऊन 'मनसे'चे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतली. त्यामुळे सध्या तरी सानप विरुध्द ढिकले अशी लढत आहे. या लढतीला पक्षीय राजकारणापेक्षाही मराठा विरुध्द 'ओबीसी' असा रंग मिळाला आहे. त्यामुळे भाजपचे वर्चस्व असले तीर खुद्द भाजप नगरसेवकांत सानप यांच्या विषयी सहानुभूती लपुन राहिलेली नाही. त्यादृष्टीने प्रारंभी भाजपला एकतर्फी वाटणारी ही लढत आता तुल्यबळ झाली आहे.

Image result for yogesh Gholap facebook

देवळाली : योगेश घोलप
या मतदारसंघात शिवसेनेचे योगेश घोलप विद्यमान आमदार आहेत. त्यांची उमेदवारी नक्की होती. मात्र युती फिस्कटेल या आशेने भाजपमध्ये दहा इच्छुक देव पाण्यात बुडवून बसले होते. त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले. त्यामुळे दोन वर्षे तयारी करीत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लक्ष्मण मंडाले यांची उमेदवारी पक्षातील सर्व्हे अन्‌ राजकीय पंडीतांमुळे कापली गेली. त्यामुळे नाराज मंडालेंचे चिरंजीव सिध्दांत मंडाले यांनी 'मनसे'ची उमेदवारी केली. तर भाजपच्या नगरसेविका सरोज अहिरे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली. आता ही तिरंगी लढत आहे. त्यात घोलप विरोधातील मतांची किती फाटाफूट होते यावर निकाल ठरेल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख