Phadanavis Govt Must go - Ajit Pawar | Sarkarnama

राज्यातील फडणवीस सरकार जाऊ दे - पवारांचे अंबाबाईला साकडे

निवास चौगुले
मंगळवार, 25 एप्रिल 2017

राज्यातील शेतकरी कर्जाच्या खाईत आहे, त्यातून आत्महत्या वाढलेल्या आहेत. या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची सुबुध्दी फडणवीस सरकारला दे व राज्यातील हे सरकार जाऊ दे, असे साकडे देवीला घातले - अजित पवार

कोल्हापूर - शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेली संघर्ष यात्रा आज कोल्हापुरात दाखल झाली. सकाळी साडे आठ वाजता राजर्षि शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला अभिवादन केल्यानंतर यात्रेतील नेत्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकारला सुबुध्दी दे आणि राज्यातील हे फडणवीस सरकार जाऊ दे असे साकडे आज अंबाबाईला घातल्याचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्ह्यातील राष्ट्रवादीत खासदार विरोधात सर्वजण अशी स्थिती आहे. याचे चित्रही या यात्रेच्या निमित्ताने पहायला मिळाले. पक्षातील विखुरलेले हे नेते एकत्र येऊ देत अशीही साद देवीला घातल्याचा टोला श्री. पवार यांनी यावेळी श्री. मुश्रीफ यांना लगावला. या यात्रेसाठी काल (ता. 24) रात्रीच पवार यांच्यासह दोन्ही काँग्रेसच्या इतर नेत्यांचे आगमन झाले होते. सकाळी आठ वाजता या सर्वांनी कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. आमदार सतेज पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

त्यानंतर जन्मस्थळाबाहेर नेत्यांसह कार्यकर्त्यांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देऊन हा परिसर दणाणून सोडला. कसबा बावडा येथून ही संघर्ष यात्रा भवानी मंडपातील अंबाबाई मंदीरात आली. यात्रेतील सर्वच नेत्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. देवीकडे काय मागितले या प्रश्‍नावर "राज्यातील शेतकरी कर्जाच्या खाईत आहे, त्यातून आत्महत्या वाढलेल्या आहेत. या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची सुबुध्दी फडणवीस सरकारला दे व राज्यातील हे सरकार जाऊ दे, असे साकडे देवीला घातल्याचे पवार यांनी सांगितले.

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडीक व आमदार हसन मुश्रीफ यांच्यात मतभेद आहेत. त्याची झलक या यात्रेच्या निमित्तानेही पहायला मिळाली. दोन्ही कॉंग्रेसचे सर्व नेते एका बाजूला व खासदार महाडीक एका बाजूला असे पहायला मिळाले. मुश्रीफ यांनी पवार यांना देवीकडे काय मागितले असे विचारल्यानंतर जिल्ह्यातील विखुरलेल्या या नेत्यांची चेहरे एकत्र येऊ देत अशीही साद घातल्याचा टोला पवार यांनी यावेळी लगावला.

या यात्रेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार सुनिल केदार, वसंत चव्हाण, अमर काळे, रामहरी रूनवार, मोहन कदम, राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडीक आदि उपस्थित होते.

बाळूमामा लाही साकडे
कोल्हापुरातून संघर्ष यात्रा कागलमार्गे आदमापूर येथील धनगर समाजाचे देवस्थान असलेल्या बाळूमामा मंदीरात आली. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे वचन सरकारने अडीच वर्षापुर्वी दिले होते पण अजून ते पूर्ण केले नाही, त्याबद्दल मी माफी मागत असल्याचे पवार यावेळी म्हणाले. या समाजाची ही फसवणूक असून बाळूमामाने सरकारला या समाजाला आरक्षण देण्यासाठी शक्ती द्यावी असेही साकडे घातल्याचे ते म्हणाले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख