सुबोधकुमार जैस्वाल यांच्या दराऱ्याने औरंगाबाद रात्री अकरा वाजता बंद होत असे 

१९८५च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले जैस्वाल आपल्या आक्रमक आणि कोणाचेही दडपण न घेता नियमावर बोट ठेवून काम करण्याच्या स्वभावामुळे मुंबईतही चर्चेत राहतील .
Subodhkumar--Jaiswal
Subodhkumar--Jaiswal

ही गोष्ट आहे १९८८ वर्षाची . तेंव्हा औरंगाबाद शहर भीषण धार्मिक दंगलींनी गाजत होते. १९८७- ८८ या दोन वर्षात शहरात लहान मोठ्या चकमकी, जाळपोळ ,आणि हिंसाचाराच्या घटना घडत असत . अफवांचे पीक जोरात असे . औरंगाबाद महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभा पोलीस बंदोबस्तात होत असत . शहरातील संवेदनशील भागातील चौका-चौकात एसआरपी जवानांच्या राहुट्या आणि सशस्त्र  जवानांचा खडा पहारा असे चित्र  असे . तेंव्हा औरंगाबादला पोलीस अधीक्षक कार्यालय होते .

या धार्मिक ताण तणावाच्या काळात सुबोधकुमार जैस्वाल औरंगाबाद शहराचे सहायक पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेले . कमी उंची ,गोरा  रंग , मिलिटरी कट आणि पीळदार शरीरयष्टी असलेले सुबोधकुमार साध्या वेशात  कॉलेजकुमारच वाटायचे . मे  १९८८ मध्ये औरंगाबाद शहरात खूपच भीषण दंगल झाली होती . त्याकाळात सुबोधकुमार जैस्वाल यांचे 'डेअर डेव्हील' अधिकारी  म्हणून खूप नाव झाले .

 तलवारी घेऊन आमने सामने हिंसाचार  जमावात बिनधास्त  घुसून ते लाठीमार करण्यात आघाडीवर असत . दंगलखोर गुंडांना घरात  घुसून मारहाण करून ते बेड्या ठोकत असत . दंगलीच्या काळात पोलिसांनी पकडून आणलेल्या काही गुंडांना सोडावे म्हणून सिटी चौक पोलीस ठाण्यात  दमदाटी करणाऱ्या एका बड्या नेत्याला सुबोधकुमार यांनी चक्क रिव्हॉल्व्हर रोखून उलटा दम  भरला होता . सुबोधकुमार जैस्वाल यांच्या बाणेदारपणाच्या अनेक गोष्टी तत्कालीन पोलीस कर्मचारी सांगतात . 

 शहरातील संघातील गुन्हेगारांचे मटका - जुगार असे धंदे त्यांनी योजनापूर्वक आणि आक्रमक कारवाया करीत बंद पाडले  होते  .  शहर आणि जिल्ह्यात दहशत असलेल्या अनेक बड्या गुंडांना सुबोधकुमार यांनी निडरपणे बेड्या ठोकलेल्या होत्या . मात्र यापैकी काहीजण न्यायालयातून झटपट जामीन मिळवून बाहेर पडत असत . आता राज्याचे ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असलेले अरविंद सिंग त्यावेळी औरंगाबादला सहायक जिल्हाधिकारी होते . या दोघांनीं मिळून राजकीय दडपणाला न जुमानता न्यायालयातून झटपट जामिनावर सुटणाऱ्या अनेक  बड्या कुविख्यात गुन्हेगारांना हद्दपार केले तर काहींना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली स्थानबद्ध करून जेरीस आणले होते . 

रात्री अपरात्री हाणामाऱ्या होऊ नयेत म्हणून रात्री अकरा वाजता औरंगाबादेतील दुकाने बंद करण्याचा नियम सुबोधकुमार यांनी शहरात केलेला होता  . रात्री अकराला जैस्वाल यांचा नाईट राउंड जीपमधून सुरु झाला की संपूर्ण शहरातील दुकाने बंद असायची . रस्त्यावर झिंगत हिंडणाऱ्या मद्यपीना आणि अकारण घोळका करून उभे राहणाऱ्यांना सुबोधकुमार यांच्या काठीचा प्रसाद मिळत असे .

शाळा महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्यांना  पकडून चोप देण्याचा त्यांचा फंडा होता . त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समज देऊनच मगच सुटका केली जाई . दुसऱ्यावेळी तोच तरुण छेडछाडीत पकडला गेला तर त्याचे मुंडण करण्याचा त्यांचा खाक्या होता . कायद्याची भीती गुंडाना वाटलीच पाहिजे यासाठी ते आग्रही असायचे . 

सर्वसामान्य नागरिकांची बाजू खरी असेल तर त्याच्या बाजूने ठामपणे उभे राहून त्याला न्याय मिळवून देणारा अधिकारी असा सुबोधकुमार यांचा शहरात नावलौकिक होता . औरंगाबादचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि नंतर प्रभारी अधीक्षक असे तीन वर्षे त्यांनी औरंगाबादला काम केले . त्यांची उस्मानाबादला बदली झाली तेंव्हा नागरिकांनी ही बदली रद्द व्हावी म्हणून तत्कालीन मंत्र्यांना निवेदने दिली. बदली रद्द व्हावी म्हणून अनेक संघटनांनी  जाहीर पत्रके काढली होती . 

औरंगाबादकरांचे असे प्रेम लाभलेला हा अधिकारी ताठ कण्याचा आणि राजकीय नेत्यांशी पंगा घेणारा आहे .   त्यामुळे  कधी गडचिरोली तर कधी एटीएसमध्ये  ते दिसले . स्पेशल प्रोटेशन ग्रुप मध्ये आधी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव आणि नंतर अटल बिहारी वाजपेयी   यांच्या पुढेमागे टेलिव्हिजनवर सुबोधकुमार जैस्वाल दिसले की औरंगाबादकरांना अभिमान वाटे .  मुंबई पोलीस आयुक्तालयात अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करताना तेलगीच्या बनावट स्टॅम्प  प्रकरणाचा त्यांनी केलेला तपास देशभरात गाजला होता .

  एटीएसमध्ये असताना त्यांनी २००६च्या  मुंबईच्या लोकल ट्रेनमधील बॉम्बस्फोट प्रकरणाचा कुशलतेने तपस केला होता . २००९ पासून ते रिसर्च अँड ऍनालिसिस विंग (रॉ ) मध्ये कार्यरत होते .  देशासाठी गुप्तहेर म्हणून त्यांनी परदेशात केलेल्या कामगिरीवर दिल्लीतील वरिष्ठ खुश आहेत  असे समजते . १९८५च्या बॅचचे  आयपीएस अधिकारी असलेले जैस्वाल  आपल्या आक्रमक आणि कोणाचेही दडपण न घेता नियमावर बोट ठेवून काम करण्याच्या  स्वभावामुळे  मुंबईतही चर्चेत राहतील .

मुंबई प्रदीर्घ काळ त्यांनी काम केलेलं असल्याने त्यांना मुंबईच्या गुन्हेगारी जगताची चांगलीच माहिती असणार आहे . ३२ वर्षांच्या सेवेनंतर आणि बरेच जग पाहिल्यानंतर अनुभवाने आता त्यांच्या स्वभावातील आक्रमकता  थोडी कमी झाली असेल पण सत्याची चाड कमी होणार नाही . सर्वसामान्य मुंबईकरांना जैस्वाल यांचे अस्तित्व काही दिवसात जाणवेल .  प्रसिद्धीपासून दूर राहणारे जैस्वाल  मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर  आपला ठसा कसा  उमटवतात हे पाहायचे . 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com