मी राष्ट्रवादीला धक्के दिल्याने पवारांचा माझ्यावर राग : चंद्रकांतदादा पाटील

मी राष्ट्रवादीला धक्के दिल्याने पवारांचा माझ्यावर राग : चंद्रकांतदादा पाटील

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील मोठ्या बहुमताने युती पुन्हा सत्तेवर येण्याचा दावा केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी उजवी ठरल्याने आणि विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाला कंटाळल्याने राज्यात पुन्हा दमदार कामगिरी करण्याची संधी जनता देणार असल्याचे त्यांनी सरकारनामाशीबोलताना सांगितले. या मुलाखतीचा अंश

प्रश्न : भाजप-शिवसेना युतीला 220 हून अधिक जागा मिळतील, हा दावा तुम्ही कशाच्या आधाराने करता? 

उत्तर : लोकसभा निवडणुकीच्या निकालात युती ही 227 मतदारसंघांत पुढे होती. राज्यात ज्या पक्षाला एक कोटी 70 लाख मते मिळतात, तो पक्ष सत्तेत येतो. लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला दोन कोटी 74 लाख मते मिळाली. त्याआधारे 250 जागा मिळायला हव्यात; पण एक, त्यातही किमान आकडा म्हणून 220 जागा मिळतील. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यघटनेतील 370 कलम रद्द झाले. तिहेरी तलाक रद्द झाला. कंपन्यांना करसवलत मिळाली. मोदींना परदेशात प्रचंड प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्रात सरकारने विविध निर्णय मार्गी लावले. या सर्वांच्या आधारे आम्हाला 220 जागा मिळतील. हा काही हवेतील आकडा नाही. 

प्रश्न : ईडीने (सक्तवसुली संचालनालय) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्याबद्दल जनतेत सहानुभूती निर्माण झाली आहे... 

उत्तर : शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात सरकारची काहीच भूमिका नाही, हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे पवारांना सहानुभूती मिळण्याचा प्रश्नच नाही. उलट पवार या वयात कशासाठी एवढी धडपड करताहेत, असा प्रश्न जनतेला पडलाय. याशिवाय, पवारांच्या राजकारणाचा लोकांना कंटाळा आलाय. जनतेला फार काळ थापा मारलेले आवडत नाही. काही काळ ते खपूनही जाईल; पण सर्वकाळ नाही. पवारांनी अनेकांचे राजकारण संपविले. समोरच्याला किरकोळीत काढलं आहे. तसे आता होणार नाही. 

प्रश्न : तुमचा आणि शरद पवारांचा एवढा वाद का आहे? 
उत्तर : पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला पश्‍चिम महाराष्ट्रातून आम्ही हद्दपार केले. सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी राष्ट्रवादीचा एकही खासदार नाही. त्यांचा बालेकिल्ला ढासळलाय. भाजपच्या वतीने हे सगळं कोण करतं आहे? राष्ट्रवादीला भवितव्य नाही, हे कोण सांगत होतं? तर मी हे सारे करत आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पवारांचा माझ्यावर थेट राग आहे. 

प्रश्न : तुम्ही स्वतःचा उल्लेख पाकीट असा करता आणि पक्ष ज्या पत्त्यावर पाठवेल तेथे मी जातो, असे सांगता. 2014 पासून तुमचं पाकीट योग्य ठिकाणी पडतंय, हे कसं काय? 

उत्तर : संघटना दहा हजार डोळ्यांनी तुम्हाला पाहत असते. बरं वागलात तर त्याचं फळ मिळतं. चुकीचं वागाल तर त्याचे शासनही करते. मला 2014 च्या आधीपासूनच विविध जबाबदाऱ्या मिळत आल्यात. पारदर्शक पद्धतीने काम करत असल्याने आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची माझी पद्धत असल्याने संघटना माझा विचार करत असावी. 

प्रश्न : खडसे, तावडे, बावनकुळे यांच्या पाकिटाचा पत्ता या वेळी कसा काय चुकला? 

उत्तर : त्यांचं काय चुकलं, हे मला माहीत नाही. आमच्या पक्षात गुपिते ठेवली जातात. ती संबंधित व्यक्तींशिवाय कोणाला माहीत नसतात; पण पक्षाची जबाबदारी त्यांना दिली जाईल, असे वाटतंय. 

प्रश्न : तुमच्या पाकिटाचा पुढचा पत्ता मंत्रालयातील सहावा मजला (मुख्यमंत्रिपद) असेल, असे बोलले जातेय. 
उत्तर : मला काहीही माहीत नाही. मी आध्यात्मिक माणूस आहे. त्या अर्थाने चार तास पूजाअर्चा करणारा नव्हे; पण जे काही घडायचं असेल ते घडेल. ते आपल्या हातात नसतं, अशा वृत्तीवर भरवसा ठेवून मी माझे काम करत असतो. 

प्रश्न : भाजप सरकार हे फेकू सरकार आहे, अशी टीका नेहमी होते. त्याबद्दल काय सांगाल? 
उत्तर : चुकीची टीका आहे. आमच्या सरकारने 2014 मध्ये दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. मराठा आरक्षणासारखा किचकट विषय मार्गी लावला. धनगर समाजाला सवलती दिल्यात. विविध योजनांचे महाराष्ट्रात सव्वा कोटींहून अधिक लाभार्थी आहेत. शेतकरी कर्जमाफी पारदर्शक पद्धतीने केली. शहरातील पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला. त्यामुळे अशी टीका गैर आहे. 

प्रश्न : पुन्हा सत्तेवर आला तर भाजप-शिवसेना सरकारचे प्राधान्य कशाला असेल? 
उत्तर : दुष्काळमुक्त महाराष्ट्र हे आमच्या सरकारचे प्राधान्य असेल. सर्वांना निवारा, नळाद्वारे पाणीपुरवठा ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्वप्ने आहेत. त्यासाठी काम केले जाईल. नवा महाराष्ट्र उभारण्याचा पाया आम्ही गेल्या पाच वर्षांत घातला. त्यासाठी जनतेने आम्हाला साथ दिली. महाराष्ट्र उभारणीचा वेग पुढील पाच वर्षांत आणखी वाढलेला दिसेल. 

प्रश्न : पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागेल, हे पक्षाने केव्हा सांगितले होते? 
उत्तर : अध्यक्ष अमित शहा यांनी महाजनादेश यात्रेच्या सोलापूर येथील सभेच्या वेळी, महिनाभरापूर्वी विधानसभा निवडणूक लढविण्याचे सूतोवाच केले होते. पण, मी त्यासाठी तयार नव्हतो. उमेदवार निश्‍चित करण्याच्या बैठकीत शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत कोथरूड मतदारसंघावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे पक्षाचा आदेश मला मान्य करावा लागला. कोथरूडमध्ये सर्व कार्यकर्ते मनापासून काम करत आहेत. त्यामुळे विरोधकांनी येथे दिवास्वप्ने पाहून उपयोग नाही. 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com