पेणमध्ये उमेदवारांना विश्वासात न घेताच "स्ट्रॉंग रुम " सील;  काँग्रेसतर्फे  आक्षेप - Pen congress candidate complaint about sealing strong room | Politics Marathi News - Sarkarnama

पेणमध्ये उमेदवारांना विश्वासात न घेताच "स्ट्रॉंग रुम " सील;  काँग्रेसतर्फे  आक्षेप

सरकारनामा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

या बाबत  काँग्रेसच्या उमेदवार नंदा म्हात्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा पेण प्रांताधिकारी प्रतिमा पुद्लवाड यांच्या कडे लेखी तक्रार केली .

पेण :  पेण मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवारांना विश्वासात न घेता ईव्हीएम मशीन ठेवण्यात येणारी "स्ट्रॉंग रुम" एकच अपक्ष उमेदवार हजर असताना सील केले.  

या बाबत  काँग्रेसच्या उमेदवार नंदा म्हात्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा पेण प्रांताधिकारी प्रतिमा पुद्लवाड यांच्या कडे लेखी तक्रार केली असून पुन्हा एकदा सर्व उमेदवार यांचे समोर "स्ट्रॉंग रूम" सील करावी तसेच उमेदवार नसताना सील करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमची व्हिडीओ सीडी मिळावी अशी मागणी केली आहे.

सोमवारी रात्री उशिरापर्यंत ईव्हीएम मशीन सील करण्याची प्रक्रिया सुरु होती ; मी स्वतः रात्री 1:30 पर्यंत उपस्थित होते असे नंदा म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.तिथे उपस्थित असलेल्या अधिकारी यांनी स्ट्रॉंग रूम सील करताना आपणास बोलाविले जाईल असे सांगितले असे म्हटले आहे.

मात्र मंगळवारी सकाळी दहा वाजता प्रांताधिकारी कार्यालयात मिटींग साठी गेले असता मंगळवारी( ता.22) सकाळी सात वाजता स्ट्रॉंग रुम सील करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. स्ट्रॉंग रुम सील करतांना अपक्ष उमेदवार अमोद मुंढे हे एकमेव उपस्थित होते.

भाजप,शेकाप,बसप,वंचित आघाडीचे व इतर कोणतेही अपक्ष उमेदवार उपस्थित नसल्याने पुन्हा एकदा सर्व उमेदवारां समोर स्ट्रॉंग रूम सील करण्याची मागणी नंदा म्हात्रे यांनी तक्रार अर्जात केली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रक्रिये पासून आम्हाला जाणून बुजून दूर ठेऊन लोकशाहीने आम्हाला दिलेल्या अधिकाऱ्यांची पायमल्ली केला असल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार नंदा म्हात्रे यांनी केला आहे.

पेणच्या निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिमा पुद्लवाड म्हणाल्या ,   स्ट्रॉंग रुम सील करण्याबाबत सर्व उमेदवारांना पत्र दिले होते. ईव्हीएम मशीन जमा होण्यासाठी उशीर झाला होता. स्ट्रॉंग रूम सील करण्या अगोदर सर्व उमेदवारांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न  करण्यात आला मात्र संपर्क झाला नाही.स्ट्रॉंग रूम सील होईपर्यंत उपस्थित राहणे हे उमेदवारांचे कर्तव्य होते.  अमोद मुंढे हे एकमेव अपक्ष उमेदवार या वेळी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख