Pehlu KHan was a farmer to a butcher | Sarkarnama

गोरक्षकांच्या हल्ल्यात बळी गेलेला कसाई नव्हे तर शेतकरी

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 एप्रिल 2017

राजस्थानमध्ये कत्तलखान्यात नेण्यासाठी गायींची चोरटी वाहतूक करण्यास बंदी असली तरी कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. याप्रकरणी संबंधित सदस्यांवर योग्य कारवाई केली जाईल - गुलाबचंद कटारिया, गृहमंत्री राजस्थान

जयपूरः राजस्थानमध्ये गायींची चोरटी वाहतूक करण्याच्या संशयावरून तथाकथित गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यात बळी गेलेली व्यक्ती कसाई नव्हे तर शेतकरी असल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलू खान (वय 55, रा. हरियाना) यांच्यासह इतर चारजण वाहनातून गायी घेऊन जात होते. गोरक्षकांनी त्यांना अडवले तेव्हा त्यांनी आपण गायी खरेदी केल्या असल्याचा पुरावाही दाखवला. परंतु, गायींची हत्येसाठी वाहतूक करत असल्याबद्दल तथाकथित गोरक्षकांनी पाच जणांवर हल्ले केले होते. मारहाणीत पहलू खान (वय 55, रा. हरियाना) या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. खान हे कसाई नव्हे तर शेतकरी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दुधाच्या व्यवसायासाठी त्यांनी गायी खरेदी केल्या होत्या. खान यांना मारहाण करणाऱया तिघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

'राजस्थानमध्ये कत्तलखान्यात नेण्यासाठी गायींची चोरटी वाहतूक करण्यास बंदी असली तरी कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. याप्रकरणी संबंधित सदस्यांवर योग्य कारवाई केली जाईल,'' असे आश्‍वासन राज्याचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी दिले.

दरम्यान, विश्व हिंदू परिषद आणि बंजरंग दलाशी संबंधित गोरक्षकांनी शनिवारी (ता. 1) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठवरील जगुवास चौकात चार वाहने अडवली. त्या वाहनांतून बेकायदेशीरपणे गायी नेण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. ही वाहने जयपूरहून येत होती. ती हरियानातील नूह जिल्ह्यात जात असताना हा प्रकार घडला, असे बेहरोर पोलिस ठाण्याचे प्रमुख रमेशचंद सिनसिनवार यांनी सांगितले.

त्या वाहनांतील लोकांवर हल्ला केला त्यावेळी तथाकथित गोरक्षकांनी अर्जून नावाच्या चालकाला सोडून दिले. पाचही पीडित लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी पेहलू खान यांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख