PCMC Standing Committee Chairman will be from Chinchwad | Sarkarnama

"स्थायी'अध्यक्ष "चिंचवड'चे होणार फक्त महिला की पुरुष ही उत्सुकता

उत्तम कुटे - सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 23 मार्च 2017

स्थायीचे सभापती तथा अध्यक्ष यांच्या निवडीकडे आता संपूर्ण शहराचे व राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. महापौर आणि सभागृहनेते ही दोन्ही पदे भोसरीकडे, तर उपमहापौरपद हे पिंपरीत गेले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या खजिन्याची चावी असलेल्या स्थायी समितीचे सदस्य निवडताना भाजपने शहरातील आपले दोन्ही आमदार (भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप) दादा आणि भाऊ यांच्या समर्थकांना गुरुवारी (ता.23) समसमान संधी दिली. त्यामुळे या दोघांचीही महापालिकेच्या खजिन्यावर पकड राहणार आहे. मात्र, समितीचा अध्यक्ष शहरातील भोसरी, चिंचवड आणि पिंपरी या तीनपैकी कुठल्याही मतदारसंघातील झाला,तरी तो भाऊंचाच समर्थक असणार आहे.

कारण भाजपच्या दहा स्थायी सदस्यांतील या पदासाठीचे तिन्ही प्रमुख दावेदार हे भाऊंचेच खंदे पाठीराखे आहेत. त्यामुळे सीमा सावळे (भोसरी), आशा शेंडगे (पिंपरी) आणि हर्षल ढोरे (चिंचवड) यापैकी कुणाची निवड होणार हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पुरुष की महिला अध्यक्ष हीच काय ती उत्सुकता आता बाकी राहिली आहे.

नव्या सभागृहाच्या दुसऱ्या मासिक सर्वसाधारण सभेत स्थायीसह महिला-बालकल्याण, शहर सुधारणा आणि कला, क्रीडा, साहित्य या चार विषय समित्यांचे सदस्य निवडण्यात आले. पालिकेत बहुमत असलेल्या भाजपचा त्यात वरचष्मा राहिला.

स्थायीच्या 16 पैकी दहा सदस्य भाजपचे, चार राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि अपक्ष आघाडीचा प्रत्येकी एक सदस्य झाला आहे. भाजपच्या दहामध्ये भोसरी आणि चिंचवडचे प्रत्येकी चार आणि उर्वरित दोन पिंपरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. आता या समित्यांच्या बैठकांत त्यांचे अध्यक्ष निवडले जाणार आहेत. त्यातही स्थायीचे सभापती तथा अध्यक्ष यांच्या निवडीकडे आता संपूर्ण शहराचे व राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. महापौर आणि सभागृहनेते ही दोन्ही पदे भोसरीकडे, तर उपमहापौरपद हे पिंपरीत गेले आहे.

सभागृहनेते एकनाथ पवार हे "भोसरी'तील नगरसेवक असले, तरी भाजपचे शहराध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार जगताप यांचे समर्थक आहेत. त्यामुळे स्थायीचे तिसरे महत्त्वाचे पद हे आता चिंचवडकडे जाणार हे उघड गुपित आहे. त्यासाठी आज निवड झालेल्या स्थायीच्या भाजपच्या दहा सदस्यांपैक  सावळे,शेंडगे आणि ढोरे यांची नावे चर्चेत आहेत. हे तिघेही भाऊंचे कट्टर पाठीराखे आहेत.

सावळे व शेंडगे या मागील टर्ममध्ये शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. आतापर्यंत मागासवर्गीय नगरसदस्यांचा महत्त्वाच्या पदासाठी विचार न झाल्याने त्यांना संधी देण्याचा विचार होऊ शकतो. तसेच भाऊंचे खंदे समर्थक असलेल्या ढोरे यांनाही अध्यक्षपद दिले जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा आहे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख