तैलचित्राच्या राजकारणामुळे शिवसेना भडकली !  - pcmc politics | Politics Marathi News - Sarkarnama

तैलचित्राच्या राजकारणामुळे शिवसेना भडकली ! 

उत्तम कुटे 
शनिवार, 27 मे 2017

शिवसेना-भाजपचा राज्य सरकारमधील कलगीतुरा आता पिंपरी-चिंचवडमध्ये पोचला आहे. राज्यात युतीमध्ये सत्तेत असूनही विरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने उद्योगनगरीत, तर मित्रपक्ष भाजपचा निषेधच केला आहे.

पिंपरी : शिवसेना-भाजपचा राज्य सरकारमधील कलगीतुरा आता पिंपरी-चिंचवडमध्ये पोचला आहे. राज्यात युतीमध्ये सत्तेत असूनही विरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने उद्योगनगरीत, तर मित्रपक्ष भाजपचा निषेधच केला आहे. मात्र भाजप पिंपरी पालिकेत पाशवी बहुमत असल्याने शिवसेनेला भीक घालत नाही. त्यामुळे शिवसेनेचा तीळपापड होत आहे. 

महापालिका सभागृहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तैलचित्रे लावण्याच्या समारंभावरून हा वाद युतीत उफाळला आहे. रविवारी (ता.28) ती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत लावण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला ठाकरे कुटुंबातील कोणी व्यक्ती तसेच शिवसेना नेत्यांनाही आमंत्रित न केल्याने शिवसेना भडकली आहे. श्रेय लाटण्यासाठी स्थानिक भाजप नेत्यांचे हे घृणास्पद कृत्य असल्याचे सांगत या कार्यक्रमाला शिवसेना नेत्यांना बोलवा, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख राहूल कलाटे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. मात्र, नागपूरहून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेले मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील आयुक्त श्रावण हर्डीकर हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ठब्दीपूर्तीसाठी नागपूरला रवाना झाले असल्याने शिवसेनेची मागणी मान्य होण्याची शक्‍यता नाही. दुसरीकडे आयुक्त नागपूरहून परतेपर्यंत हा सोहळा संपणार आहे. त्यामुळे युतीतील दरी वाढणार आहे. 

शहरातील विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांनी पालिका सभागृहात शहीद तुकाराम ओंबाळे यांच्यापासून ते स्व.माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यापर्यंत 13 जणांची तैलचित्रे लावण्याची मागणी केली होती. मात्र, दोनच तैलचित्रांसाठी जागा असल्याने कुणाची लावायची हा पेच प्रशासनासमोर उभा राहिला होता. त्याबाबत गेल्या महिन्यात 15 तारखेला सरकारनामाने वृत्त दिले होते. त्यानंतर तोडगा म्हणून सावरकर आणि ठाकरे यांची तैलचित्रे लावण्याचा ठराव 25 एप्रिल रोजी आमसभेने मंजूर केला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख