PCMC politics | Sarkarnama

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे बंड होणार थंड 

उत्तम कुटे : सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 21 मार्च 2017

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नवनियुक्त गटनेते योगेश बहल यांची नियुक्ती पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा प्रश्‍न केल्याने ती कायम राहण्याचे संकेत सोमवारी (ता.20) मिळाले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नवनियुक्त गटनेते योगेश बहल यांची नियुक्ती पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा प्रश्‍न केल्याने ती कायम राहण्याचे संकेत सोमवारी (ता.20) मिळाले. "बहल हटाव' भूमिकेवर आपण ठाम असून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार नसल्याचे बंडाचा झेंडा फडकावलेले नगरसेवक दत्ता साने यांनी पुन्हा स्पष्ट केले. त्यामुळे या पेचावर पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी पुणे येथे बोलावलेली बैठक निष्फळ ठरली. तर, आपली मागणी मान्य न झाल्याने साने यांनी बैठकीतून "वॉकआऊट' केले.
 
बहल यांचे गटनेतेपद राष्ट्रवादीतील नव्याने निवड झालेल्या नगरसेवकांच्या एका गटाला मान्य नसून त्यांना हटविण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी आजपर्यंतची मुदत या गटाचे नेते साने यांनी दिली होती. तसेच ती मान्य झाली नाही, तर भाजपमध्ये जाण्याचे सूतोवाचही त्यांनी केले होते.त्यामुळे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि नव्या नगरसेवकांची बैठक पवार यांनी आज पुणे येथे घेतली. ती अडीच तास सुरू होती. मात्र, बहल यांच्या नियुक्तीचे पत्र विभागीय आयुक्तांकडे देण्यात आल्यानंतर त्याला कायदेशीर मान्यता मिळाल्याने ती आता माघारी घेता येणार नसल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच ही नियुक्ती मी केली असून ती पुन्हा मागे घेतली, तर त्यातून चुकीचा संदेश जाईल, असेही त्यांनी समजावले. गरज वाटली, तर काही महिने वा वर्षभरानंतर बहल यांच्या जागी दुसऱ्याची नियुक्ती करण्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे आपली मागणी मान्य न झाल्याने साने बैठकीतून बाहेर पडले. इतर नगरसेवकांची समजूत काढण्यात,मात्र पवार यशस्वी झाल्याचे समजते. 

मी माझ्या भूमिकेवर ठाम असून बहल हे गटनेते राहिले, तर त्यांना सहकार्य करणार नाही, असे साने यांनी या बैठकीनंतर सांगितले. तसेच राजीनामा देण्याचेही त्यांनी पुन्हा सूतोवाच केले. मात्र, याबाबत कायदेशीर सल्ला अजमावणार असल्याचे सांगत "वेट ऍण्ड वॉच'चेच संकेत त्यांनी दिले. एकजुटीसाठी आणि पक्ष एकसंध ठेवण्याकरिता एक पाऊल मागे घेण्याची आपली तयारी असल्याचे या बहल म्हणाले. त्यातूनच आपण पवार आणि शहराध्यक्ष यांच्याकडे राजीनामा देण्याची तयारी दाखविली असल्याची माहिती त्यांनी दिली. हे पद सोडल्यानंतरही आपण नाराज राहणार नसून पक्षवाढीसाठी नेतृत्व जे सांगेल ते काम करण्यास आपण करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख