खेड आणि मावळच्या विरोधामुळे बंद जलवाहिनीला अडचणी

खेड आणि मावळच्या विरोधामुळे बंद जलवाहिनीला अडचणी

पिंपरी : हवेली तालुक्‍यात समावेश असलेल्या पिंपरी-चिंचवडला 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या दोन महत्वांकाक्षी योजना खेड आणि मावळ 
तालुक्‍यांमुळे रखडल्या आहेत. त्यात आता पालिकेतील नव्या सत्ताधाऱ्यांचीही भर पडली आहे. मावळातील पवना धरणातून बंद जलवाहिनीतून 
पाणी आणण्याचा अनेक वर्षे रखडलेला प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या पालिका प्रशासनाच्या हालचालीस सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच खो दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या काळात खोळंबलेली ही योजना भाजप राजवटीतही मार्गी लागण्याची शक्‍यता कमी आहे. 

या आर्थिक वर्षात बंद पडलेली व अर्धा टीएमसी पाण्याची बचत करणारी पवना बंदिस्त पाइपलाइन योजना योजना पुन्हा सुरू करण्याचा मानस पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी (ता.18) व्यक्त केला. मात्र, त्याला स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी लगेच कडाडून विरोध केला. स्थानिक शेतकऱ्यांना विश्‍वासात घेतल्याशिवाय ही योजना मार्गी लावू देणार नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या या योजनेच्या जलवाहिन्या गंजून गेल्या असून आता त्या भंगारातच निघतील, अशी स्थिती आहे. मावळचे आमदार बाळा भेगडे यांचाही या प्रकल्पाला विरोध आहे. त्यातूनच काही वर्षापूर्वी झालेल्या जनआंदोलनात दोन शेतकऱ्यांचा बळी पोलिस गोळीबारात गेला होता. त्यानंतर हे प्रकरण नाजूक बनले. 

दरवर्षी उद्योगनगरीच्या लोकसंख्येत सात टक्‍यांनी भर पडत आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात एक लिटरनेही पाणीपुरवठ्याचा स्रोत वाढलेला 
नाही.दुसरीकडे पवना नदीवरील रावेत बंधारा येथून शहरासाठी पाणी उचलले जाते. मात्र, धरणातून ते तेथपर्यंत पोचेपर्यंत पाण्याचे उन्हाळ्यात मोठे 
बाष्पीभवन होते तसेच ते मुरलेही जाते. त्यामुळे बंद जलवाहिनीचा मार्ग त्यावर काढण्यात आला. मात्र, स्थानिकांच्या जमिनी त्यात जाणार असल्याने त्यांचा विरोध असून अद्याप तो मावळलेला नाही. परिणामी वाढत्या लोकसंख्येला पुरेसे आणि शहराला 24 तास पाणीपुरवठा देण्यात पहिलाच मोठा अडथळा आला आहे. दुसरीकडे आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्याची योजनाही अशीच रखडली आहे. या धरणांमुळे विस्थापित झालेल्यांचे अद्याप पूर्ण पुनर्वसन झाले नसलेल्यांनी या प्रकल्पालाही विरोध केला आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या मावळ आणि खेडमधील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हवेलीमधील पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचे तोंडचे पाणी पळालेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पालिकेतील सत्ताकाळातील या दोन्ही योजना भाजप राजवटीतही सुरू होण्याची शक्‍यता कमीच आहे. त्यामुळे शहराची 24 तास पाणीपुरवठ्याची महत्वांकाक्षी योजना या दोन्ही प्रकल्पांप्रमाणे रखडण्याची भीती आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com