PCMC BJP in trouble over Mayor elections | Sarkarnama

महापौर निवडीवरून भाजपमध्ये वादळ- 'ओबीसी'ठरतोय पालिकेत कळीचा मुद्दा

उत्तम कुटे - सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 10 मार्च 2017

ओबीसी बचाव हा रस्त्यावरील संघर्ष आता न्यायालयात गेला आहे.
महापौरपदासाठी अर्ज दाखल केलेले काळजे यांच्याविरोधात पराभूत झालेले
राष्ट्रवादीचे घनश्‍याम खेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली
आहे. काळजे यांनी कुणबी मराठा हे ओबीसीचे प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने
मिळविले असून त्याला त्यांनी हरकत घेतली आहे. त्यांची याचिका न्यायालयाने
दाखलही करून घेतली आहे. त्यामुळे येत्या 14 तारखेला काळजे हे
औपचारिकरीत्या महापौरपदी विराजमान झाले, तरी नगरसेवकपद ओबीसी जातीच्या
मुद्यावरून अपात्र ठरते की काय याची टांगती तलवार त्यांच्या मानेवर कायम
राहणार आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सत्तेत येण्यापूर्वीच महापौर
निवडीवरून भाजपमध्ये घमासान सुरू झाले असून त्यासाठी ओबीसी हा कळीचा
मुद्दा ठरला आहे. महापौरपद हे ओबीसीसाठी राखीव असूनही तेथे खऱ्या ओबीसीला
डावलून नुकतेच पक्षात आलेल्या कुणबी ओबीसीला ते पद दिल्याने भाजपमधील मूळ
ओबीसी नगरसेवक आणि कार्यकर्ते यांच्यासह जुने व एकनिष्ठही नाराज झाले
आहेत. त्यापैकी महापौरपदाचे प्रबळ दावेदार असलेले खरे ओबीसी नगरसेवक
संतोष लोंढे यांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे.महापौर निवडीचे
पडसाद स्थायी समिती अध्यक्ष व सदस्यांसह इतर समिती सभापती निवडणुकीत
उमटण्याची शक्‍यता आहे. महापौर निवडीत जुन्या एकनिष्ठांना डावलण्यात
आल्याने जुना नवा संघर्ष भाजपमध्ये पुन्हा उफाळून येण्याची दाट शक्‍यता
आहे. दरम्यान, शहराच्या पहिल्या नागरिकाचे पद ओबीसीसाठी राखीव असूनही
तेथे या प्रवर्गाला डावलण्यात आल्याने आरक्षणाचा काय फायदा, अशी संतप्त
प्रतिक्रिया या घडामोडीवर भाजपच्या एका ओबीसी नगरसेवकाने दिली आहे.

राष्ट्रवादीचा पराभव करून उद्योगनगरीत पालिकेमध्ये भाजपला बहुमत मिळाले
आहे. काल (ता.9) महापौरपदासाठी भाजपच्या वतीने पालिका निवडणुकीपूर्वी
राष्ट्रवादीतून आलेले कुणबी ओबीसी नितीन काळजे यांना महापौरपदासाठी संधी
दिली गेली. त्यामुळे या पदासाठीचे पक्षातील खरे दावेदार संतोष
लोंढे,नामदेव ढाकेसारखे नगरसेवक दुखावले गेले.त्यांच्या कार्यकर्त्यांनी,
तर संतप्त भावना सोशल मिडीयावर व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, महापौरपदी मूळ ओबीसीला डावलण्यात आल्याने ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने आज सायंकाळी येथील महात्मा फुले पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपचे ओबीसी कार्यकर्ते आणि नवनिर्वाचित नगरसेवक लोंढे हे सुद्धा उपस्थित होते.आरक्षणाच्या आमच्या ताटातील पूर्वी ताट हिरावून घेतले. आता वाटीही शिल्लक न ठेवल्याने आंदोलन करावे लागत असल्याचे समितीचे प्रताप गुरव यांनी
यावेळी सांगितले.

न्यायालयात आव्हान देऊन न्याय मिळेपर्यंत कुणबी ओबीसी
हे सत्ता भोगून मोकळे होणार असल्याने आता रस्त्यावरील संघर्षाशिवाय
पर्याय नसल्याचे ते म्हणाले. भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी
आरक्षणाचा मान ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.दरम्यान, लोंढे यांना
इतर पदावर सामावून घेण्याचे आश्‍वासन पक्षाने दिल्याने त्यांनी आपली
भूमिका काहीशी मवाळ केली आहे. निवडून आल्यानंतर लगेच राजीनामा म्हणजे नवी
घातलेली कपडे उतरविण्यासारखे आहे, असे ते म्हणाले.

नव्या महापौरांवर टांगती तलवार?
दरम्यान, ओबीसी बचाव हा रस्त्यावरील संघर्ष आता न्यायालयात गेला आहे.
महापौरपदासाठी अर्ज दाखल केलेले काळजे यांच्याविरोधात पराभूत झालेले
राष्ट्रवादीचे घनश्‍याम खेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली
आहे. काळजे यांनी कुणबी मराठा हे ओबीसीचे प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने
मिळविले असून त्याला त्यांनी हरकत घेतली आहे. त्यांची याचिका न्यायालयाने
दाखलही करून घेतली आहे. त्यामुळे येत्या 14 तारखेला काळजे हे
औपचारिकरीत्या महापौरपदी विराजमान झाले, तरी नगरसेवकपद ओबीसी जातीच्या
मुद्यावरून अपात्र ठरते की काय याची टांगती तलवार त्यांच्या मानेवर कायम
राहणार आहे. तर, स्थायी समिती अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार शत्रुघ्न काटे
यांच्याविरोधातील याच मुद्यावर पराभूत उमेदवार कैलास कुंजीर यांनीही
मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पालिकेच्या
खजिन्याची चावी असलेले स्थायीचे अध्यक्षपद काटे यांच्याकडे गेले,तर
त्यांच्यावरही काळजे यांच्याप्रमाणे टांगती तलवार लटकत राहणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख