pcmc | Sarkarnama

राष्ट्रवादी-भाजप संघर्ष चिघळणार 

उत्तम कुटे 
शनिवार, 22 एप्रिल 2017

विरोधी पक्षनेता असलेल्या राष्ट्रवादीच्या योगेश बहल यांचे कार्यालयही तिसऱ्यावरून दुसऱ्या मजल्यावर हटविण्याचा निर्णय महापौरांनी घेतल्याने आगीत तेल ओतले गेले आहे. निलंबनाची ही कारवाई कायद्याने चुकीची असून ती मागे घेण्यात आली नाही, तरत्याला आव्हान देणार असल्याचे राष्ट्रवादीनेही स्पष्ट केल्याने या संघर्षाला विराम मिळण्याची शक्‍यता दुरावली आहे. 

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रथमच सत्तेत आलेला नवखा भाजप आणि दोन वेळा सत्ता भोगून पायउतार झालेला अनुभवी राष्ट्रवादी या दोन पक्षांतील संघर्ष आणखी टोकदार झाला आहे.मासिक सभेत गुरुवारी गोंधळ घातल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकाचे निलंबन मागे घेणार नसल्याचे स्पष्ट करताना उलट त्यापैकी एकाचे पदच रद्द करण्याचा ठराव भाजप आगामी सर्वसाधारण सभेत आणण्याचा निर्णय भाजपने घेतल्याने या आजी माजी सत्ताधाऱ्यांतील संघर्ष चिघळण्याची शक्‍यता आहे. 

शास्तीकर सरसकट माफ करण्याऐवजी फक्त एक हजार चौरस फुटापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना त्यात सवलत देण्याचा ठराव पालिकेच्या मासिक सभेत संमत करण्यात आल्याने विरोधकांनी गोंधळ घालीत सभेचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे या गैरशिस्तीबद्दल बहल यांच्यासह राष्ट्रवादीच्या चार सदस्यांना आगामी चार सभांसाठी सभेचे पीठासीन अधिकारी असलेले महापौर नितीन काळजे यांनी निलंबित केले होते.त्यातील दत्ता साने या सदस्याने कुंडी फेकण्याचा प्रयत्न केल्याचे हिंसात्मक कृत्य केल्याने त्यांचे पद रद्द करण्याचा ठराव आगामी सभेत आणणार असल्याचे महापौरांनी सांगितले. 

महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यान्वये पहिल्यांदा गैरशिस्त वागणूक करणाऱ्या सदस्याला फक्त एकाच दिवसापुरते निलंबित करता येते. दुसऱ्यांदा त्याच सदस्याकडून असे गैरवर्तन झाले, तर ही कारवाई 15 दिवसांपर्यंत वाढविण्याची या कायद्यात तरतूद आहे. मात्र, महापौरांनी काल पहिल्यांदा गैरवर्तन होऊनही राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांना आगामी तीन सभांसाठी म्हणजे तीन महिन्यांकरिता निलंबित केले आहे. त्यामुळे हा आदेश त्यांना अडचणीचा ठरू शकतो. तसेच निलंबनच अयोग्य ठरत असल्याने त्यानंतर त्यांनी एका सदस्याचे पद रद्द करण्यासंदर्भात आगामी आमसभेत ठराव आणण्याचा दिलेला इशाराही चुकीचा ठरणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख