pcmc | Sarkarnama

कॉंग्रेसच्या पराभवाची कुऱ्हाड शहराध्यक्षावर 

उत्तम कुटे : सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 18 मार्च 2017

नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमधील पक्षाच्या दारुण पराभवाला शहराध्यक्ष सचिन साठे हेच जबाबदार असल्याने त्यांचा
राजीनामा घ्यावा, अशी मागणी शहर कॉंग्रेसच्या 46 पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता.18) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मुंबई येथे भेट घेऊन केली.

पिंपरी : नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमधील पक्षाच्या दारुण पराभवाला शहराध्यक्ष सचिन साठे हेच जबाबदार असल्याने त्यांचा
राजीनामा घ्यावा, अशी मागणी शहर कॉंग्रेसच्या 46 पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता.18) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मुंबई येथे भेट घेऊन केली. त्यामुळे
पालिका निवडणुकीनंतर कॉंग्रेसमधे उफाळलेले बंड कायम असून ते आता साठे यांचा राजीनामा घेईपर्यंत थांबण्याची चिन्हे नाहीत. 

नाराज पदाधिकाऱ्यांनी 13 मार्च रोजी अखिल भारतीय महिला कॉंग्रेसच्या सदस्या आणि माजी नगरसेविका निगार बारस्कर यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन शहर
कॉंग्रेस पक्ष बचाव ही मोहीम सुरू केली आहे. त्याचा दुसरा टप्पा म्हणून आज त्यांनी चव्हाण यांची गांधी भवन येथे भेट घेऊन त्यांच्याकडे तीनपानी तक्रारींचा पाढा
वाचला. तसेच साठे यांनी दिलेला राजीनामा मंजूर करण्याची मागणी केली. साठे यांचा राजीनामा फेटाळण्यात आला नसून त्यावर निर्णय घेणे बाकी असल्याचे
चव्हाण यांनी यावेळी सांगितल्याची माहिती त्यांना भेटलेले एनएसयूआयचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे यांनी सांगितले. त्यांच्यासह बारस्कर, पक्षाच्या पर्यावरण
विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे आदींनी चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि महापालिका निवडणुकीत व्यस्त असल्याने येत्या
काही दिवसांतच साठे यांच्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले असे बारस्कर म्हणाल्या. 

नाराज पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे मांडलेले मुद्दे : 
* पिंपरी-चिंचवड हा एकेकाळचा कॉंग्रेसचा बालेकिल्ला या पालिका निवडणुकीत भुईसपाट 
* अडीच वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत साठे यांचे पक्षवाढीसाठी काहीही काम नाही 
* "नोटा'पेक्षाही थोडी जास्त मते मिळण्याची पक्षावर शहरात नामुष्की 
* निवडून न येणारी व बेस नसलेली ठराविक मंडळी साठे यांनी हाताशी धरल्याने पक्षाचा पराभव 
* "राष्ट्रवादी'शी हातमिळवणी केल्याने उद्योगनगरीत पक्षाचे अस्तित्व संपुष्टात 
* साठे यांचा राजीनामा स्वीकारून दुसरा एकनिष्ठ अध्यक्ष द्यावा 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख