pcmc | Sarkarnama

पालिका खजिन्याची चावी "चिंचवड'कडे 

उत्तम कुटे : सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 18 मार्च 2017

स्थायीच्या सदस्यपदासाठीही वजनदार भाजप नगरसेवकांनी जोरदार व्यूहरचना सुरू केली आहे. अध्यक्ष चिंचवडचा होणार असला,तरी सदस्य हे तिन्ही मतदारसंघातून घेतले जाणार आहे.

पिंपरी : महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेता तथा गटनेतेपद निवडीनंतर आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या खजिन्याची चावी (स्थायी समितीचे अध्यक्षपद) कोणाकडे जाते, याकडे शहराचे लक्ष लागून राहिले आहे. त्यासाठी भाजपच्या मातब्बर नगरसेवकांनी "फिल्डींग'लावली असून हे पद भाजपचे शहराध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकाला मिळणार हे नक्की आहे. फक्त ते प्रभाग 28 (पिंपळे सौदागर) मधील शत्रुघ्न काटे की 17 (वाल्हेकरवाडी- बिजलीनगर) मधील नामदेव ढाके यांच्याकडे जाते याची उत्सुकता असून त्यात काटे यांचे पारडे जड आहे. 

उद्योगनगरीच्या पहिल्या नागरिकाचा बहुमान हा भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी आपल्याकडे घेऊन तेथे आपले समर्थक नितीन काळजे यांची नुकतीच निवड केली तर, उपमहापौरपदी "पिंपरी'तील शैलजा मोरे या जुन्या एकनिष्ठ भाजपची नेमणूक करीत पक्षातील जुना, नवा वाद शमविण्याचा प्रयत्न पालकमंत्री गिरीश बापट यांनी केला आहे. ते करताना महापौरपदाचे मोठे दावेदार असलेले "चिंचवड'मधील नामदेव ढाके आणि शत्रुघ्न काटे यांना डावलण्यात आले. तर, त्यापूर्वी गटनेतेपदी एकनाथ पवार यांची निवड करून हे पदही "भोसरी'ला देण्यात आले. त्यामुळे आता स्थायीचे अध्यक्षपद "चिंचवड'कडेच जाणार आहे, यात शंका नाही. त्यासाठी काटे यांचे नाव आघाडीवर आहे. पिंपळे सौदागर येथील प्रचारसभेत त्यावेळी संरक्षणमंत्री असलेले मनोहर पर्रीकर यांनी शहरात भाजपला सत्ता दिली, तर स्थानिक नगरसेवक महापौर करू, असे सांगितले होते. मात्र, काटे यांना ते पद देण्यात आले नाही. त्यामुळे जगताप यांचे अत्यंत विश्‍वासू असलेल्या काटे यांच्याकडे आता स्थायीचे चेअरमनपद सोपविले जाण्याची मोठी शक्‍यता आहे. जुन्या, नव्याचा मेळ घालताना जगताप यांच्याच वर्तुळातील ढाके यांचेही नाव त्यासाठी घेतले जात आहे. 

स्थायीच्या सदस्यपदासाठीही वजनदार भाजप नगरसेवकांनी जोरदार व्यूहरचना सुरू केली आहे. अध्यक्ष चिंचवडचा होणार असला,तरी सदस्य हे तिन्ही मतदारसंघातून घेतले जाणार आहे. त्यात अधिक वाटा हा चिंचवड आणि भोसरीला देण्यात येणार आहे. ते करताना महिलांना निम्या जागा देण्याचे सूतोवाच काल (ता.17) भाजपचे गटनेते एकनाथ पवार यांनी केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून दाखल होऊन भाजपतर्फे निवडून आलेल्या महिला नगरसेवकांची तेथे वर्णी लागण्याचा संभव आहे. येत्या गुरुवारी (ता.23) होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थायीचे अध्यक्ष आणि सदस्यांची घोषणा होणार असून सहा प्रभाग समिती अध्यक्षांच्या निवडीचा विषयही सभेच्या अजेंड्यावर आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख