pcmc | Sarkarnama

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीत बंड 

उत्तम कुटे : सरकारनामा न्यूजब्युरो 
शनिवार, 11 मार्च 2017

मम्मी व डॅडीमुळे पक्षाचे उद्योगनगरीत वाटोळे झाले असून नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीतील पराभवालाही हे दोघेच जबाबदार आहेत. 
- दत्ता साने 

पिंपरी : महापौर निवडीवरून भाजपमध्ये सुरू झालेल्या नाराजीनंतर आता गटनेतेपदावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मावळते सत्ताधारी राष्ट्रवादीमध्येही खदखद सुरू झाली आहे. पक्षाचे नियोजित गटनेते योगेश बहल यांचे नेतृव राष्ट्रवादीच्या 36 पैकी 22 नगरसेवकांनी अमान्य करीत त्यांच्याविरुद्ध आणि पर्यायाने पक्षनेते अजित पवार यांच्याविरुद्ध बंडाचा झेंडा फडकावला आहे. 

येत्या 20 तारखेपर्यंत अजित पवार यांनी बहल यांच्याऐवजी दुसरा गटनेता दिला नाही, तर सामूहिक राजीनामा देऊ असा इशारा या 22 नगरसेवकांच्या वतीने दत्ता
साने (चिखली गावठाण 1 ड प्रभाग) या पुन्हा निवडून आलेल्या ज्येष्ठ नगरसेवकांनी दिला आहे. बहल आणि मावळत्या गटनेत्या मंगला कदम (मम्मी आणि डॅडी)
यांच्यामुळे पक्षाची सत्ता गेली असून पुन्हा त्यांच्याकडेच नेतृत्व दिले, तर कॉंग्रेससारखी अवस्था होण्यास वेळ लागणार नाही आणि शहरातून पक्ष संपून जाईल,अशी
भीती त्यांनी वर्तविली आहे. त्यामुळेच आम्हाला या दोघांचे नेतृत्व मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही 9 तारखेला बैठक घेऊन वरील निर्णय घेतल्याची
माहिती त्यांनी दिली. बहल यांचे नेतृत्व कायम ठेवले, तर सभागृहात त्यांना सहकार्य करणार नाही वा व्हिपही झुगारून लावू, अशा इशाराही त्यांनी दिला आहे. 

बहल व कदम यांच्या नेतृत्वाविरोधात याअगोदरही वरिष्ठांकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अनेकदा तक्रारी केलेल्या होत्या. मात्र, त्याचा काहीच उपयोग न झाल्याने
महेश लांडगेसह अनेक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्याचा फटका नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत बसून गेल्या 15 वर्षाची पक्षाची
सत्ता संपुष्टात आली. त्यापासून बोध न घेता पुन्हा पक्षाला बुडविणाऱ्यांच्या हातातच सूत्रे कायम ठेवल्याने दादांविरोधातच हे बंड पुकारल्याची चर्चा सुरू झाली आहे.
उद्योगनगरीत गावकी, भावकीच्या राजकारणामुळेच राष्ट्रवादीचे नेते दादा यांचे नेतृत्व अमान्य करीत स्थानिक नेते असलेल्या भाजपकडे सत्ता शहरवासीयांनी नुकतीच
दिली आहे. त्यामुळे पक्षाचे नेतेपदही स्थानिक व मराठी नेत्याकडे द्यावे,अशी राष्ट्रवादीच्या बहुतांश नवनिर्वाचित नगरसेवकांची भावना होती व आहे. मात्र, ती बहल
यांची गटनेतेपदी व पर्यायाने विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करून दादांनी झुगारून लावल्याने या नगरसेवकांच्या गटानेही बहल व पर्यायाने दादांचे नेतृत्व झुगारून
देण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे खरा ओबीसी आणि जुन्या एकनिष्ठ भाजप नगरसेवकाला महापौरपदासाठी डावलल्याने भाजपमध्ये जसे वादळ उठले आहे, तसेच
ते एनसीपीतही घोंघावू लागले आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख