Pay a fine of five hundred rupees or exercise | Sarkarnama

पाचशे रुपये दंड भर, नाही तर मार उठबशा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

जामखेड येथील कोरोना रुग्णांच्या संख्येत आज आणखी दोघांची भर पडली. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविलेल्या दोघांच्या नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

नगर : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढू लागल्याने महापालिकेने आज सकाळपासूनच कारवाईचा धडाका लावला. मास्क न लावणारे, सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्यांकडून १५ हजार ७५० रुपये महापालिकेने दंड वसूल केला. ज्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांना उठबशा मारायला लावल्या. दरम्यान, जामखेड येथील दोन जणांचे अहवाल आज पाॅझिटिव्ह आल्याने नगरमध्ये अधिक कडक कारवाई सुरू झाली आहे.

उघड्यावर लघवी करणे, मास्क न वापरणे, कचरा रस्त्यावर टाकणे आदी कारणांमुळे आज कल्याण रोडवर सकाळीच पथकाने कारवाई केली. या पथकात आरोग्य अधिकारी नरसिंग पैठकर, स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते तसेच इतर अधिकाऱ्यांची टीम होती. त्यांनी २७ जणांवर कारवाई केली. पारिजात चाैक ते गुलमोहर रस्ता या दरम्यान तोंडाला मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या पथकात मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, तंत्र अभियंता परिमल निकम, किरण आकटकर, सूर्यभान देवघरे, गणेश लयसेट्टी आदींची टीम होती. त्यांनीही मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम वसूल केली. विशेषतः सकाळी फिरायला आलेल्या लोकांची चांगली पळती भूई थोडी झाली. 

जामखेडमध्ये दोघांची भर

दरम्यान, जामखेड येथील कोरोना रुग्णांच्या संख्येत आज आणखी दोघांची भर पडली. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे गुरुवारी तपासणीसाठी पाठविलेल्या दोघांच्या नमुन्यांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. जामखेड शहरातील बाधित रुग्णांचा आकडा 14वर पोचला आहे. त्यामुळे जामखेड शहराला चांगलाच हादरा बसला आहे. लॉकडाउनच्या काळात नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, स्वच्छता राखा, काळजी घ्या, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले कोरोनाबाधित झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन युवकांना लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले होते. त्यानंतर गुरुवारी त्या दोन व्यक्तींपैकी एकाच्या वडिलांना, तर आज  त्यांच्या दोन मित्रांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या आता 41 झाली आहे. त्यापैकी 24 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या बूथ हॉस्पिटलमधील आयसोलेशनमध्ये 16 रुग्ण आहेत. आज आलेल्या अहवालातील दोन कोरोनाबाधितांना तिकडे हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यातील एक जण 23 वर्षांचा, तर दुसरा 16 वर्षांचा असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख