पवारांचे विरोधक काकडे म्हणतात, अजितदादांनी मुख्यमंत्री म्हणून हेलिकाॅप्टरने यावे

बारामती तालुक्यातील काकडे विरुद्ध पवार घराण्याचा संघर्ष गेली ५२ वर्षे सुरू आहे. शरद पवारांच्या विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून सुरू झालेले हे राजकीय वैर आतापर्यंत कायम होते. आता मात्र त्यात बदल होऊ लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे सतिश काकडे यांनी अजित पवारांचे कौतुक केल्याने साहजिकच राजकारणात कोणी कोणाचा कायमच शत्रू नसतो, अशी चर्चा सुरू झाली.
पवारांचे विरोधक काकडे म्हणतात, अजितदादांनी मुख्यमंत्री म्हणून हेलिकाॅप्टरने यावे

सोमेश्वरनगर : अजितदादांनी पुन्हा येताना मुख्यमंत्री म्हणून हेलिकॅाप्टरने यावे आणि स्वागत करण्याची पहिली संधी मला मिळावी, अशी स्तुतिसुमने प्रशस्ती शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी केली. तर, 'सतीशराव, तुमची माझी मतं वेगळी असली तरी राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वसामान्य माणसासाठी काम करू. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो' असे स्पष्ट संकेत खुद्द माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. यामुळे 'मिले सूर मेरा तुम्हारा'ची अनुभूती कार्यकर्त्यांना आली.

 सतीश काकडे यांच्या सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात आज उद्योजक आर. एन. शिंदे यांनी दिलेल्या बहुउद्देशिय सभागृहाचा भूमिपूजन समारंभ पवार यांच्या हस्ते झाला. शिंदे हे सतीश काकडे यांचे मित्र तर अजित पवार यांचे कट्टर कार्यकर्ते. यामुळे कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार-काकडे एका व्यासपीठावर हजर होते.

वास्तविक 1967 पासून पवार विरूध्द काकडे असा उभा दावा तालुक्यात पहायला मिळायचा. दिल्लीपर्यंत ही चर्चा असायची. सोमेश्वर कारखान्याच्या दोन निवडणुकांमध्ये अजित पवार विरूध्द सतीश काकडे अशी जुगलबंदी बारामती-पुरंदर तालुक्याने पाहिली. परंतु अलिकडे वाद वितळू लागल्याचे जाणवत आहे. 

आज सतीश काकडे म्हणले, अजितदादांची भेटीची ही पहिलीच वेळ असावी आणि इथून पुढे मोठ्या कार्यक्रमांना ते येतील. त्यांना 16 डिसेंबरला स्वतःच्या निंबूत गावात आणणार आहे, असे सूचित केले. त्यावर पवार मिश्कीलपणे म्हणाले, तुमच्या महाविद्यालयाच्या मैदानावर हेलीकॅाप्टरने अनेकदा उतरलोय! यावर काकडे यांनी, आता मुख्यमंत्री होऊनच महाविद्यालयाच्या मैदानावर हेलिकॅाप्टरने या. मी कुठल्या पार्टीचा मलाच कळेना. परंतु ज्या नेत्याचं काम चांगलं त्याच्याबद्दल मी चांगलंच बोलतो. अजितदादांच्या कामांबद्दल जास्त सांगायची गरज नाही, अशी प्रशस्ती काकडे घराण्याचे ज्य़ेष्ठ नेते शामकाका काकडे यांच्यासमोर केली. 

पवार यांनी, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करू. विकासाच्या बाबतीत एकत्र पुढाकार घेतला पाहिजे. आपण एकमेकांचा बांध रेटलेला नाही आपल्याला जनतेची कामं करायची आहेत, असे सांकेतिक उद्गार काढले. यामुळे आगामी विधानसभा-लोकसभा निवडणुकांचा बारामती-पुरंदरचा रंग बदलेल तसेच दीड वर्षांनी येऊ घातलेली सोमेश्वर कारखान्याची निवडणुकही वेगळी असेल अशी चर्चा झडू लागली आहे.

सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे हे 2015 मध्ये झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांपासून दुरावले. एकमेकांवर जोरदार टीकाही केल्या होत्या. निवडणुकीतील पराभवानंतर काकडे यांनी शांत राहिले. मात्र अलिकडे ते पुन्हा कारखान्याच्या कार्यक्रमांमध्ये दिसत आहेत. आज तेही पाच वर्षांनंतर पवारांसोबत व्यासपीठावर होते. 'राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्र नसतो' हे सूत्र मी आणि शहाजीकाकांनी अनेकदा अनुभवलंय, असे विधान करून पवार यांनी हशा वसूल केला. काकडे यांनीही पवार यांचा 'कर्तबगार नेते' असा उल्लेख केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com