Pawar Power : All roads lead to Silver oak | Sarkarnama

पवार पॉवर : सगळे रस्ते सिल्व्हर ओकच्या दिशेने जातात ? 

संपत मोरे 
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

गृहमंत्री  अमित शहा "शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ?"असा प्रश्न उपस्थित करत होते. अमित शहांनी टाकलेल्या ईडीच्या बाउन्सरवर शरद पवारांनी असा काही षटकार चढवला की निवडणुकीचे वातावरणच फिरले.

पुणे : विधानसभा  निवडणुकीनंतर शरद पवार हेच राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्याचे चित्र आहे. गेले काही दिवस  शिवसेना,काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जात आहेत . रामदास आठवले यांनीही काल पवार यांची भेट घेतली. झालेल्या पेचप्रसंगात पवारच  तोडगा काढतील असाच विश्वास या नेत्याना आहे. शिवसेनेचे संजय राऊत तर सातत्याने शरद पवार यांना भेटताना  दिसत आहेत . 

भाजप आणि शिवसेनेने निवडणूक प्रचारात महिनाभरापूर्वी शरद पवार यांचे राजकारण आता संपले अशी हाकाटी उठवली होती . पण महिनाभरातच चित्र पूर्ण पालटले . सातारचे छत्रपती उदयनराजेंसह राष्ट्रवादीच्या भल्याभल्या बंडखोरांना चितपट करून हा पैलवान राज्याच्या राजकारणात मुख्य भूमिकेत आला आहे . एवढेच नव्हेतर राज्याच्या राजकारणाची दिशा ते ठरवत आहेत .  राज्यातील काँग्रेसचे युवक आमदार आणि काही नेतेही शरद पवार यांच्यामुळे खूपच प्रभावित झाल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसते आहे .  आणि महिनाभरापूर्वी कोणी सांगितले असते तर विश्वास बसला नसता पण शरद पवारांमुळे   शिवसेना आणि काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांमध्ये जवळीक देखील वाढलेली  दिसते . 

गेल्या दोन महिन्यापूर्वी पवारांचे राजकारण संपले अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. प्रचाराच्या सभा आणि त्याअगोदर होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या सभात फडणवीस अशीच मांडणी करत होते. पण विधानसभा निवडणुकीनंतर मात्र पवार हेच   राजकीय हालचालींचे मुख्य केंद्र बनले आहेत .

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. पक्षाचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतर राष्ट्रवादीतून अनेक नेते भाजप शिवसेनेत दाखल झाले. शरद पवार यांचे एकेकाळचे जिवाभावाचे सहकारी मधुकरराव पिचड यांच्यापासून ते दिलीप सोपल यांच्यापर्यँत अनेक नेते भाजप शिवसेनेत दाखल झाले.

त्याकाळात रोज "हे भाजपच्या वाटेवर  ,हे शिवसेनेत जाणार "अशा बातम्या यायच्या. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला रोज हादरे बसत होते. हे धक्के सावरता येतील अशी पक्षातील काही नेत्यांनाच खात्री नव्हती. नेते मनाने पराभूत झाले होते,राष्ट्रवादी काँग्रेसची धडपड सुरु होती मात्र काँग्रेसच्या गोटात शांतता होती. या दोन पक्षाच्या अस्तिवाबाबत राजकीय विचारवंत चर्चा करत होते. 

सगळं नकारार्थी वातावरण असताना शरद पवार यांनी राज्याचा दौरा सुरु केला. या दौऱ्याची सुरुवात सोलापुरात झाली. या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पुढं बीड मध्ये चांगली सभा झाली.मराठवाडयानंतर पवार सातारा जिल्हयात आले. साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पवारांना साताऱ्यात कसा प्रतिसाद मिळणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष होते. मात्र दोन राजे नसतानाही साताऱ्यातील जनतेने पवार यांचे जोरदार स्वागत केले.

या स्वागतानंतर साताऱ्यात राष्ट्रवादीला आत्मविश्वास आला पण इतर ठिकाणी मात्र प्रतिकूल घटना घडत होत्याच. आऊटगोइंग सुरूच होत. केज मध्ये पक्षाने जाहीर केलेला उमेदवार भाजपमध्ये दाखल होण्यासारख्या घटना घडत होत्या,तर काही उमेदवार पक्षाच्या चिन्हावर लढणार नाही,पुरस्कृत करा अशी मागणी करताना दिसत होते. त्यांच्यात हे म्हणण्याचं धाडस येण्यासारखी राष्ट्रवादीची अवस्था झाली होती. अशी अवस्था असतानाच विरोधी बाजूने मात्र रोज हल्ले सुरु होते. देवेंद्र फडणवीस 'मी पुन्हा येईन "अशी जोरदार घोषणा करत होते.

गृहमंत्री  अमित शहा "शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ?"असा प्रश्न उपस्थित करत होते. अमित शहांनी टाकलेल्या ईडीच्या बाउन्सरवर शरद पवारांनी असा काही षटकार चढवला की निवडणुकीचे वातावरणच फिरले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत असताना शरद पवार यांनी वयावर मात करत झंझावाती दौरे केले. जनतेला साद घातली. साताऱ्यातील त्यांची पावसातील सभा लोकांना खूप भावली. त्या सभेनंतर पवारांनी वातावरण बदलले. 

विशेषतः या सभेनंतर तरुणाई पवार यांच्या प्रेमात पडल्याचे आणि पवार यांना साथ देण्याचा निर्धार तरुणांनी केला. निवडणूक निकाल लागल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणातील पवार पॉवर लक्षात आली.सगळ्या राजकीय घडामोडी पवार यांच्याभोवती फिरू लागल्या.

गेल्या दोन महिन्यापूर्वी पवारांचा मुंबईतील सिल्व्हर ओक बंगला राजकीय घडामोडीचे केंद्र बनेल असं वातावरण नव्हतं. विरोधी पक्षही सातत्याने पवारांना नामोहरम करत होता आता मात्र पवार हीच पॉवर बनली आहे.'महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळे रस्ते सिल्व्हर ओकच्या दिशेने जातात.'हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख