नगर जिल्ह्यात चालली पवारांची जादू; विखेंचे डावपेच विफल

रोहित यांच्या रुपाने पवार कुटुंबातील एक सदस्य नगरच्या राजकारणात
नगर जिल्ह्यात चालली पवारांची जादू; विखेंचे डावपेच विफल

नगर : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विचार मनामनात रुजल्याचे द्योतक या विधानसभा निवडणुकीतून दिसून आले. भलेभले सोडून सोडून गेले, तरी पक्षाने दिलेले उमेदवार निवडून आणण्यात पवार यांना यश आले. त्यांचे विचार नगर जिल्ह्याच्या नसानसात भिनल्याचे हे द्योतक आहे. जिल्ह्यातील १२ पैकी सहा जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. दोन काॅंग्रेसने, तीन भाजपने तर एक जागा राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवाराने जिंकली.

भाजपमध्ये पक्षांतराच्या लाटेत अनेक नेते राष्ट्रवादीला सोडून गेले. अकोले येथील जुने नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी राष्ट्रवादी सोडली, त्याचे सर्वात जास्त दुःख पवार यांना झाले असेल. कारण सर्व प्रसंगात पिचड पवार यांच्या सोबत होते. राष्ट्रवादीने पिचड यांना मंत्रीपदे दिली. परंतु त्यांनी पूत्र वैभव पिचड यांच्यासाठी राष्ट्रवादीला रामराम ठोकून नगर जिल्ह्यालाच नव्हे, तर राज्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. तेच धक्कातंत्र पुढे चालू राहिले. जिल्ह्यातील अनेक नेते पक्ष सोडून जाऊ लागले. अशाही परिस्थितीत पवार यांनी न डगमगता सर्व सभा झोडत जाणाऱ्यांना शेलक्या शब्दांत चिमटे घेतले.

भाजपविषयी खदखद का
जीएसटी, नोटाबंदीचा फटका बसल्यानंतर उद्योगक, शेतकरी आर्थिक गर्तेतून वर आलाच नाही. त्याचाच परिणाम सरकारविरुद्ध चिड निर्माण झाली. या शिवाय पक्षांतर करून कार्यकर्त्यांना अडचणीत आणणाऱ्यांविषयीही कार्यकर्ते संभ्रमात राहिले. भाजपने फोडाफोडीचे राजकारण केले, त्याचाच परिणाम संधीसाधू राजकारणाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला.
 
जिल्ह्याचे जुने प्रश्न तसेच
निळवंडेच्या कालव्यांचे प्रश्न, कुकडीचे पाणी, साकळाई जलसिंचन योजना, वांबोरी चारीचा प्रश्न, नगरमधील आैद्योगिक वसाहत व बेरोजगारीचे प्रश्न भाजपच्या काळात तसेच राहिले. केवळ आश्वासनांची खैरात झाली. हेच मुद्दे आघाडीच्या उमेदवारांनी प्रकर्षाने पुढे केले. साहजिकच त्याचा फायदा राष्ट्रवादी व काॅंग्रेसला झाला. छावणी सुरू करून छावणी चालकांना कचाट्यात सापडविण्याचे काम भाजपकडून झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी भाजपला नाकारले.

शरद पवारांचे विचार अनमोल
शरद पवार मुख्यमंत्री असताना किंवा विविध खाते सांभाळताना त्यांनी केलेले कृषीविषयक कामे लोकांच्या स्मरणात आहेत. शरद पवार यांचे नगर जिल्ह्याशी असलेले नाते अतूट आहे. त्यामुळेच रोहित पवार यांना अत्यंत कमी कालावधीत जिल्ह्याने आपलेसे केले. पवार यांनी प्रचाराच्या अंतीम टप्प्यात घेतलेल्या सभांचाही चांगला परिणाम पक्षाला झाला. 

नगरमधील विजयी उमेदवार असे ः
१) कर्जत-जामखेड - रोहित पवार (राष्ट्रवादी)
२) पारनेर ः निलेश लंके (राष्ट्रवादी)
३) नगर शहर ः संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
४) कोपरगाव ः आशुतोष काळे (राष्ट्रवादी)
५) अकोले ः डाॅ. किरण लहामटे (राष्ट्रवादी)
६) राहुरी ः प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी)
७) नेवासे ः शंकरराव गडाख (राष्ट्रवादी पुरस्कृत)
८) संगमनेर ः बाळासाहेब थोरात (काॅंग्रेस)
९) श्रीरामपूर ः लहू कानडे (काॅंग्रेस)
१०) शेवगाव ः मोनिका राजळे (भाजप)
११) शिर्डी ः राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
१२) श्रीगोंदे ः बबनराव पाचपुते (भाजप)


राष्ट्रवादी ७
राष्ट्रवादी पुरस्कृत १
काॅंग्रेस २
भाजप २

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com