एकनाथ खडसे यांची दिल्लीत पवारांशी अर्धा तास चर्चा

एकनाथ खडसे यांची दिल्लीत पवारांशी अर्धा तास चर्चा

नवी दिल्ली : भाजपमधून बाहेर पडण्याचे संकेत व इशारे देणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज दिल्लीवारी करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. मात्र त्यांना भाजपाध्यक्ष तर सोडाच; पण कार्यकारी अध्यक्षांचीही वेळ रात्री उशीरापर्यंत मिळालेली नव्हती. ""आपल्याला पक्षातून दूर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे. मी "यांची' आरती करावी काय?'' असे विचारणारे खडसे यांना भाजपच्या दृष्टीने बोलायचे तर रिकाम्या हातानेच माघारी परतण्याची वेळ येणार असे दिसत आहे. 

खडसे यांनी दिल्लीत सकाळी दाखल झाल्यावर सायंकाळी पवारांच्या 6 जनपथ या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. उभयतांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. नेमकी कार्य चर्चा झाली ते समजू शकले नसले तरी रावेर भागातील शेळगाव बंधारा व बोदवड सिंचन प्रकल्पाच्या संदर्भात ही चर्चा झाल्याचे खडसे यांनी पत्रकारांना सांगितले. जाणकारांच्या म्हणण्यानुसार पवार यांना भेटून खडसे अर्धा तासात बाहेर येतात त्याअर्थी त्यांना 6- जनपथवरून फारसा आशादायक प्रतिसाद मिळाला असण्याची चिन्हे नाहीत. 

दरम्यान खडसे यांनी भाजप नेतृत्वाचीही भेटीची वेळ मागितली असली तरी गृहमंत्री अमित शहा रात्री उशीरापर्यंत लोकसभेत असल्याने त्याना आजची वेळ मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेण्यास त्यांनासांगण्यात आले. मात्र नड्डा यांचीही आजची वेळ मिळणार नसल्याचे सांगितले गेले. त्यानंतर खडसे यांनी राज्यात माघारी परतण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. 

खडसे हे भाजपच्या राज्य नेतृत्वावर म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता सतत टीका करत आहेत. मात्र एका भाजप नेत्याच्या मते महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर खडसे यांची वक्तव्ये पाहता त्यांच्यादृष्टीने दिल्लीतून यापेक्षा सहानुभूतीपूर्वक विचार होईल अशी शक्‍यता नाही. मुळात खडसे यांची तक्रार ज्या राज्य नेतृत्वाविरूध्द आहे त्यांच्यामागे "दिल्लीश्‍वर' भक्कमपणे उभे आहेत. परिणामी खडसे यांच्या इशाऱ्यांचा दिल्लीत भाजप नेतृत्वावर परिणाम होण्याची चिन्हे नाहीत. खडसे म्हणाले होते की ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे पराभूत झाले. दुर्दैवाने बहुजन समाजाला डावलण्याचा प्रयत्न राज्य भाजपमध्ये होत आहे. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील ज्या लोकांमुळेच झाला त्यांची नावांसहित तक्रार आपण वरिष्ठांकडे केली आहे असेही खडसे म्हणाले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com