पुराचा फटका बसलेल्या गावांची कर्जमाफी करा : शरद पवार

 पुराचा फटका बसलेल्या गावांची कर्जमाफी करा : शरद पवार

कऱ्हाड : लातूरच्या भूकंपानंतर ज्या पध्दतीने आठ महिन्यात एक लाख घरे पक्की बांधून दिली त्याप्रमाणे पुरात संपूर्ण किंवा 50 टक्के गाव पाण्यात गेले, अशा ठिकाणी घरे बांधून देणे शक्‍य आहे का ? अशी विचारणा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज कराडात जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना केली. त्याचवेळी घरे जुन्या जागेवर की नव्या जागेवर बांधायची हा प्रश्‍न असून कोल्हापूर, सांगली, कऱ्हाड मध्ये नवीन गावठाणासाठी जागा मिळणे तितके सोपे नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केली. दरम्यान पुराचा फटका बसलेल्या गावांची कर्जमाफी करावी. शेती, व्यवसाय, बलुतेदारांची कर्जेमाफ करण्याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. 

सांगली, कऱ्हाड भागातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष पवार आज येथे आले. पाहणीपूर्वी येथील 
शासकीय विश्रामगृहात त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, रोहित पवार उपस्थित होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती राजेश पवार, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, डॉ. इंद्रजित मोहिते, देवराज पाटील, अविनाश मोहिते आदी उपस्थित होते. 

श्री. पवार यांनी आमदार पाटील यांच्याकडून पूर स्थितीचा आढावा घेतला. यावेळी सांगली, कोल्हापूरला मदत पाठवण्यासाठी कऱ्हाड हेच केंद्र करावे असे सुचवून आमदार पाटील यांना त्यासाठी जागा आहे का अशी विचारणा केली. आमदार पाटील यांनी जागा असल्याबाबत होकार दिला. त्यावर आमदार शिंदे यांनी सह्याद्री कारखान्यावर ठेवता येईल असे सूचवले. श्री. पवार म्हणाले, जयंत पाटील यांनीही राजारामबापू कारखान्यावर मदत पाठवण्यास सांगितले आहे. त्यानुसार शक्‍य असल्यास येणारी मदत सह्याद्री कारखाना किंवा कऱ्हाडमध्ये ठेवा. पूराचे पाणी ओसरल्यावर मदत सांगली, कोल्हापूर येथे लवकर देणे शक्‍य होईल. 

यावेळी श्री. पाटणकर यांनी तांबवेतील बाधित कुटुंबे व स्थलांतरीत पूरग्रस्तांची माहिती दिली. त्यावर श्री. पवार यांनी त्यांना नेमकी कशाची मदत करावी लागेल अशी विचारणा केल्यावर श्री. पाटणकर यांनी पाण्यात घरे असणाऱ्या कुटुंबाना दररोज लागणाऱ्या साहित्याची अपेक्षा आहे. त्यावर मदतीसाठी केंद्र व राज्य सरकारशी वेगळे बोलू असे श्री. पवार यांनी सांगितले. 

घरांना ओल आहे, त्यांची अवस्था काय आहे हे पहावे लागेल असे श्री. पवार म्हणाले. पुरात पाण्याखाली गेलेली मातीची घरे पडणार हे नक्की, असल्याचे उपस्थितांनी यावेळी पवार यांना सांगितले. त्यावर श्री. पवार यांनी लातूरच्या भूकंपाची आठवण करून देत भूकंपानंतर तेथे ज्यापध्दतीने आठ महिन्यात एक लाख घरे पक्की बांधून दिली त्यानुसार पुरात संपूर्ण किंवा 50 टक्के गाव पाण्यात गेले होते, त्या ठिकाणी घरे बांधून देणे शक्‍य आहे का ? अशी विचारणा केली. त्याचवेळी घरे जुन्या जागेवर की नव्या जागेवर बांधायची हा प्रश्‍न उपस्थित करून कोल्हापूर, सांगली, कऱ्हाड मध्ये नवीन गावठाणासाठी जागा मिळणे तितके सोपे नाही, त्यामुळे आहे तिथेच जागा शोधणे आवश्‍यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

श्री. पाटणकर यांनी छोटे उद्योजकांचा माल पाण्याखाली गेल्याने त्यांचे नुकसान झाल्याचे सांगताच श्री. पवार यांनी सरकारने त्यांना आर्थिक मदत करावी. यावेळी श्री. पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलावे असे आपण पंतप्रधानांना सुचवले असल्याचे सांगितले. ते म्हणाले, कर्नाटक विसर्ग वाढवण्यास तयार झाल्याचा पंतप्रधानांकडून निरोप आला. मात्र माझ्या माहितीनुसार अजूनही कर्नाटकचा विसर्ग वाढवला नाही. त्यामुळे जोपर्यंत विसर्ग वाढवत नाही तापर्यंत पाणी पुढे जाणार नसून सांगलीचा फुगवठा कमी होणार नाही. 

कोल्हापूर ला पाहणी करण्यासाठी जाण्यास अडचणी असल्याने तांबवेत पाहणी करून सांगलीला जाणार असल्याचे सांगून पुन्हा रात्री एकत्र येवून आढावा घेवू व त्यानंतर सरकारशी बोलू असेही श्री. पवार यांनी सांगितले. त्याचवेळी पाहणीवेळी गाड्या जास्त नको, अशी सूचनाही त्यांनी केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com