पवार-दानवेंच्या चिखलीतील भेटीमुळेंही अनेकांच्या पोटात गोळा

 पवार-दानवेंच्या चिखलीतील भेटीमुळेंही अनेकांच्या पोटात गोळा

भोकरदन : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एकत्रित विमान प्रवास आणि चर्चेने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. या भेटीचे अनेक अर्थ काढले जात असतांना अशीच एक दुसरी भेट शरद पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यात बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे झाली. पवार-ठाकरे यांच्या भेटीच्या चर्चेत ही भेट काहीशी झाकोळली गेली असली तरी या दोन नेत्यांची गुप्त भेट देखील महत्वाची मानली जाते. 

एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवून देणारे मोठे नेते एकमेकांना भेटले की या भेटीची सहाजिकच चर्चा होते. त्याचे निरनिराळे अर्थ लावले जातात. औरंगाबाद येथील एकाच हॉटेलात थांबल्यानंतर मुंबईला एकाच विमानातून आजूबाजूच्या सीटवर बसून प्रवास करणारे शरद पवार आणि राज ठाकरे यांचे फोटो आणि बातम्या सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात धुमाकूळ घालत आहेत. 

पवार - ठाकरे भेटीच्या चर्चेचा जोर ओसरत नाही तोच गुरुवारी चिखली येथील माजी मंत्री भारत बोंद्रे यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात शरद पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे एकाच व्यासपीठावर होते. शेजारीच बसलेल्या या दोघांमध्ये बराचवेळ कानगोष्टीही सुरू होत्या. व्यासपीठावरील कानगोष्टी आणि गप्पांमधून मन भरले नाही म्हणून की काय कार्यक्रम संपल्यावर चिखली येथील शासकीय विश्रामगृहात पुन्हा पवार-दानवे एकमेकांना भेटले आणि तासभर राज्याच्या या दोन प्रमुख नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा देखील झाली. त्यामुळे कालचा दिवस म्हणजे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी आणि गुप्त चर्चांचा होता असे दिसते. 

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका आणि सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये ताणले गेलेले संबंध अशा पार्श्‍वभूमीवर भाजपचा राज्यातील मोठा नेता विरोधी नेत्याची भेट घेतो म्हटल्यावर याचे अनेक अर्थ राजकीय विश्‍लेषक लावत आहेत. शिवसेनेने भाजपकडून राम मंदिराचा मुद्दा हायजॅक करत त्यांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. यावर काही रामबाण उपाय शोधण्यासाठी तर दानवेंनी पवारांची भेट घेतली नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com