pawar and beed district politics | Sarkarnama

बीडमध्ये शरद पवार यांचे एका दगडात अनेक पक्षी....

दत्ता देशमुख
बुधवार, 15 जानेवारी 2020

राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी हातभार लावणाऱ्या कॉंग्रेसच्या संजय दौंड यांना उमेदवारी देऊन आपण सामान्यांना दिलेला शब्द पाळतो हे शरद पवारांनी दाखवून दिले आहे.

बीड : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची रिक्त झालेली राष्ट्रवादीच्या वाट्याची जागा कॉंग्रेसच्या संजय दौंड यांना दिली आहे. दौंड यांची उमेदवारी आणि दृष्टीक्षेपात असलेली आमदारकी भविष्यातील अनेक समिकरणांची नांदी आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांनी या उमेदवारीतून एक दगडात अनेक पक्षी मारल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. सामान्यांना दिलेला शब्द पाळतो हे मात्र पवारांनी सिद्ध करुन दाखविले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर कॉंग्रेसमधील दिग्गज मंडळी राष्ट्रवादीत गेली. त्यामुळे आघाडीत कॉंग्रेस राज्यात मोठा भाऊ असला तरी जिल्ह्यात लहान भाऊच राहीला. मागच्या सत्तेच्या काळात कॉंग्रेसने एम. एम. शेख, श्री. पांडुळे आदींना आमदारकी दिल्या तरी त्यांचा जिल्ह्याशी काहीही संबंध नव्हता. रजनी पाटील यांना कॉंग्रेसने खासदारकी दिली. पण, त्यांचा जिल्ह्याशी संपर्क कमी पडला. त्यामुळे कॉंग्रेसची ताकद कायम क्षीण होत गेली. आताच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या वाट्याची परळीची जागाही राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांच्यासाठी सोडावी लागली. त्यामुळे आहे त्या कार्यकर्त्यांना फक्त आघाडीचा धर्म पाळण्याशिवाय गत्यंतर नव्हते. 

परंतु, धनंजय मुंडेंसाठी खुद्द शरद पवार आणि अजित पवारांनी माजी मंत्री दौंड यांना प्रचाराची गळ घालत भविष्यात संधीचा शब्द दिला. त्यातून राष्ट्रवादीला फायदा झाला आणि त्याची भरपाई म्हणून कॉंग्रेसच्या संजय दौंड यांना राष्ट्रवादीच्या वाट्याची उमेदवारी आणि आमदारकी मिळाली. एक प्रकारे राष्ट्रवादीच्याच फायद्यासाठीची उमेदवारी कॉंग्रेस नेत्याला देऊन कॉंग्रेसच्याही डोक्‍यावर उपकाराचा हात ठेवला गेला आहे. 

पण, या उमेदवारी आणि आमदारकीचे अनेक राजकीय पैलु निघत आहेत. शरद पवार दिलेला शब्द पाळतात हे यातून सिद्ध झाले आहे. आगामी चार - पाच महिन्यांनी विधान परिषदेच्या इतर काही जागांच्या निवडणुका आणि राज्यपालांकडून आमदारांच्या नियुक्‍त्या आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार सय्यद सलिम आदींच्या वाटेत आतापासूनच अडथळा निर्माण झाला आहे. 

चारच महिन्यांत पक्षाकडून दुसरी आमदारकी मागणे जड जाणार आहे. त्यात मुंडेंच्या विजयात हातभार म्हणून दौंड यांना आमदारकी मिळणार असली तरी त्याचा धनंजय मुंडेंना फायदा होणार कि तोटा हे भविष्यात कळणार आहे. ाज धनंजय मुंडे यांना फायदा होईल असे वाटत असले तरी भविष्यात दोघांत (पंकजा मुंडे, धनंजय मुंडे) तिसरा असाही पर्याय दौंड यांच्या माध्यमातून पवारांच्या हाती असू शकतो. किंवा संजय दौंड यांचे तसे स्वतंत्र अस्तित्व असल्याने आता आमदारकीच्या माध्यमातूनही त्यांची ताकद वाढणार आहे. त्यामुळे भविष्यात परळी मतदार संघात दौंड यांच्या माध्यमातून पवार हवा तसा निकाल लावून घेऊ शकतात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख