खंडाळ्यात उभी राहणार मकरंद पाटील यांच्याविरोधात भक्कम आघाडी ?

 खंडाळ्यात उभी राहणार मकरंद पाटील यांच्याविरोधात भक्कम आघाडी ?

लोणंद : खंडाळा तालुक्‍याची अस्मिता व पाणीप्रश्नासाठी संघर्ष उभा करण्याचा निर्णय आहिरे येथे काल झालेल्या तालुक्‍यातील विविध पक्षातील दिग्गज नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. हा निर्णय घेतानाच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात भक्कम फळी उभी करुन त्यांना शह देण्याचा कटच या बैठकीत शिजला असल्याची चर्चा खंडाळा तालुक्‍यात सुरू आहे. 

खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती रमेश धायगुडे-पाटील यांच्या अहिरे येथील फॉर्म हाऊसवर शनिवारी ही बैठक झाली. त्यावेळी ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष ऍड. बाळासाहेब बागवान, माजी सभापती सुभाषराव साळुंखे, आप्पासाहेब देशमुख, बबनराव शेळके, बाळासाहेब शेळके, लोणंद बाजार समितीचे संचालक बाळासाहेब धायगुडे उपस्थित होते. 

एकेकाळी जिल्ह्यात दबदबा असलेला खंडाळा तालुका सध्या दुष्काळात होरपळत असतानाही ताठ मानेने व स्वाभिमानाने उभा होता. " फाटका पण नेटका ' तालुका म्हणून याची ओळख होती. मात्र, अलिकडच्या दहा वर्षात वाई व फलटण या दोन तालुक्‍याच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे खंडाळा तालुका स्वत्व हरवून बसला आहे. हे स्वत्व पुन्हा मिळून तालुक्‍याच्या पाणीप्रश्नासाठी अखेरची लढाई लढण्यासाठी तालुक्‍यातील सर्व पक्षीय नेते मंडळी एकत्र आले आहेत. मात्र, हा निर्णय घेतानाच येत्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात एकजुटीने रान उठविण्याचाही निर्णयही या बैठकीत घेतल्याचे समजते. 

गेली दहा वर्षे वाई-खंडाळा-महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील हे प्रतिनिधित्व करत आहेत. गेल्या दहावर्षात खंडाळा तालुक्‍यातील राजकारणात त्यांचा व त्यांच्या पक्षाचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे. तालुक्‍यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा सहकारी बॅंक, लोणंद बाजार समिती, लोणंद व खंडाळा नगरपंचायत येथील सत्ता आपल्या पक्षाच्या ताब्यात ठेवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. 

मात्र, या काळात काही राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करताना स्वपक्षातील अनेकांची नाराजीही त्यांना ओढवून घ्यावी लागली आहे. परिणामी ही नाराज नेते मंडळीच आता उघडपणे एकत्र येऊन अन्य पक्षातील नेत्यांनाही आपल्या बरोबर घेऊन आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात फळी उभी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तिकीट वाटपावरून पक्षांतर्गत नाराजांची नाराजी दूर करण्यात मकरंद पाटील यांना अद्याप तरी यश आलेले नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच नंबर एक ठरला. पण त्यामध्ये आमदार मकरंद पाटील यांची ताकद किती ? असा प्रश्न उपस्थित करून खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रेमापोटीच तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला मताधिक्‍य मिळाल्याची चर्चा आहे. खंडाळा तालुक्‍यातील नेते मंडळींनी आमदार पाटील यांच्या विरोधात प्रथमच उघडपणे भूमिका घेऊ लागल्याने आमदारांच्या दृष्टीने ही धोक्‍याची घंटा असल्याचे मानले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com