Pathardi Municipality: If you do not have a mask, keep five hundred in the pocket | Sarkarnama

पाथर्डी नगरपालिकेचा फतवा : मास्क नसल्यास पाचशे रुपये खिशात ठेवा

राजेंद्र सावंत
रविवार, 19 एप्रिल 2020

रस्त्यावर थुंकणे व मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना पाचशे रुपये दंड आकारला जात आहे. हिच चूक पुन्हा निदर्शनास आल्यास मात्र दोन हजार रुपये दंड, तिसऱ्यांदा चूक झाल्यास पाच हजार रुपये दंड व फौजदारी स्वरुपाचा गुन्हा, अशी शिक्षा करण्यात येणार आहे.

पाथर्डी : आता घराबाहेर पडल्यानंतर पालिका हद्दीत तोंडाला मास्क बांधलेला नसेल, तर खिशात पाचशेची नोट असू द्या कारण पोलिस व पालिकेच्या पथकाने कारवाई सुरू केली आहे. नुकतेच तिघांना मास्क न बांधल्याने प्रत्येकी पाचशे रुपयाचा दंड केला आहे. पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी शहरवासीयांना रस्त्यावर थुंकणे व मास्क न वापरणाऱ्याला दंड आकरण्याचे आदेश दिले आहेत.पाथर्डीत लाॅकडाऊनच्या काळात अनेकजण किरकोळ कारण काढुन घराबाहेर पडत आहेत. पोलिस, पालिका, आरोग्य विभाग व महसूलचे अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस काम करुन शिस्तीचे धडे देत आहेत. तरीही रस्त्यावरुन फेरफटका मारणाऱ्यांची संख्या रोजच वाढतेय. कोरोना सारख्या भयंकर आजारावर मात करण्यासाठी शहरात रस्त्यावर थुंकणे व मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना पाचशे रुपये दंड आकारला जात आहे. हिच चूक पुन्हा निदर्शनास आल्यास मात्र दोन हजार रुपये दंड आकारला जात आहे. तिसऱ्यांदा केलेली चूक झाल्यास पाच हजार रुपये दंड व फौजदारी स्वरुपाचा गुन्हा, अशी शिक्षा करण्यात येणार आहे. पालिकेचे कर्मचारी ज्ञानुसिंग परदेशी, हवालदार अरविंद चव्हाण आणि पथकातील इतर सदस्यांनी नुकतेच तिघांना मास्क नसताना पकडले. त्यांच्याकडुन प्रत्येकी पाचशे रुपये दंडही वसूल केला. अधिक कठोर कारवाईसाठी पालिकेच्या पथकाला पोलिसांची मदत हवी असल्याचे कर्मचारी सांगत आहेत.

कोरोनाबाधित नसल्याचे समाधान
दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील 17 जणांना संशयावरून क्वारंटाईन केले होते, तथापि, कोरोनाग्रस्त एकही रुग्ण नाही. तालु्क्यात ऊस तोडणी मजुरांची संख्या जास्त आहे. या लोकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचे काम प्रशासन करीत आहे. या लोकांमध्ये कोरोनाची लागन होऊ नये, यासाठी प्रशासन विशेष काळजी घेत आहे. पाथर्डी तालुक्यात सध्या एकही कोरोनाबाधित नसल्याने ही आपत्ती येऊ नये, यासाठी नगरपालिका प्रशासन जोरदार प्रयत्न करीत आहे.
 

वारंवार चुका आढळल्यास फाैजदारी गुन्हा

शहरात मास्क न वापरणारे व सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यावर थुंकणाऱ्याला दंड आकारला जाईल. पहिल्यांदा पाचशे, दुसऱ्या वेळेस दोन हजार व तिसऱ्या वेळेस पाच हजार रुपये दंड व फौजदारी स्वरुपाचा गुन्हा नोंदविला जाईल. नागरिकांनी घरात राहून सहकार्य करावे, असे आवाहन पाथर्डी नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख