Patangrao Kadam remembered by his party worker | Sarkarnama

अपंग तरुणांच्या मनात आत्मविश्वास पेरणारे पतंगराव 

संपत मोरे 
रविवार, 19 ऑगस्ट 2018

शिवणी गावातील  दिग्विजय पवार  शरीराने अपंग आहेत.  पतंगराव कदम यांचे त्यांच्यावर प्रेम होते . दिग्विजय पवार यांच्या वाढिदवसाला पतंगराव कदम शुभेच्छा  द्यायचे . प्रत्यक्ष किंवा फोनवर . आज पतंगराव नाहीत म्हणून दिग्विजय आपला वाढदिवस साजरा केला नाही . 

 पुणे : "पतंगराव कदम साहेबांचा माझ्यावर जीव होता. दरवर्षी ते मला वाढदिवसाला कडेगावला बोलावून घ्यायचे.सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर माझा वाढदिवस साजरा करायचे. ते मुंबईला असतील तर सकाळीच मला त्यांचा फोन यायचा. ते फोनवर मला शुभेच्छा द्यायचे आणि माझ्याशी बोलत रहायचे. 

मला वाटायचं साहेबांना वेळ नसेल पण मी म्हणायचो साहेब फोन ठेवू का? साहेब मला म्हणायचे "कारे कसली गडबड आहे तुला?"मग मात्र मी साहेबांशी मनमोकळं बोलायचो.

आजची सकाळ मात्र अशी उगवली,साहेबांचा फोन आला नाही की निरोप आला नाही."सांगली जिल्ह्यातील शिवणी गावातील पतंगराव कदम यांचे कार्यकर्ते दिग्विजय पवार सद्गदीत होऊन सांगत होते. ते शरीराने अपंग आहेत.

"एका विजयी मिरवणुकीत घोषणा देताना साहेबांनी मला पाहिले. आणि तेवढ्या गर्दीतही जवळ बोलावून घेतले,मायेचा हात डोक्यावरून फिरवला.त्यानंतर मी साहेबांच्या जवळचा झालो.ते मंत्री होते तेव्हा त्यांच्याभोवती खूप गर्दी असायची पण माझी आणि त्यांची लगेच भेट व्हायची. त्यानी स्वीय सहायकाना सांगून ठेवल होतं'हे पोरग आलं की माझी गाठ घालून द्यायची.'असे त्यांचे आणि माझे संबंध होते.साहेबांनी मला एक नोकरीही दिली पण शारीरिक व्यंगामुळे मला नोकरी करता आली नाही."

"साहेबांना माझी काळजी होती.त्यानी माझ्या चुलतभावाला मेडिकलसाठी ऍडमिशन दिले आणि त्याला सांगितले,"तू दिगुची काळजी घ्यायची."माझ्या आयुष्यात मला त्यांचं प्रेम मिळालं.माझ्यासारख्या अपंग तरुणांच्या मनात त्यांनी आत्मविश्वास पेरला.मी आता वाढदिवस साजरा करणार नाही,फक्त दरवर्षी साहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेणार आहे. साहेब नसताना वाढदिवस करणे हे मला सहनच होत नाही."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख