सुप्रिया सुळे यांच्यासमोर पैठणमध्ये कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी

...........
 सुप्रिया सुळे यांच्यासमोर पैठणमध्ये कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी

औरंगाबाद : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पैठण येथील संवाद मेळाव्यात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन गटात चांगलीच हुल्लडबाजी झाली .माजी आमदार संजय वाघचौरे आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दत्ता गोरडे यांच्या समर्थकांमध्ये सुप्रिया सुळे यांच्या समोरच जुंपली. त्यामुळे व्यथित झालेल्या सुळे यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत संवाद मेळावा आटोपता घेतला . 

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार खासदार सुप्रिया सुळे सध्या औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी पैठण, वैजापूर, गंगापूर आणि कन्नड विधानसभा मतदारसंघांमध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते. आज दुपारी पैठण येथील मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची या मेळाव्याला मोठी गर्दी जमली होती. परंतु मेळावा सुरू होताच वाघचौरे आणि गोरडे समर्थकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. पैठण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या संदिपान भुमरे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसने दत्ता गोरडे यांना उमेदवारी दिली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला .त्यामुळे चुकीच्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यामुळेच राष्ट्रवादीचा पराभव झाल्याचा आरोप वाघचौरे समर्थकांनी केला आणि त्यातून दोघांचेही समर्थक आक्रमक झाले .एकमेकांच्या दिशेने जात त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी माईकचा ताबा घेत झालेल्या प्रकाराबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली . 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुमच्या भावनांची मी कदर करते, परंतु हुल्लडबाजी किंवा गोंधळ ही आपल्या पक्षाची संस्कृती नाही. पैठणमध्ये आज झालेला हा प्रकार मला अजिबात आवडलेला नसून आपल्या आयुष्यात आजची घटना ही एक कटू आठवण म्हणून नेहमीच लक्षात राहील. मी एक संवेदनशील महिला असून श्रमलेल्या बापाची लाडकी लेक आहे. ही महाराष्ट्राची बुलंद कहाणी आहे, आणि ती मी पुढे घेऊन जात आहे. त्यामुळे असली हुल्लडबाजी पक्षात चालणार नाही. आज झालेल्या या गोंधळामुळे सभागृहात खरंच राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते आहेत की काही विरोधक घुसलेत अशी शंका मला वाटू लागली आहे.कारण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असं वागू शकत नाही याबद्दल माझ्या मनात शंका नाही. त्यामुळे भविष्यात पुन्हा अशा प्रकारच्या गोष्टी घडणार नाही याची काळजी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी घ्यावी असे आवाहन करत सुप्रिया सुळे यांनी मेळावा आटोपता घेतला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com