मुंबई महापालिकेत स्टॅंडिंग, बाहेर अंडरस्टॅटिंग?

मुंबई पालिकेच्या दोन महत्त्वाच्या खात्यांचे सादरीकरण मुंबई महापालिकेच्या सभागृहा ऐवजी लोअर परळच्या इंडिया बुल्स टॅावरमध्ये करण्यात आले. पालिका प्रशासनाच्या या प्रकारामुळे स्थायी समिती सदस्य नाराज झाले असून त्यांनी त्याबाबत जोरदार आक्षेप घेतला आहे.
मुंबई महापालिकेत स्टॅंडिंग, बाहेर अंडरस्टॅटिंग?

मुंबई  - पालिकेच्या दोन महत्त्वाच्या खात्यांचे सादरीकरण मुंबई महापालिकेच्या सभागृहा ऐवजी लोअर परळच्या इंडिया बुल्स टॅावरमध्ये करण्यात आले. पालिका प्रशासनाच्या या प्रकारामुळे स्थायी समिती सदस्य नाराज झाले असून त्यांनी त्याबाबत जोरदार आक्षेप घेतला आहे. 

 एका खासगी संस्थेमार्फत दोन महत्वाच्या खात्यांचे सादरीकरण पालिकेच्या इमारतीबाहेर करण्याचे  कारण काय, असा सवाल नगरसेवकांमार्फत विचारला जात आहे. याला प्रशासन आणि संबंधितांची अंडरस्टँडिग म्हणायची काय, असा प्रश्नही सर्वपक्षीय नगरसेवकानी केला. 


मुंबईच्या हितांचे निर्णय स्टँडिंग कमिटीमध्ये घेतले जात असताना अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर एका खासगी संस्थेमार्फत आज दोन महत्वाच्या खात्यांचे सादरीकरण महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर  लोअरपरळच्या इंडिया बुल १ मध्ये करण्यात आले.  

महत्त्वाच्या विषयांचे सादरीकरण करण्यासाठी समिती सभागृह, स्थायी समिती सभागृह आणि महासभागृह असे मोठे सभागृह असताना दोन महत्वाच्या विषयांचे सादरीकरण बाहेर करण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
मुंबई महापालिकेचा २०१९-२० चा अर्थसंकल्प ३०,६९२.५९ कोटींचा आहे. त्यामध्ये रस्त्यांसाठी १५२० कोटी रुपये आणि आरोग्य विभागासाठी ३६०१ कोटी अशी सर्वात मोठी तरतूद असते.  

या दोन खात्यांच्या गैरव्यवहारावर आक्षेप घेतले आहेत. आगामी २०२०-२१ च्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर या दोन खात्यांचे सादरीकरण इंडिया बुलमध्ये करण्यात आले. त्यासाठी स्थायी समिती सदस्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्यासाठी खास वातानुकूलित वाहनाची व्यवस्थाही करण्यात आली होती. मात्र या प्रकाराबाबत स्थायी समितीतील काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. या सादरीकरणाबाबत सदस्यांना आगाऊ सूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे आपले पूर्वनियोजित कार्यक्रम ठरले असल्याने आपण सादरीकरणास येऊ शकत नाही असे सांगून काही सदस्यांनी तेथे जाण्याचे टाळले. 

पालिकेच्या मुख्यालयात मोठे सभागृह उपलब्ध असताना इंडिया बुलमध्ये सादरीकरण घेणेच अनेकांना पटलेले नाही. त्यामुळे सादरी करणाबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजपचे प्रभाकर शिंदे, काँग्रेसचे रवी राजा, आसिफ झकेरिया, जावेद जुनेजा, समाजवादी पार्टीचे रईस शेख, सभागृह नेत्या शिवसेनेच्या विशाखा राऊत या सादरीकरणाला उपस्थित राहू शकले नाहीत.

प्रेझेंटेशनविषयी आधी सांगता येत नाही का? एका रात्रीत सांगून आम्ही कसे येणार? आमचे पूर्वनियोजित कार्यक्रम ठरलेले आहेत. ते टाळून प्रेझेंटेशनला येणे शक्य होणार नाही.
--विशाखा राऊत, सभागृह नेत्या

प्रेझेंटेशन बाहेर घेण्याचे कारण काय?
महापालिकेचे मोठे सभागृह आहेत. त्या सभागृहांत शांतता आहे. मोठमोठ्या विषयांशी संबंधित प्रेझेंटेशन येथे होतात. मग हे प्रेझेंटेशन मुख्यालयाबाहेर घेण्याचे कारण अनाकलनीय आहे.
--प्रभाकर शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक, भाजप

कारभार सल्लागारांना चालवू दे --
महापालिकेत आयुक्तांच्या सहकार्याला आयएएस दर्जाचे चार अतिरिक्त आयुक्त आहेत. अर्थसंकल्प बनवताना त्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. असे असताना मोठ्या खात्यांसाठी खासगी संस्थांचा सल्ला घेणे गैर आहे. तसे असेल तर महापालिकेचा कारभारच सल्लागारांना चालवू दे!
--रवी राजा, विरोधी पक्षनेता, मुंबई महापालिका

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com