महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातही 'त्यांचा' पराभव निश्‍चित : मल्लिकार्जुन खर्गे  

महाराष्ट्रात ज्यांनी पक्षांतर करून निवडणूक लढविली. त्यापैकी 70 टक्के पराभूत झाले. पण, कर्नाटकात 100 टक्के पक्षांतर केलेल्या आमदारांचा पराभव होणार आहे. -मल्लिकार्जुन खर्गे
Mallikarjun_Kharge
Mallikarjun_Kharge

बंगळूर :  भाजपचा दबाव, आमिष आणि धमकीच्या भीतीने महाराष्ट्रात कमकुवत झालेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी पक्ष सोडून निवडणूक लढविली. मात्र, त्यात त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातही पक्षांतर केलेल्या अपात्र आमदारांनाही पराभव पचवावा लागेल, असा विश्‍वास कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला. बंगळुरातील कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कार्यालयात रविवारी  झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


श्री. खर्गे म्हणाले, "महाराष्ट्रात ज्यांनी पक्षांतर करून निवडणूक लढविली. त्यापैकी 70 टक्के पराभूत झाले. पण, कर्नाटकात 100 टक्के पक्षांतर केलेल्या आमदारांचा पराभव होणार आहे. पक्षाची विचारसरणी आणि पक्षाचा कार्यक्रम पाहून ज्यांनी मतदान केले, ते मतदार कधीच अपात्र आमदारांना माफ करणार नाहीत. लोकशाहीचा बचाव करायचा असेल, तर जनतेच्या मूलभूत हक्कांचे रक्षण केले पाहिजेत. पैशाच्या अमिषाला मतदारांनी बळी पडू नये. कॉंग्रेस व धजदचे जे आमदार गेले, ते पक्षाच्या विचारसरणीच्या आधारावर गेले असते, तर कदाचित मान्य करता आले असते. मुख्यमंत्री आमचे ऐकत नाहीत, असे क्षुल्लक कारण देत त्यांनी पक्षांतर केले आहे.''


बेळगाव, मडिकेरीसह उत्तर कर्नाटकात तसेच महाराष्ट्रात पूरस्थिती होती. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठेही भेट दिली नाही. नैसर्गिक आपत्तीसाठी पैसेही त्यांनी दिले नाहीत. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावरील राग त्यांनी जनतेवर काढला आहे. गुलबर्गा विमानतळाची धावपट्टी राज्यातील सर्वात लांब धावपट्टी ठरली आहे. संपूर्ण खर्च राज्य शासनाने केला असून त्याच्या उद्‌घाटनास पंतप्रधान मोदी येणे अपेक्षित होते. पण, येडियुराप्पांचा चेहराही त्यांना पाहायचे नसल्याने ते आले नाहीत. गुलबर्गा-बिदर रेल्वेमार्गाचे काम गुलबर्ग्यातच पूर्ण झाले. पण, उद्‌घाटन बिदरमध्ये करण्यात आले, असा आरोपही श्री. खर्गे यांनी केला.

सिद्धरामय्या यांच्याच मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात ज्यांनी अधिक लाभ मिळविला, त्यांनीच असा आरोप करणे हास्यास्पद आहे. 2004 सालापासून निवडणुकीत पैशाचा वापर वाढला आहे. याची सुरुवात बळ्ळारीतून झाली असून भाजपकडून पैशाचा वापर होत आहे. जर ते यात यशस्वी ठरले नाहीत, तर धर्म आणि जातीच्या नावावर समाज तोडण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com