Parties face challege to increse vote percentage in Parbhani MC elections | Sarkarnama

परभणी महापालिका निवडणूक - सर्वच पक्षांपुढे मतांची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 एप्रिल 2017

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसपुढे किमान मागील निवडणुकीत मिळविलेली मतांची टक्केवारी राखण्याचे मोठे आव्हान आहे. तर राज्यभरात भाजपचा वारू चौफेर उधळत असताना भारतीय जनता पक्षापुढे करो वा मरोची स्थिती आहे. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, हे मतांची टक्केवारी वाढवून शिवसेनेला सिद्ध करावे लागणार आहे.

परभणी - गेल्या महापालिका निवडणुकीत मिळवलेली भरघोस मते राखण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादीसह काँग्रेसपुढे आहे. तर शिवसेना-भाजपपुढे मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान आहे.
परभणी शहरासह विधानसभा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी तत्कालीन नगरपालिकेसह महापालिका निवडणुकीत या पक्षासह भारतीय जनता पक्षाला देखील अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे महापालिकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत या चारही पक्षांपुढे मोठे आव्हान आहे.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक मते
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या क्रमांकाने सत्तेच्या जवळ आली होती. तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती. या निवडणुकीत काही प्रभाग वगळता शिवसेना-भाजपची युती होती. तरी सुद्धा या पक्षांना केवळ दहा जागा जिंकता आल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेचे आठ उमेदवार निवडून आले तर भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या.

टक्केवारी वाढविण्याचे आव्हान
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसपुढे किमान मागील निवडणुकीत मिळविलेली मतांची टक्केवारी राखण्याचे मोठे आव्हान आहे. तर राज्यभरात भाजपचा वारू चौफेर उधळत असताना भारतीय जनता पक्षापुढे करो वा मरोची स्थिती आहे. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, हे मतांची टक्केवारी वाढवून शिवसेनेला सिद्ध करावे लागणार आहे.

मतदारांची संख्या वाढली
2017 च्या महापालिका निवडणुकीत मतदारांची संख्या वाढली असून दोन लाख हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यात सर्वत्र विशेषतः परभणी जिल्ह्यात अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली असून महापालिका निवडणुकीत देखील जनजागृतीमुळे त्यामध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वाढलेली टक्केवारी कुणाच्या पारड्यात पडते, हे निकालाअंती दिसून येणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख