कर्जतमध्ये शिवसेनेतील अंतगर्त गटबाजी पार्थ यांच्या पथ्यावर; बारणेंसाठी धोक्याची घंटा

कर्जतमध्ये शिवसेनेतील अंतगर्त गटबाजी पार्थ यांच्या पथ्यावर; बारणेंसाठी धोक्याची घंटा

नेरळ : कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठी आहे. परंतु, अंतर्गत गटबाजी महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना मताधिक्‍य देण्यात फायद्याची ठरू शकते. तसेच, शिवसेना व भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी प्रचारापासून दूर राहिल्याचा फटका महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना बसू शकतो.
 
कर्जत शहरात शिवसेनेचे बूथ नव्हते. हीच स्थिती नेरळमध्ये राष्ट्रवादीची होती. बारणे यांना भाजपने ठामपणे साथ दिली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रचार कार्यालयाच्या उद्‌घाटनापुरतीच ती दिसून आली. मनसेची विरोधी भूमिका आणि शेकापची राष्ट्रवादीला साथ शिवसेनेला महागात पडू शकते. परंतु, शेकाप आणि राष्ट्रवादीतील मतभेदांचा फायदा काही भागात मिळू शकतो. मताधिक्‍य मिळण्याइतपत तो प्रकर्षाने जाणवत नाही. उलट कॉंग्रेस व शेकापची सक्रिय साथ राष्ट्रवादीला मिळाली आहे. 

2009 चे गणित 

कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार गजानन बाबर यांना 18 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. त्या वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार आझम पानसरे यांना मुस्लिम असल्याने मोठ्या प्रमाणात हिंदू मतांचे विभाजन झाल्याने शिवसेना उमेदवारास आघाडी मिळाली. तर शेकापचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. त्या वेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे रायगड जिल्ह्यातील सख्य बाबरांना तालुक्‍यातून आघाडी मिळवून देण्यास उपयोगी ठरले. शेकापकडून विवेक पाटील रिंगणात होते. त्यांनी मतदारसंघात आपली ताकद लावली होती. पण, पाटील घाटाखालचा टप्पा पार करू शकले नाहीत. 

2014 चे गणित 
शिवसेनेने विद्यमान खासदार गजानन बाबर यांच्याऐवजी संपर्कप्रमुख श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली. कर्जतमधून 2009 प्रमाणे त्यांना मतांची आघाडी अपेक्षित होती. मात्र, त्याहूनही जास्त मते त्यांना मिळाली. त्यास प्रामुख्याने राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल नार्वेकर कारणीभूत होते. कारण, निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेला जय महाराष्ट्र करून ते राष्ट्रवादीत दाखल झाले होते. त्यांच्याबाबत राष्ट्रवादीत उत्साह नव्हता. शिवसैनिकही पेटून उठले होते. मात्र, मनसेचा पाठिंबा असलेले शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी मोठी ताकद लावली होती. तरीही बारणे यांना कर्जतमधून जवळपास 28 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. 

राष्ट्रवादी नेत्यांचा तळ 
कोण पार्थ पवार, असे खुद्द खासदार बारणे यांनी हिणवले. त्यानंतर पार्थ सरस असल्याचे राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया सेलने दाखविले. आदिवासी भागासाठी इंग्रजी शाळा, माथेरानची मिनीट्रेन, बीएसएनएलची सेवा, आदिवासी वाड्यांना वीज, रस्ते, मुंबई-पुणे महामार्गावर व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न, या स्थानिक मुद्यांचा पार्थ यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वापर केला. सुनेत्रा पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, आदिती तटकरे, शेकापचे जयंत पाटील, आस्वाद पाटील, बाळाराम पाटील यांची रसद उपयुक्त ठरू शकते. या उलट महायुतीचा एकही नेता दिसला नाही.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com