Parner : Will Nilesh Lanke return the favor to Rahul Zavre ? | Sarkarnama

पारनेर : निलेश लंके राहुल झावरेंच्या मदतीची परतफेड करणार का ? 

मार्तंड बुचुडे
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

नुकत्याच  झालेल्या विधानसभा निवडणुकीत झावरे यांनी शिवसेनेचे माजी आमदार व विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांच्यावर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांचा प्रचार केला होता.

पारनेर  : पारनेर पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी निघाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या तीनही पक्षांमध्ये  आता स्पर्धा रंगण्याची चिन्हे आहेत.

उपसभापती पदासाठी सुनंदा सुरेश धुरपते यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र शिवसेनेच्या एका सदस्याला पळवल्याची चर्चा  झाल्याने आता काँग्रेसचे सदस्य काय भूमिका घेणार, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. 

कारण पंचायत समिती मध्ये १० सदस्य असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेनेचे चार, तर काँग्रेसचे दोन असे पक्षीय बलाबल आहे. अडीच वर्षापूर्वी राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी होती. त्यावेळी सभापतीपदी राहुल झावरे, तर उपसभापती दीपक पवार यांची वर्णी लागली होती.

पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक पवार, रोहिणी काटे, सुप्रिया साळवे व सुनंदा  धुरपते, तर शिवसेनेचे गणेश शेळके, डाॅ. श्रीकांत पठारे, सरूबाई वाघ व संगीता चौधरी, तर काँग्रेसचे राहुल झावरे व दिनेश बाबर हे सदस्य आहेत.

नुकत्याच  झालेल्या विधानसभा निवडणुकीत झावरे यांनी शिवसेनेचे माजी आमदार व विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांच्यावर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांचा प्रचार केला होता. माजी आमदार नंदकुमार झावरे यांनीही कार्यकर्त्यांना लंके यांची मदत करण्याचे आदेश दिले होते. 

त्यामुळे आता सभापती निवडीत लंके यांच्या निर्णयाला महत्व प्राप्त झाले आहे. झावरे हे लंके यांना या प्रचारात सक्रिय झाले होते. त्यामुळे या  उपकारातून उतराई होण्यासाठी माजी सभापती राहुल झावरे यांना पुन्हा एकदा संधी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य गणेश शेळके व डाॅ. श्रीकांत पठारे हे पण इच्छुक असून, या सभापती निवडीत घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही इच्छुकांनी सदस्यांची पळवापळवी सुरूवात केली आहे. त्यामुळे सभापतीपदी कोणाची वर्णी लागते, याकडेही तालुक्याचे लक्ष लागले आहे. 

पारनेर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार सदस्य असून, गेल्या सभापतीपदी निवडीत दीपक पवार यांची गटनेतेपदी निवड जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार पक्षाने व्हिप बजावला होता. परंतु या विधानसभा निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे हे भाजपाच्या गोटात गेल्याने शिवसेनेचे विधानसभा माजी उपाध्यक्ष विजय औटी यांना जाहीर मदत केली होती. 

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य निलेश लंके यांच्या बरोबर, तर सुजित झावरे यांच्याबरोबर सुप्रिया अमोल साळवे हे एकमेव होत्या. त्यामुळे  साळवे या सुजीत झावरे की राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहतात, याकडेही लक्ष लागले आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गासाठी सभापतीपद असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व्हिप काढणार असल्याचे गटनेते दीपक पवार यांनी सांगितले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख