तहसीलदार भारती सागरे हल्ल्यावेळी पोलिसाने काडीपेटी हिसकावली नसती तर... 

तहसीलदार भारती सागरे हल्ल्यावेळी पोलिसाने काडीपेटी हिसकावली नसती तर... 

नगर : श्रीगोंदे, कर्जत, पारनेर, राहुरी तालुक्‍यांतून होणारी वाळुतस्करी राज्याच्या नकाशावर नेहमी झळकते. यातून खून, अधिकाऱ्यांवर खुनी हल्ले झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. मात्र काल थेट तहसीलदार महिलेवर डिझेल टाकून पेटून देण्याचा प्रकार घडला. यासंदर्भाने हल्ला झालेल्या तहसीलदार भारती सागरे यांनी आपला अनुभव "सरकारनामा'कडे कथन केला. 

भारती सागरे यांची 2009 मध्ये तहसीलदार म्हणून नियुक्त झाली. तीन वर्षे जिल्हाधिकारी कार्यालयात काम, नंतर पुनर्वसन अधिकारी व नंतर कर्जतमध्ये तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली होती. तेथील धडक कारवाईमुळे प्रशासनाकडून त्यांचे कौतुक होत होते. 
दरम्यानच्या काळात पारनेरमध्ये तीन वर्षांपासून तहसीलदार नव्हते. प्रभारी अधिभार असल्याने लोकांमधून आंदोलने होत होती. पारनेर तालुक्‍याला पूर्ण वेळ तहसीलदार मिळावा, अशी मागणी नागरिकांमधून होत होती. याबाबत जिल्हाधिकारी व मुख्यमंत्र्यांनाही निवेदने देण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे पारनेरला तहसीलदार नियुक्तीचे आदेश जिल्हा प्रशासनाला मिळाले. त्यानुसार सागरे यांचे नाव पुढे आले. हे आव्हान पेलण्यास सागरे तयार झाल्या. त्यानुसार पारनेरमध्ये 2015 मध्ये पारनेरमध्ये त्या रुजू झाल्या. गेल्या अडीच वर्षांत त्यांनी अनेक कारवाया केल्या. मागील वर्षी एकूण 88 कारवाया केल्या होत्या. या वर्षीही 59 कारवाया करून वाळुतस्करांना सळो की पळो करून सोडले होते. 

अनेक वेळा अप्रत्यक्षपणे धमक्‍या 
वाळुचोरांवर कारवाई केल्यास जीवाला धोका होईल, अशा पद्धतीच्या अप्रत्यक्षपणे धमक्‍या सागरे यांना येत होत्या. त्या म्हणाल्या, यापूर्वी थेट हल्ला झाला नव्हता. ढवणवाडी, निघोज परिसरातही आम्ही मोठ्या कारवाया केल्या होत्या. ढवणवाडी येथे आम्ही मोठी कारवाई केली होती. दहा-बारा अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक होते. तेथे लोक आम्हाला इतर मार्गाने धोक्‍याचा इशारा देत होते. वाळुचोरांवर कारवाई केल्यास धोका होऊ शकतो, असे लोक म्हणत असे. वाळुचोर शेतात गावठी पिस्तुल घेऊन बसलेले असतात. अचानक हल्ला होऊ शकतो, असे लोक सांगत असत. आम्ही मात्र कारवाई करीत राहिलो. ढवणवाडी येथे कारवाईदरम्यान पोकलेनचालक पळून गेले. ते पोकलेन कसे न्यायचे हा मोठा विषय होता. आमची टीम रात्रभर तेथे बसून संबंधितांवर कारवाई केली होती. पण अशा पद्धतीने थेट जिवावर बेतणारा हल्ला प्रथमच झाला. 

असा झाला हल्ला 
कोहकडी हे गाव पारनेर तालुक्‍यात. शिरुर (पुणे) व नगर जिल्ह्याच्या सिमेवरून कुकडी नदी वाहते. नदीच्या काठावरील गावांमध्ये वाळुतस्करांची जास्त चलती असते. या परिसरात वाळू चोरी होत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार तहसीलदार सागरे यांच्यासह मंडलाधिकारी सारिका उंडे, अव्वल कारकून राजेंद्र शिंदे यांच्यासह एक पोलिस एक होमगार्ड व चार तलाठ्यांना सोबत घेऊन काल दुपारी कोहकडी येथील कुकडीचे नदीपात्र गाठले. तेथे दोन पोकलेन व दोन ट्रॅक्‍टरद्वारे वाळुचा उपसा होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. महसूल पथकाला पाहताच वाळुचोरांनी वाळुची वाहने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पळवून नेत असलेल्या एका पोकलेनला अडवून तहसीलदार सागरे यांनी त्याचा ताबा घेतला. पोकलेनच्या चालकाच्या जागेवर त्या बसल्या. दरम्यान वाळु चोरांनी जमाव जमवून महसूल पथकाशी अरेरावी करीत दगडफेकही सुरू केली होती. 

ही कारवाई चालू असताना एका तरुणाने आपण अण्णापूरच्या माजी सरपंचांचा मुलगा असून, सध्या ग्रामपंचायत सदस्य असल्याचे सांगून दम दिला. तुम्ही वाहने घेऊन जाऊ शकत नाहीत, असे सांगून त्याने पोकनेलनधीन डिझेल काढून स्वतःवर ओतून घेतले. पोकलेन व तहसीलदार सागरे यांच्यावरही डिझेल टाकून काडीपेटी शोधू लागला. या वेळी पोलिस कर्मचारी गंगाधर फसले यांनी त्या तरुणाच्या हातातील काडीपेटी हिसकावून घेतली. या वेळी तलाठी डी. आर. गायकवाड यांनी पोकलेनमशीनवरून सागरे यांना खाली उतरविले. हे सर्व घडत असताना मोठा जमाव होता. जमावानेही पुढील अनर्थ होऊ नये म्हणून प्रयत्न केले. या सर्व गडबडीत वाळुचोर आपली वाहने घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले, असे सागरे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com