पारनेर बाजार समिती : आमदार विजय औटी, सुजित झावरे अडचणीत; सभापती गायकवाडांविरुद्धचा अविश्वास ठराव बारगळणार? 

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणाला अतिशय विकृत वळण लागले असून, संचालकांच्या पळवा-पळवीमुळे अविश्वासाचा ठराव बारगळणार हे जवळ जवळ निश्चित झाले आहे. तसे झाले तर झावरे यांच्या बरोबर आमदार विजय औटी यांचेही राजकीय नाचक्की होणार आहे.
पारनेर बाजार समिती : आमदार विजय औटी, सुजित झावरे अडचणीत; सभापती गायकवाडांविरुद्धचा अविश्वास ठराव बारगळणार? 

पारनेर (जि. नगर) : पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणाला अतिशय विकृत वळण लागले असून, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातील तीन संचालक पुन्हा सभापती प्रशांत गायकवाड यांच्या गटात सामिल झाले आहेत. मात्र यात झावरे गटाने आमच्या संचालकांना मारहाण करून बळजबरीने नेल्याचा, तर गायकवाड गटाने ते आमच्याकडे स्वखुशीने आल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पारनेरचे राजकारण तापले आहे. मात्र संचालकांच्या पळवा-पळवीमुळे अविश्वासाचा ठराव बारगळणार हे जवळ जवळ निश्चित झाले आहे. तसे झाले तर झावरे यांच्या बरोबर आमदार विजय औटी यांचेही राजकीय नाचक्की होणार आहे. 

काल (ता. २८) रात्री पंढरपूर येथून झावरे गटाकडे असलेले खंडू भाईक, सोपान कावरे व काँग्रेसचे व विद्यमान उपसभापती विलास झावरे हे अाता झावरे गटाकडून गायकवाड गटाकडे आल्याने झावरे व गायकवाड या दोन्ही गटाकडे समान नऊ-नऊ संचालक झाल्याने अाता हा ठराव बारगळणार हे जवळजवळ निश्चित आहे.

सुरुवातीला झावरे गटाकडे १२ व गायकवाड गटाकडे अवघे सहा संचालक होते. मात्र अाता पळवापळवीच्या राजकारणात दोनही गटाकडे समान संचालक झाले आहेत. यात झावरे यांची मोठी राजकिय नाचक्की होणार आहे.सध्या गायकवाड यांच्याकडे स्वतः गायकवाड यांच्यासह आण्णा बडे, संगीता कावरे, राजश्री शिंदे, सावकार बुचुडे, शिवावाजी बेलकर व रात्री जाऊन मिळालेले उपसभापती झावरे, कावरे व भाईक यांचा समवेश आहे. तर झावरे यांच्याकडे गंगाराम बेलकर, अरुण ठाणगे, हर्षल भंडारी, राहुल जाधव, विजय पवार, मिरा वरखडे व शिवसेनेचे काशिनाथ दाते, युवराज करंजुले, अशोक कटारिया असे नऊ संचालक आहेत.

अविश्वासाचा ठराव मंजूरीसाठी १२ संचालकांची गरज असते. तसेच सभेचा कोरम पूर्ण होण्यासाठीही किमान १० संचालकांची गरज आहे. झावरे यांच्याकडे दहाही संचालक नसल्याने सोमवारी बोलावण्यात आलेली बैठकच होणार नाही, असे चिन्ह दिसत आहे. गायकवाड गटाचे सर्व संचालक सहलीवर गेले असून, ते कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहेत व ते सभेला येणार नसल्याचे समजते. त्यामुळे अविश्वासचा ठराव बारगळणार आहे हे निश्चित.

ठराव बारगळला तर झावरे व आमदार आैटी यांची पूर्ण नाचक्की होणार आहे. यामुळे त्यांचे तालुक्यातील राजकिय वजन तर कमी झाले आहेच, शिवाय पक्षातील श्रेष्ठींकडेही त्यांची पत कमी होणार असल्याचे बोलले जाते. 

पारनेरचा बिहार झाला : झावरे
पारनेरचा बिहार झाला आहे. आमच्या गरीब तीन संचालकांना मारहाण करत बळजबरीने ओढून नेले. असे रजकारण निंदनिय आहे.केवळ गायकवाड कुडुंबामुळे राजकारणात पैशाची मस्ती व गुंडगिरीच्या राजकारणाचा शिरकाव झाला आहे. यापुढे पारनेरच्या राजकारणात गुंडाच्या फौजा ज्यांच्या जवळ आहेत तेच राजकारण करू शकतील असे वाटते, असे मत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सरकारनामा शी बोलताना व्यक्त केले.

ते संचालक स्वखुशीने आमच्या गोटात : गायकवाड
विरोधी गोटात असलेले काँग्रेस पक्षाचे व बाजारसमितीचे उपसभापती विलास झावरे, खंडू भाईक व सोपान कावरे परत आमच्या गटाकडे आले आहेत. या तिनही संचालकांना गुंडाकडून मारहाण करून पळविले असा आरोप विरोधकांनी केला असला तरी हे संचालक स्व:खुशीने, विरोधकांच्या मनमानीला, हुकुमशाहीला,तसेच खोट्या अश्वासनाला कंटाळून आमच्याकडे स्वखुशीने येण्याचा त्यांनी निर्णय घेऊन तसे कळविले म्हणून त्यांना घेण्यासाठी आमचे सर्व सहकारी मित्र गेले व तिथे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही.गलीच्छ राजकारणाला तालुका वैतागला आहे. विरोधक तालुक्यातील जनतेची दिशाभुल करत आहेत. भाईक व कावरे स्वखुशीने व विरोधकांना वैतागून आले आहेत, तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे  यांचे आदेशाने विलास झावरे परत स्वगृही आले आहेत. आमच्यावर होणारा अन्याय तालुक्यातील जनतेने पाहिला आहे. राज्यातील नेत्यांनीही आम्हाला भक्कम साथ दिली आहे. माझे कुणाशीही वैर नाही. आपले सर्व संचालक मंडळ हे बाजार समितीचे हिताचे निर्णय घेत आलेले आहेत आणि घेत रहातील, त्यामध्ये कोणताही राजकीय भेदभाव रहाणार नाही, असे बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी `सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com