संसदीय समित्यांवरील दांडीबहाद्दरांचा पत्ता कट, नायडू यांचा कडक इशारा

........
संसदीय समित्यांवरील दांडीबहाद्दरांचा पत्ता कट, नायडू यांचा कडक इशारा

नवी दिल्ली : संसदेत जे कायदे केले जातात त्यांची सखोल छाननी करणाऱया संसदीय स्थायी समित्यांच्या बैठकांना अतिशय कमी खासदार उपस्थित रहातात, बहुतांश खासदार या समित्यांच्या बैठका गंभीरपणे घेत नाहीत याबद्दल उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम वेंकय्या नायडू यांनी आज अतिशय तीव्र नाराजी व्यक्त केली. यापुढे जे राज्यसभा सदस्य सलग दोन बैठकांना दांडी मारतील त्यांना त्या समितीतून काढून टाकण्याचा निर्णय मी घेईन असा सज्जड इशारा तर त्यांनी दिला. 

या मुद्यावर तसेच राज्यसभएतील विविध चर्चांची संख्या घटल्याच्या मुद्यावर -चर्चा पे चर्चा , घडविण्याचा प्रयत्न हाणून पाडताना त्यांनी विरोधी पक्षनेत्यांसह अन्य खासदारांना परवानगी नाकारली व गोंधळ वाढला तेव्हा शून्य प्रहराचे कामकाज नायडू यांनी सरळ तहकूब करून टाकले. राज्यसभएत आज एक चर्चा होती. मात्र संबंधित मंत्र्यांनी ते आजारी असल्याचे मला कळविल्याने मी ती चर्चा मंगळवारी दुपारी दोनला निश्‍चित केली आहे असेही नायडू म्हणाले. 

संसदीय प्रणालीत स्थायी व प्रवर समित्यांचे स्थान महत्वाचे आहे. प्रत्येक विधेयकावर या समित्या चर्चेचा अक्षरशः कीस पाडतात व संसदेतील चर्चेत ज्यांना बोलावता येत नाही अशा संबंधितांनाही बोलावून त्यांची बाजू ऐकून घेतली जाते. यामुळे संसदीय समित्यांच्या अहवालांत सखोलपणा दिसतो व प्रत्यक्ष विधेयक बनविताना सरकारला हे अहवाल दिवा दाखविण्याचे काम करतात. मात्र गेल्या पाच वर्षांपासून संसदीय समित्यांमध्ये उपस्थित राहणाऱया खासदारांची संख्या रोडावत गेली. हे प्रमाण गंभीर वळणावर पोहोचल्यावर नायडू यांनी त्याची गंभीर दखल घेतली व या अधिवेशनाच्या सुरवातीलाच त्याबाबत इशारा दिला. 

नायडू यांनी आज तर अनुपस्थित सदस्यांची प्रचंड संख्या सांगताना उपस्थित सदस्यांची नावेच वाचून दाखविली. दांडीबहाद्दरांची नावे प्रकाशित केली जातील असा इशारा त्यांनी दिला. विविध विभागांशी संबंधित समित्यांच्या बैठकांत उपस्थित राहणाऱ्या खासदारांची संख्या रोडावत चालल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले की यावर्षी सप्टेंबरनंतर राज्यसभेच्या 8 समित्यांच्या बैठकांत दोन्ही सभागृहांचे फक्त 18 खासदार उपस्थित राहिले ही अत्यंत निराशाजनक बाब आहे. संसदीय समित्यांच्या बैठकांमध्ये पूर्ण उपस्थिती असावी अशी माझी अपेक्षा आहे. तथापि चित्र उलटेच दिसते. कारण 25 पैकी एखादा सदस्यही गैरहजर असेल तर समितीचा आवाजच ऐकू येऊ शकत नाही. हे चित्र यापुढे चालणार नाही व सलग दोन बैठकांना गैरहजर राहिल्यास संबंधित खासदाराऐवजी दुसऱ्या सदस्याला तेथे स्थान दिले जाईल असाही त्यांनी इशारा दिला. 

मराठी खासदारही दांडीबदाद्दर 
राज्यसभेच्या अखत्यारीतील समित्यांच्या 41 बैठका यंदा सप्टेंबरपासून झाल्या. या विविध समित्यांतील राज्यसभेच्या 80 पैकी फक्त 18 सदस्य बैठकांना उपस्थित राहिले. लोकसभेच्या 168 पैकीही फक्त 18 सदस्य बैठकांना आले. इतके उदासीन चित्र असेल तर बैठकांना अर्थ काय राहतो. नायडू यांनी उपस्थित असेलल्या ज्या 18 सदस्यांची नावे वाचून दाखविली त्यात सर्वश्री जयराम रमेश, आनंद शर्मा, ऍमी याज्ञिक, गोव्याचे विनय तेंडुलकर यांची नावे होती. मात्र एकाही मराठी खासदाराचे नाव नियमित हजर सदस्यांत नव्हते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com