भालकेंची घोडदौड रोखण्यासाठी परिचारक गटाची जोरदार तयारी सुरू

भालकेंची घोडदौड रोखण्यासाठी परिचारक गटाची जोरदार तयारी सुरू

पंढरपूर : आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. विद्यमान आमदार भारत भालके यांनी निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. भालके यांचे पारंपरिक विरोधक असलेले आमदार प्रशांत परिचारक यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत आमदार भालकेंचा वारू रोखायचा या ईर्षेनेच सध्या परिचारक गट कामाला लागला आहे. 

आमदार प्रशांत परिचारकांचे निलंबन मागे घेतल्यानंतर परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने परिचारक गट आता सक्रिय झाला आहे. मागील दोन निवडणुकीत परिचारकांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मागील विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा म्हणून विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये परिचारक गटाने तालुक्‍यात एकहाती वर्चस्व मिळवले. 

आमदार प्रशांत परिचारकांनी गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शहर व तालुक्‍याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे. शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या उजनी कालव्यासाठी संपादित झालेल्या जमिनीचा 180 कोटी रुपयांचा मोबदला मिळवून दिल्याने परिचारकांबद्दल मंगळवेढा तालुक्‍यात आणखी सहानुभूती वाढली आहे. आमदार प्रशांत परिचारक व माजी आमदार सुधाकर परिचारक यांनी अजूनही भाजपत अधिकृत प्रवेश केला नसला तरी परिचारक मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांच्या गोटातील मानले जातात. 

राज्यात आणि केंद्रात भाजप-सेनेची सत्ता असल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपत दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील, "सहकार शिरोमणी'चे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मोहिते-पाटलांच्या पक्ष प्रवेशानंतर पंढरपूर-मंगळवेढा तालुक्‍यातील राजकारणाचीही दिशा बदलली आहे. 

राजकारणातील बदलत्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी कॉंग्रेसचे आमदार भारत भालकेही भाजप-शिवसेना नेत्यांच्या संपर्कात आहेत. अलीकडेच गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या माध्यमातूनही त्यांनी अधिक जवळीक वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आषाढी यात्रेच्या वेळी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार भालकेंच्या घरी भेट देऊन त्यांचा पाहुणचार स्वीकारला होता. त्यानंतर आमदार भालके भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्‍यता बळावली आहे. 

पंढरपूर विधानसभा शिवसेनेकडे 
पंढरपूर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे असल्याने भालकेंची मोठी पंचाईत झाली आहे. भाजपमध्ये प्रवेश करावा की शिवसेनेत, या द्विधा मनःस्थितीत आमदार भालकेंसह त्यांचे समर्थक आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी पंढरपूरच्या राजकारणात आणखी काही राजकीय उलथापालथी होण्याची शक्‍यता आहे. या उलथापालथी कोणाच्या पथ्यावर पडणार, हे आगामी काळातच स्पष्ट होईल. सध्यातरी परिचारक आणि भालके यांच्यातच राजकीय संघर्ष होईल, अशी शक्‍यता जाणकारांतून व्यक्त केली जात आहे. 

कॉंग्रेसकडून उमेदवाराची चाचपणी 
कॉंग्रेसचे विद्यमान आमदार भारत भालके भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धडकी भरली आहे. आमदार भालकेंनी भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश केला, तर कॉंग्रेसलाही तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे. ऐनवेळी उमेदवाराची शोधाशोध नको म्हणून कॉंग्रेसने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. पंढरपूर-मंगळवेढा तालुक्‍यातून सुमारे 30 कार्यकर्त्यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामध्ये कॉंग्रेसचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष शिवाजी काळुंगे आणि युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांचा समावेश आहे. दरम्यान, आमदार भालकेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मात्र मौन बाळगले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com