parbhani zp | Sarkarnama

परभणीत राष्ट्रवादीला मिळणार रासपची साथ?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

परभणी ः जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बहुमताच्या काठावर पोचलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. सत्तेत सहभागी होण्यास भाजपचा एक गट उत्सुक असला तरी त्या आधीच राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते तथा उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी राष्ट्रवादीशी सलगी केली आहे.

परभणी ः जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बहुमताच्या काठावर पोचलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. सत्तेत सहभागी होण्यास भाजपचा एक गट उत्सुक असला तरी त्या आधीच राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते तथा उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी राष्ट्रवादीशी सलगी केली आहे.

निकालाच्या दिवशी गुट्टे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार विजय भांबळे यांच्यात पाथरीत बैठक झाल्याची माहिती आहे. त्यामुळे रासप आणि एका अपक्षाच्या मदतीने राष्ट्रवादी सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू झाली आहे. 
जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मुसंडीने कॉंग्रेसला काही तालुक्‍यातून हद्दपार केले आहे. शिवसेनेलाही अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे 24 जागा जिंकून राष्ट्रवादी अव्वल ठरली आहे.

निवडणुकीच्या सुरवातीला कॉंग्रेस आणि शिवसेनेत जे प्रवेश सोहळे पार पडले त्यावरुन वेगवेगळे अंदाज वर्तविले जात होते. परंतु राष्ट्रवादीच्या यशाने या दोन्ही पक्षांतील हवा निघून गेली आहे. शिवसेनेला परभणी तालुका सोडला तर अन्य ठिकाणी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका शिवसेनेला बसला आहे.

एक खासदार, दोन आमदार, गावोगावी कार्यकर्त्यांची फौज असे असतानाही 15 चाही आकडा हा पक्ष ओलांडू शकला नाही. मातब्बर नेत्यांची फळी असलेल्या कॉंग्रेसचीही स्थिती राहिली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या विशेषतः कॉंग्रेसच्या नेत्यांवर निवृत्त होण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची फौज घेऊन मैदानात उतरलेल्या भाजपला पाहिजे तेवढे यश मिळाले नसले तरी मागचा इतिहास आणि भाजपची ग्रामीण भागातली स्थिती पाहता हे यश खूप मोठे असल्याचे भाजपचे कार्यकर्ते सांगत आहेत. 
निकाल जाहीर होताच आता सत्तास्थापनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील 10 वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस अपक्ष, शेकाप, भाजप यांच्या मदतीने मिनी मंत्रालय सांभाळत आहे. आताही राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत नसले तरी केवळ चार जागा कमी पडत असल्याने अन्य पक्षांच्या कुबड्या घ्यावा लागणार आहेत. 
निवडणूक निकालाआधी राष्ट्रवादी भाजपच्या मदतीने सत्तास्थापन करेल अशी अटकळ बांधली जात होती. मागील 10 वर्ष भाजप जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या सोबत असल्याने अशी शक्‍यता वर्तविली जात होती, परंतु आगामी परभणी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी भाजपला जवळ करण्याची शक्‍यता दुरावली आहे. समविचारी पक्षासोबत आघाडी करायला उत्सुक असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगितले जात असले तरी परंतु कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांच्यासोबतच आमदार दुर्राणी, आमदार भांबळे यांचा असलेला राजकीय संघर्ष पाहता आघाडीची सुतराम शक्‍यता वाटत नाही. त्यामुळे आता लक्ष राष्ट्रीय समाज पक्षाच्या भूमिकेकडे लागले आहे. 
कॉंग्रेस, भाजपपेक्षा रासपच बरी ! 
सध्या रासपचे तीन आणि तीन अपक्ष सदस्य आहेत. त्यामुळे सत्तेच्या चाव्या या पाच जणांकडे राहणार आहेत. दरम्यान, रासप नेते रत्नाकर गुट्टे आणि राष्ट्रवादीच्या दोन आमदारात पाथरी येथे बैठक झाल्याची माहिती आहे. निकाल लागताच सायंकाळी आमदार दुर्राणी, आमदार भांबळे यांच्यासोबत त्यांनी गुप्तगू केल्याची चर्चा पाथरीत सुरू झाली आहे. त्यामुळे रासपचे तीन आणि एका अपक्षाच्या मदतीने राष्ट्रवादी पुन्हा आपला झेंडा फडकवणार असल्याचे कळते. कॉंग्रेस, भाजपपेक्षा रासप बरी असा सूर राष्ट्रवादीत उमटल्याने ही बैठक झाल्याची चर्चा आहे. 
जिंतूर तालुका राहणार किंगमेकर 
राष्ट्रवादीला सर्वाधिक एकहाती यश मिळवून दिले ते जिंतूर तालुक्‍याने दहापैकी तब्बल नऊ जागा या पक्षाने मिळविल्या आहेत. राष्ट्रवादीची सत्ता स्थापन झाल्यास अध्यक्षपदाच्या दावेदारीसोबत अन्य काही समित्याही याच तालुक्‍यात जाणार अशी शक्‍यता आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख