parbhani zp | Sarkarnama

परभणीत आमदार विजय भांबळेच उच्चश्रेणीत उत्तीर्ण !

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

परभणी ः यंदाची जिल्हा परिषद निवडणूक ही जिल्ह्यातील विधानसभेच्या चारही आमदारांची परीक्षा घेणारीच ठरली आहे. या परीक्षेत जिंतूरचे आमदार विजय भांबळे वगळता उर्वरित तीनही आमदार गुणवत्ता यादीत चमकले नाहीत. त्यामुळे या आमदारांचा त्यांच्या विधानसभा क्षेत्रात प्रभाव कमी झाला की, अंतर्गत गटबाजीचा त्यांना फटका बसला याची कारणे आता पक्षश्रेष्ठींसमोर मांडावी लागणार आहेत. 

परभणी ः यंदाची जिल्हा परिषद निवडणूक ही जिल्ह्यातील विधानसभेच्या चारही आमदारांची परीक्षा घेणारीच ठरली आहे. या परीक्षेत जिंतूरचे आमदार विजय भांबळे वगळता उर्वरित तीनही आमदार गुणवत्ता यादीत चमकले नाहीत. त्यामुळे या आमदारांचा त्यांच्या विधानसभा क्षेत्रात प्रभाव कमी झाला की, अंतर्गत गटबाजीचा त्यांना फटका बसला याची कारणे आता पक्षश्रेष्ठींसमोर मांडावी लागणार आहेत. 

परभणी जिल्हा परिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागलेला नाही. एकंदर निकालावर नजर फिरविली तर गतवेळीपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एक जागा कमी झाली आहे, तर शिवसेना 11 वरून 13 जागांवर गेली आहे. भारतीय जनता पक्षाच्याही या निवडणुकीत जागा वाढल्या आहेत. कॉंग्रेसची मात्र धुळधाण झाली आहे. कॉंग्रेसला गतवेळी आठ जागा होत्या. या निवडणुकीत त्या सहावरच आल्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेसच्या जिल्ह्यातील नेतृत्वाला हा मोठा धक्का मानला जातोय. त्यांनाही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. 

यंदाच्या जिल्हा परिषदेच्या निकालावर विधानसभा निहाय नजर टाकली तर त्या-त्या विधानसभा क्षेत्रात त्या आमदारांच्या प्रभावाचा लेखा-जोखाच समोर येतो. परभणी विधानसभेचे आमदार डॉ. राहुल पाटील हे शिवसेनेचे आहेत. परभणी विधानसभा कार्यक्षेत्रात जिल्हा परिषदेचे दहा गट आहेत. या पैकी शिवसेनेला केवळ पाचच जागा जिंकता आल्या आहेत. तसे पाहता परभणी विधानसभा ही शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून राज्यभरात परिचित आहे. असे असतानाही आमदार डॉ. राहुल पाटील यांचा करिष्मा म्हणावा तसा चाललेला दिसत नाही. या ठिकाणी झरी, टाकळी बोबडे, पिंगळी, सिंगणापूर व लोहगाव या पाच ठिकाणीच शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. उर्वरित ठिकाणी कॉंग्रेस तीन, भाजप एक व अपक्ष एका ठिकाणी विजयी झाला आहे. 
पाथरी विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे आमदार मोहन फड प्रतिनिधित्व करीत आहेत. परंतु या ठिकाणी त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे तगडे आव्हान होते. या मतदार संघात एकूण 12 गट आहेत. त्यापैकी केवळ चार गटातच शिवसेनेचे उमेदवार विजयी होऊ शकले आहेत. सात ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस, एका ठिकाणी कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. या मतदार संघात पाथरी, मानवत व सोनपेठ हे तीन तालुके येतात. 

गंगाखेड मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे हे विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. या मतदार संघात गंगाखेड, पालम व पूर्णा हे तीन तालुके येतात. जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विजयाचा वारू जोरात जात असताना गंगाखेड मतदार संघात मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसला 15 पैकी केवळ चार जागांवरच समाधान मानावे लागले आहे. त्यांचाही या मतदारसंघातील प्रभाव कमी झाला का? असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे. 
जिंतूर विधानसभा मतदार संघात परिस्थिती वेगळी आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार विजय भांबळे हे प्रतिनिधित्व करतात. जिंतूर व सेलू हे दोन मोठे तालुके या विधानसभेत येतात. या मतदार संघात जिल्हा परिषदेचे 15 गट आहेत. यापैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसला 13 जागांवर विजय मिळाला आहे. उर्वरित दोन जागा शिवसेनेच्या पारड्यात पडल्या आहेत. याचा अर्थ आमदार भांबळे यांचे त्यांच्या मतदार संघात वजन वाढले आहे असाच धरावा लागेल.

या निवडणुकीत त्यांनी तालुक्‍यातील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे आव्हान पूर्णत: संपुष्टात आणले आहे. कॉंग्रेसच्या सर्वच उमेदवारांवर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. या निवडणुकीने जिल्ह्यातील चारही आमदारांचे प्रगती पुस्तकच तयार झाले आहे. ही निवडणूक म्हणजे त्यांच्यासाठी अर्धवार्षिक परीक्षाच ठरली आहे. या परीक्षेत आमदार विजय भांबळे हे उच्चश्रेणीत उत्तीर्ण झाले, तर उर्वरित तीनही आमदार गुणवत्ता यादीतही चमकले नाहीत असेच म्हणावे लागेल. 
शिवसेनेला अंतर्गत गटबाजीचा फटका 
गतवेळेपेक्षा यंदा शिवसेनेला जिल्ह्यात जास्त जागा मिळाल्या असल्या तरी अनेक ठिकाणी जिल्ह्यातील लोक प्रतिनिधीच्या अंतर्गत गटबाजीमुळे शिवसेनेला फटका बसला आहे. पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यापेक्षा त्याला पाडायचे कसे याची रणनीती आखण्यात आल्याचे या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. 
बाबाजानींच्या गडाला हादरा 
पाथरी मतदार संघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा गड मानला जातो. पाथरी तालुक्‍यात त्यांची एक हाती सत्ता आहे. असे असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाथरी तालुक्‍यात दोन जागी पराजय स्वीकारावा लागला. गतवेळी या तालुक्‍यातील चारही गट राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात होते. 
भाजपची अपेक्षापूर्ती 
भारतीय जनता पक्षाला गतवेळी केवळ दोन जागाच होत्या, परंतु या निवडणुकीत भाजपला पाच जागा मिळविता आल्या आहेत. भाजप नेत्यांची केवळ पाच ते सात जागांवर विजय व्हावा, अशी अपेक्षा होती. त्यांची अपेक्षापूर्ती झाली आहे असेच म्हणावे लागेल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख